Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बेकायदा वाळूउपसा करणारे ट्रक सांगली, कराडमध्ये पकडले
सांगली, २३ जून / प्रतिनिधी

 

अनधिकृतपणे वाळूउपसा करणारे १८ ट्रक विश्रामबाग परिसरात जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी स्वत: छापा टाकून पकडले.
सांगली जिल्हय़ात अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, जिल्हय़ात सर्व तालुक्यांत ही मोहीम व्यापकपणे राबविण्यात येत आहे. आज पकडण्यात आलेले १८ ट्रक मिरज पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच जिल्हय़ातील सर्व तहसीलदार व प्रश्नंताधिकारी यांना अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी सांगितले.
कराडमध्ये ११ ट्रकवर कारवाई
कराड- बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ११ ट्रकवर काल रात्री कारवाई करून, संबंधितांकडून प्रत्येकी ११ हजार ५०० रुपयांप्रमाणे १ लाख २६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
शहर परिसरात ३ तर उर्वरित ८ ट्रकवर पुणे-बंगलोर महामार्गावर सापळा रचून कारवाई करण्यात आली. प्रश्नंताधिकारी नीलिमा धायगुडे यांच्या आदेशावरून व तहसीलदार सुनील जोशी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांचे पथक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.तासवडे टोल नाक्यावर तपासणीकामी वाळू वाहतूक करणारे वाहन अडवण्याच्या कारणावरून वाळू ठेकेदार प्रमोद कदम (पेर्ले, ता. कराड) याने मंडलाधिकाऱ्यास शिवीगाळ, तर तलाठय़ास मारहाण केल्याच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद महसूल सेवकवर्गात उमटले. त्यांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पाश्र्वभूमीवर आता बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू झाल्याने या कारवाईसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे.