Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ज्येष्ठ वकील बापूसाहेब कालेकरांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सत्कार
सोलापूर, २३ जून/प्रतिनिधी

 

सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील एस. के. तथा बापूसाहेब कालेकर यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. एस. एन. जामदार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे अनेकांनी अभीष्ठचिंतन केले.
कौटुंबिक जिव्हाळ्याच्या या सत्कार सोहळ्यास ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी, पर्यावरण तज्ज्ञ अनुजा अजित चौधरी, अ‍ॅड. अशोक कालेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अ‍ॅड. कालेकर हे १९४४ सालापासून वकिलीच्या क्षेत्रात सेवारत असून त्यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एकनाथ तुकाराम तथा अण्णासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला प्रश्नरंभ केला. त्यांनी तब्बल २५ वर्षे सरकारी वकील म्हणून काम पाहिले. जिल्हा सरकारी वकिलपदाची प्रतिष्ठा त्यांनी केवळ राखली नव्हे तर वाढविली. त्यांनी अनेक खून खटले व किचकट दिवाणी दावे सरकारतर्फे हाताळली. रमाबाई अंकुलकर या वृध्द महिलेच्या गाजलेल्या खून खटल्यात प्रत्यक्ष पुरावा नसताना केवळ परिस्थिती पुराव्याच्या आधारे अ‍ॅड. कालेकर यांनी अत्यंत कौशल्याने खटला चालवून सख्या मावशीचा पैशासाठी खून करणाऱ्या भाच्यास फासावर पाठविले. ही फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम केली होती.
भागवत चित्रपटगृहाच्या पीछाडीस झालेल्या मच्छिंद्र शिंदे खून खटल्यात मारुती कॅप्टन व टरक्या बाबू या तत्कालीन गावगुंडांना जन्मठेपेच्या शिक्षेला पाठविण्याचे कामही अ‍ॅड. कालेकर यांनी केले होते.हा खटला त्याकाळात फार गाजला होता. धनदांडग्यांनी प्रथम हा खटला जिरवून टाकला होता. पोलिसांनीही पुरावा नसल्यामुळे आरोपींना सोडावे, असा अहवाल पाठविला होता. परंतु सरकारतर्फे अ‍ॅड. कालेकर यांनी अत्यंत कौशल्याने हा खटला चालवून आरोपींना शिक्षा मिळवून दिली. शासनाने त्यांना अनेक खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केले होते. नव्वदीत असूनही अ‍ॅड. कालेकर यांनी प्रकृती चांगली जपली आहे. रोज पहाटे फिरायला जाण्याचा छंद गेल्या ६५ वर्षापासून त्यांनी आजतागायत जोपासला आहे.