Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मान्सूनपूर्व पावसाने माण तालुक्यात दीडशे एकर डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त
पाच कोटींचे नुकसान
सातारा, २३ जून/प्रतिनिधी

 

माण तालुक्यात नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व गारांच्या पावसाने सुमारे १५० एकर क्षेत्रातील डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून, पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महावीर जंगटे यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली व पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे झाल्यानंतर त्याचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाईल व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाईची मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
महावीर जंगटे यांनी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग माणदेश विकास फाऊंडेशन, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाने आयोजित केलेल्या दौऱ्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांची पाहणी केली. या दौऱ्यात कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ. डी. एम. सावंत, कृषितज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र पिंजारी, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाचे संचालक उद्धव बाबर, दिलीपभाऊ माने, माण तालुका कृषी अधिकारी राजेंद्र माने सहभागी झाले होते.
वादळी वारा, गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याने डाळिंब उत्पादकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक फळझाडांची पाने, फुले गळून पडली. उमललेल्या कळय़ाही डागळल्या गेल्या.
अनेक झाडे मुळापासून उखडली गेली. अनेक झाडांच्या साली निघाल्या आहेत. आपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी परिस्थितीशी सामना करण्याबाबत मार्गदर्शन केले.