Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘डी मार्ट’ व्यापारी संकुलप्रकरणी चौकशी अधिकारी नियुक्त
सांगली, २३ जून / प्रतिनिधी

 

‘डी मार्ट’ या व्यापारी संकुलाला अंतिम मंजुरी देण्याबरोबरच इतर बाबींची चौकशी करण्यासाठी उपायुक्त विजय कुलकर्णी यांची नियुक्ती केली असून येत्या दहा दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी मंगळवारी दिले.
शंभर फुटी रस्त्यावरील डी मार्ट या व्यापारी संकुलाच्या बांधकामावरून नुकत्याच झालेल्या महासभेत जोरदार चर्चा झाली होती. मंजूर विकास आराखडय़ात या व्यापारी संकुलाच्या जागेवर आरक्षण होते. हे आरक्षण विकसित करताना या जागेतील १५ टक्के जागेवर व्यापारी संकुल उभारून ते महापालिकेच्या ताब्यात देण्याची अट घालण्यात आली होती. पण संबंधित मालमत्ताधारकाने महापालिकेच्या ताब्यात जागा न देताच बांधकाम केले. महापालिका अधिकाऱ्यांनीही कायदेशीर बाबींची तपासणी न करता या व्यापारी संकुलाला अंतिम मंजुरी दिली होती. याप्रकरणी महासभेत महापौर मैनुद्दीन बागवान यांनी चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आयुक्त श्री. मेतके यांनी चौकशी अधिकारी म्हणून उपायुक्त विजय कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. येत्या दहा दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल देण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित पाणी योजनांबाबत मुंबईत बैठक झाली असून या योजनांना लवकरच गती मिळेल, असे सांगत आयुक्त श्री. मेतके म्हणाले की, पाणी योजनेसाठी १४ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने दिला होता. तो एक वर्ष पडून होता. महापालिकेकडे योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार घेण्यात आले असून जीवन प्रश्नधिकरण सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.
सुजल निर्माणमधूनही २४ कोटी रुपये उपलब्ध झाले असून त्यातून पाईपलाईन दुरुस्तीचे काम प्रश्नधान्याने केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गुंठेवारी भागात पाणी कनेक्शन देण्याच्या निर्णयामुळे महापालिकेला नव्याने २५ हजार ग्राहक मिळतील. त्यातून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.