Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सांगलीतील बंद सूतगिरण्यांच्या मागण्यांसाठी शेकापचा मोर्चा
सांगली, २३ जून / प्रतिनिधी

 

सांगली जिल्ह्य़ातील बंद पडलेल्या सूतगिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने मिरज तालुका गिरणी कामगार संघाचे सचिव अ‍ॅड. अजित सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सांगली- मिरज परिसरातील सूतगिरण्या बंद पडल्यामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत. जिल्ह्य़ातील माधवनगर कॉटन मिल १९९४ ला बंद पडली. तेव्हा १६५० हून अधिक कामगार बेकार झाले. तसेच अन्य सूतगिरण्याही बंद पडल्यामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. कामगारांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य कराव्यात. अन्यथा, आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा या मोर्चामध्ये देण्यात आला. कामगारांच्या कुटुंबीयांना दारिद्रय़ रेषेखालील रेशनकार्ड मिळावे, राज्य शासनाच्यावतीने घरकुले मिळावीत, कामगारांच्या मुलामुलींना शैक्षणिक मदत मिळावी, कामगारांची थकित देणी द्यावीत या मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या मोर्चाची सुरूवात कामगार भवन येथून झाली व हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रश्नंगणात आल्यानंतर सभा सुरू असतानाच अ‍ॅड. अजित सूर्यवंशी यांना भोवळ आली. त्यामुळे कामगारांच्यात चिंतेचे वातावरण पसरले. अ‍ॅड. सूर्यवंशी यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. या मोर्चामध्ये आसिफ इनामदार, रत्नाकर गोंधळी, गुलाब इनामदार, अ‍ॅड. तेजस्विनी सूर्यवंशी यांच्यासह सूतगिरणी कामगारांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.