Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

माउलींची पालखी सातारा जिल्ह्य़ात
सातारा, २३ जून/प्रतिनिधी

 

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळमृदंगाच्या गजरात मोठय़ा उत्साहात भव्य स्वागत सातारा जिल्ह्य़ात करण्यात आले. नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना विधिवत अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर वारकऱ्यांचा दिंडी सोहळा लोणंद मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. वरुणराजाने ओढ दिल्याने माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी पावसासाठी साकडे घातले. माऊलींच्या अभ्यंगस्नानासाठी वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात आले होते.
जिल्ह्य़ाच्या सीमेवर पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणेतील सर्व प्रमुख जातीने हजर होते. जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार मदन भोसले, विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप आदी मान्यवरांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
येत्या २७ जूनपर्यंत पालखी सातारा जिल्ह्य़ातून मार्गक्रमण करणार आहे. मंगळवारी लोणंदमध्ये एक दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर बुधवारी २४ जूनला तरडगाव येथे चांदोबा रिंगण सोहळा पार पडणार असून, गुरुवारी २५ जूनला पालखीचा मुक्काम फलटण येथे व शुक्रवारी २६ जूनला बरड येथे मुक्काम राहाणार असल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेने चोख बंदोबस्त व सुविधा देण्यासाठी यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची व्यवस्था वीज वितरण कंपनीने चोखपणे केलेली आहे.