Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दलितांच्या कर्जमाफीसाठी वेगळा विचार करावा लागेल - प्रश्न. सकटे
सोलापूर, २३ जून / प्रतिनिधी

 

जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी आपण राज्यातील काँग्रेस आघाडीला दोनवेळा पाठिंबा दिला आणि आपल्या मागणीप्रमाणे दलितांसाठी कर्जमाफी झाली खरी; परंतु ही कर्जमाफी सरसकट न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रश्न. मच्छिंद्र सकटे यांनी दिला. तसेच दलित ऐक्याची सुरुवात करण्यासाठी पुण्यात बैठक बोलावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मोहोळ येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्याची आमची निश्चित राजकीय भूमिका आहे. म्हणूनच आपण १९९९ सालापासून काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र काँग्रेस आघाडीने पुढे दलितांची अक्षरश फरफट केल्यामुळेच गेल्या २००६ साली आम्ही राष्ट्रवादीशी संबंध तोडल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्थापितांनी दलितांच्या कल्याणकारी योजनांची लूट केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनाच दोषी धरावे, असेही मत प्रश्न. सकटे यांनी व्यक्त केले.
राज्यात काँग्रेस आघाडीकडून येत असलेल्या वाईट अनुभवाच्या पाश्र्वभूमीवर वेगळा विचार करण्यासाठी आणि दलित ऐक्य साधण्यासाठी आपण पुढाकार घेत असल्याचे स्पष्ट करताना या संदर्भात पुण्यात बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.