Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आषाढी यात्रा आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले अधिकाऱ्यांना
पंढरपूर, २३ जून/वार्ताहर

 

वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वानी मिळून काम करीत यात्रा चांगल्या रीतीने पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले. जिल्ह्य़ातील सर्वच अधिकाऱ्यांची आढावा बैठक पंढरपूर येथे मंगळवारी दुपारी आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते. या वेळी उरलेली कामे २७ जूनपर्यंत योग्य पद्धतीने करून घ्यावीत, अशा सूचना दिल्या आहेत. पालखीमार्गावर जी कामे अपुरी अन् निकृष्टपणे झाली आहेत ती तातडीने चांगल्या प्रकारे करून घ्यावीत. या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावले. यात्राकाळात पालखी तळ, शहर परिसरात भारनियमन राहाणार नसून याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले, तसेच काही लाईनमन कामावर नसतात, काहीजण शुद्धीवरही नसतात, याकरिता यात्राकाळात कामावर चांगली माणसे नेमा, असे आदेशही जिल्हाधिकारी पाटील यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दि. २७ जून, संत तुकाराम महाराज पालखी २८ जून, संत मुक्ताई दि. २७ जून, संत सोपानदेव, संत निवृत्तिनाथ अशा मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्य़ात आगमन होत आहे. वारकऱ्यांच्या सोयीकरिता प्रशासन सज्ज असून, दर्शनरांग व्यवस्था लोखंडी रेलिंग, वारकऱ्यांच्या पाण्याची सोय, तसेच दर्शनरांगेतील भाविकांच्या सोयीसाठी सामान ठेवण्याची व्यवस्था आदींची सोय केली जाणार आहे, असे प्रश्नंताधिकारी संजय पलांडे यांनी सांगितले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने यात्राकाळात दि. २४ जून पासून चोवीस तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. दर्शन मंडप ते इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूर येथपर्यंत बॅरेकेट लावण्यात आले आहेत, असे कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.
यात्राकाळात चंद्रभागेच्या वाळवंटात भाविक मोठय़ा प्रमाणात असतात. त्यामुळे या परिसरात तात्पुरती हॉटेल, दुकाने लावण्यास बंदी आहे. यात्राकाळात भाविकांच्या स्नानासाठी चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येणार असून, अनुचित प्रकार घडू नये याकरिता स्पीड बोट, नावा व जलतरणपटू ठेवण्यात येणार आहेत, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांनी सांगितले.
यात्रेच्या काळात स्वच्छता राखण्यासाठी नगरपरिषदेचे कामगार, तसेच हंगामी कामगार असे ११२५ लोक काम करीत असून, शहरातील कचरा उचलण्यासाठी जादा टिपर, तसेच घंटागाडीमार्फत कचरा उचलण्यात येणार असून, रोज १०० टन कचरा उचलला जातो, असे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी सांगितले. नपाची सर्व यंत्रणा सज्ज असून, यात्रेकरूंची योग्य सोय, सेवा पुरविण्यात येईल, असे नगराध्यक्ष सतीश मुळे यांनी सांगितले.
यात्राकाळात वारकऱ्यांचे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असे १२ सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणे सोयीचे जाणार आहे. यात्राकाळात मांस-मद्य विक्री पूर्णपणे बंद असून, मद्य विक्री दुकानातून दुकाने बंद करताना किती साठा होता अन् चालू करताना किती साठा होता याची पाहणी करण्यात येणार असून, चोरून मद्य विक्रीस यामुळे आळा बसणार आहे. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे, असे डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस जि. प. कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर, डीवायएसपी प्रमोद होनराव, पी. आर. पाटील, स्वामी, वेळापूर, माळशिरस, अकलूज, पंढरपूर येथील पोलीस निरीक्षक, व्यवस्थापक संजय डोंगरे, तहसीलदार शैलेश सूर्यवंशी यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
विहिरी, आडातून वारकऱ्यांना पाणीपुरवठा
आषाढी एकादशीच्या सोहळ्यातील सर्व वारकरी, भाविक यांच्या सोयीकरिता तालुक्यातील सात गावांतील ३७८ विहिरी, २४५ हातपंप, २३ पाणीपुरवठा योजना, ३७ आड व ४३ हौद असे मिळून ७६० पाणीस्रोतांद्वारे पाण्याची सोय पंचायत समिती पंढरपूरने केली आहे, असे गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी सांगितले.
तालुक्यातील पिराची कुरोली, वाखरी, भंडीशेगाव, करकंब, नांदोरे पटवर्धन, उरोली आदी गावांतून पालखी व दिंडय़ा मुक्कामी असतात. दुपारचे जेवण व मुक्काम या वेळी गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात्राकाळात वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी शुद्धीकरणासाठी १४९ आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षक व १२ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीचा सहभागही आहे, असे शेवटी जगताप यांनी सांगितले.