Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेत योग्य समन्वयाची गरज- कुपेकर
गडिहग्लज, २३ जून / वार्ताहर

 

ग्रामीण स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या २० ते २५ वर्षापूर्वी विदारक चित्र होते. आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असणारी निर्मलग्राम योजना राबविण्यासाठी शासकीय यंत्रणेला आजही इतके परिश्रम घ्यावे लागतात याची खंत वाटते. लोकशाहीमध्ये विकासरथ प्रगतिपथावर नेण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा यांच्यात योग्य समन्वयाची गरज असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी केले.
येथील पंचायत समितीमार्फत आयोजित निर्मलग्राम पुरस्कार वितरण व आशा स्वयंसेविका नियुक्ती आदेश वितरण समारंभात श्री.कुपेकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तालुक्यातील ५१ गावांना निर्मलग्राम पुरस्कार देऊन बाबा कुपेकरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रश्नतिनिधीक स्वरूपात पाच आशा स्वयंसेविकांना नियुक्ती आदेश देण्यात आले. श्री.कुपेकर म्हणाले, कोल्हापूर जिल्हा ९८ टक्के निर्मलग्राम घोषित केला आहे. पन्हाळा, कागल, गगनबावडा हे तीन तालुके १०० टक्के निर्मलग्राम झालेले आहेत. हातकणंगले शिरोळसह सधन व सुशिक्षित म्हणून ओळखला जाणारा गडिहग्लज तालुका पाठीमागे असल्याची खंत वाटते. तालुक्यातील २८ गावे अद्याप निर्मलग्राम व्हायची आहेत. तालुका १०० टक्के निर्मलग्राम करण्यासाठी सर्व घटकांनी योग्य समन्वयातून आपले योगदान दिले पाहिजे. निर्मलग्राम झालेल्या गावामध्ये काही ठिकाणी संडासामध्ये गवत व शेणी भरून ठेवल्याचा प्रकार आढळतो. ही मोठी शोकांतिका असून त्यांच्या अज्ञानाची किव येते. असा प्रकार होत असेल तर पंचायत समितीने निर्मलग्राम झालेल्या गवांचे पुनर्मुल्यांकन करावे असे श्री.कुपेकरांनी सांगितले. प्रश्नस्ताविकामध्ये जि.प.चे बांधकाम सभापती संग्राम कुपेकर यांनी निर्मलग्राम योजनेचा आढावा घेतला. उपसभापती दीपक जाधव यांनी स्वागत केले. यावेळी जि.प.सदस्य वसंतराव नंदनवाडे, गणपतराव डोंगरे, सुधाताई गवळी, पं.स.सदस्य बाळासाहेब देसाई, अरुण देसाई, दयानंद पट्टनकुडी, बाळेश नाईक, बी.एन.पाटील, शिवाजी खोत, टी.आर.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी परिक्षित यादव यांनी आभार मानले.