Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

साखरवाडी शेतमळ्याचे उत्पन्न ५५ लाखांवर
फलटण, २३ जून / वार्ताहर

 

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाने एक वर्षापासून कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतल्याने महामंडळाच्या राज्यातील १३ ऊसमळ्यावरील हजारो एकरक्षेत्र पडून आहे. अशा परिस्थितीत साखरवाडी ऊसमळ्याच्या व्यवस्थापनाने कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता या वर्षी फळबाग व अन्य पिकांद्वारे सुमारे ५५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळविले आहे.
याबाबत साखरवाडी ऊसमळ्याचे स्थावर व्यवस्थापक सुरेश माने यांच्याशी संपर्क साधला असता. महामंडळाच्या साखरवाडी मळ्यावर एकूण ६ हजार ११८ एकर क्षेत्र असून त्यापैकी मशागतीयोग्य ३ हजार ७६० एकर आणि पडीक २ हजार ३५८ एकर क्षेत्र आहे. या एकूण क्षेत्रापैकी १२९२ एकर क्षेत्र महामंडळाच्या मालकीचे असून ४ हजार ८२६ एकर क्षेत्र खंडक ऱ्यांच्या मालकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाने पडीक क्षेत्र मशागतीखाली आणण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी पडीक क्षेत्रावर निलगिरीची सुमारे १ लाख, सागाची ६ हजार ६३६ आणि लिंब, बाभूळ व अन्य ४५०० झाडे लावली आहेत. त्यापैकी निलगिरीची झाडे २ वेळा तोडून विकली असून या वर्षी तिसऱ्या तोडणीच्या लिलावातून महामंडळाला ५२ लाख ५९ हजार आणि अन्य झाडांचे ७४ हजार असे एकूण ५३ लाख ३३ हजारांचे भरीव उत्पन्न मिळाल्याचे माने यांनी सांगितले.
महामंडळाच्या साखरवाडी ऊसमळ्यातील क्षेत्रापैकी २० एकर क्षेत्रावर आंब्याची ९३० झाडे असून त्यापासून या वर्षी १ लाख ३८ हजार रुपये, १६ एकर क्षेत्रावरील नारळाच्या १४११ झाडांपासून ५ हजार रुपये, १४ एकर क्षेत्रावरील सीताफळाच्या १०२७ झाडांपासून २८ हजार रुपये आणि ५ हजार एकर क्षेत्रावरील पेरूच्या ६६० झाडांपासून ५० हजार रुपये असे सुमारे ५५ एकर क्षेत्रातील फळबागांपासून या वर्षी महामंडळाला सुमारे २ लाख २१ हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
१९८२ मध्ये महामंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळाने पर्यावरणाचा समतोल राखण्यास महामंडळाच्या पडीक क्षेत्राचा उपयोग करून घेण्यासाठी महामंडळाच्या विविध मळ्यांवर निलगिरी, चिंच, आंबा अशी अनेक प्रकारची झाडे त्याचप्रमाणे फळबागाही केल्या होत्या. त्यातून महामंडळाला आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपयांचे उत्पन्न कोणतीही विशेष आर्थिक गुंतवणूक न करता आणि झाडासाठी वेगळा कसलाही खर्च न करता मिळाला असल्याचे महामंडळाचे माजी संचालक डी. के. पवार यांनी सांगितले.
महामंडळाने कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतल्याने १ वर्षापासून महामंडळाच्या राज्यातील विविध मळ्यावरील हजारो एकरक्षेत्र आज पडून आहे. त्या पाश्र्वभूमीवर कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता साखरवाडी ऊसमळ्याच्या व्यवस्थापनाने या वर्षी फळबाग व अन्य पिकांद्वारे ५५ लाखांहून अधिक उत्पन्न घेण्याच्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे.