Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांची खानापूर-आटपाडीत आढावा बैठक
आटपाडी, २३ जून / वार्ताहर

 

निवडणुकीपूर्वी मते मागण्यासाठी आलेले खासदार निवडून गेल्यानंतर सहा महिने अथवा वर्षातून धूमकेतूप्रमाणे दर्शन देणाऱ्या खासदारांची सवय असलेल्या आटपाडी तालुक्यातील जनतेला खासदार प्रतीक पाटील यांनी आश्चर्याचा धक्का दिला. निवडून आल्यानंतर तसेच केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ खानापूर-आटपाडी तालुक्याची आढावा बैठक घेतल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
या आढावा बैठकीत प्रतीक पाटील यांनी आजी-माजी आमदार, तानाजी पाटील व प्रदीप पाटील यांच्या सहकार्यामुळे या परिसरात मताधिक्य मिळाल्याचे स्पष्ट केले. वसंतदादांना मानणारी जनता व राहुल गांधी यांच्याकडे आशेने पाहणारा तरुणवर्ग या सर्वाशी जवळीक साधावी, जनतेच्या प्रश्नांची माहिती व्हावी, यासाठी ही बैठक घेतली. आता जिल्हय़ातील सर्व तालुक्यांत बैठका घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
वास्तविक पाहता ही बैठक विटा येथे होणार होती. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ती आटपाडी येथे घेण्यात आली. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला बोचरा पराभव व त्यानंतर आलेली मरगळ झटकून देत तानाजी पाटील यांनी एकहाती किल्ला लढवित तालुक्यातून काँग्रेसला आघाडी दिली. प्रतीक पाटील यांच्या विजयाने तानाजी पाटील यांच्या गटाला बळ मिळाले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या सहकार्याने तानाजी पाटील यांनी प्रतीक पाटील यांना आढावा बैठकीद्वारे आटपाडीत आणून अनेक प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. खासदारांच्या रूपाने विकासाचे माध्यम त्यांना उपलब्ध झाले आहे.
पाणीप्रश्न, रस्ते, विहिरी, बंधारे, एसटी, तेल्याचे पॅकेज, शेतकरी अपघात विमा, आटपाडीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, त्यासाठी एक्स्प्रेस फिडर, औद्योगिक वसाहत या व अन्य समस्या तब्बल चार तास खासदारांनी जाणून घेतल्या. काही समस्यांचे जागेवर निवारण झाले. काही समस्या पुढील काळात सुटतील, असे संकेत मिळाले. याप्रमाणे आगामी काळातही बैठक घेण्याचे खासदारांनी सांगितल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठी टेंभू योजना पूर्ण करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रीय जलआयोगाची मंजुरी तातडीने मिळावी, याकरिता प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. मंत्रिपदानंतर झालेला दौरा अपवादात्मक ठरू नये व निवडणुकीदरम्यान झालेला निष्क्रियतेचा आरोप चुकीचा असल्याचे सिद्ध करीत तालुक्याच्या विकासाला खासदारांनी चालना द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.