Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यातील बहुतांश नद्या प्रदूषित - डॉ. नीलम गोऱ्हे
कोल्हापूर, २३ जून/प्रतिनिधी

 

पंचगंगा नदीच नव्हे तर राज्यातील बहुतांशी नद्या कमीअधिक प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांच्या पात्रातील वाळूचा बेकायदा आणि वारेमाप उपसा होत आहे. पण हे सर्व टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे राजकीय इच्छाशक्तीची वानवा आहे, अशा शब्दांत राज्य शासनावर शिवसेनेच्या आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना टीका केली. शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना, तसेच मोर्चाला उपस्थित राहाण्यासाठी डॉ.गोऱ्हे या दौऱ्यावर आल्या आहेत.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मी पंचगंगा नदीसह राज्यातील इतर नद्यांच्या प्रदूषणाचा विषय उपस्थित केला होता. जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. पण या प्रश्नाकडे राज्य शासन गांभीर्याने पाहात नाही. शासनाकडे राजकीय इच्छाशक्तीच नाही, असे डॉ.गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले. कोल्हापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील देवस्थानांचा विकास करणे गरजेचे आहे. पंढरपूरच्या विकासासाठी जसा कायदा केला आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या देवस्थानच्या विकासासाठी कायदा केला पाहिजे. कोल्हापूरचे अनेक प्रश्न आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते सोडविले गेलेले नाहीत. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील काय करतात, असा सवाल उपस्थित करून कोल्हापुरातील अन्य मंत्र्यांशी पालकमंत्र्यांचा समन्वय नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची संधी सोडू नये, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात २०० पेक्षा अधिक निरपराध लोक मरण पावले आहेत. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी गठीत केलेल्या राम प्रधान समितीने या निष्पाप लोकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांच्या सांत्वनाचे काम फारसे झाले नाही, याबद्दल खुद्द प्रधान यांनीच लेख लिहून नापसंती व्यक्त केली आहे. हा २६/११ चा हल्ला परतवून लावण्यात राज्य शासनाला पूर्णपणे अपयश आले. ज्यांच्यामुळे हे अपयश आले त्यांच्यावर कारवाई कठोरपणाने झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पतसंस्थांमध्ये, जिल्हा बँकांमध्ये शेकडो कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. घोटाळे करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचेच संरक्षण आहे, असे स्पष्ट करून डॉ.गोऱ्हे यांनी बचतगटांचे रूपांतर मताच्या पेटय़ांमध्ये केले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याला सुरूंग लागलेला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सदाशिवराव मंडलिक यांना या मतदारसंघातील जनतेने काँग्रेस आघाडीविरुद्धचा असंतोष म्हणून निवडून दिले आहे. मात्र सदाशिवराव मंडलिक यांनी निवडून येताच काँग्रेसला पाठिंबा देऊन मतदारांशी प्रतारणा केली असल्याचा आरोप डॉ.गोऱ्हे यांनी या वेळी बोलताना केला. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घटली. हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला फारच कमी मते पडली. हे का घडले याची चौकशी केली जाईल. विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार उभे केले जातील. त्याचा निर्णय शिवसेनेचे कार्याध्यक्ष व इतर नेतेमंडळी घेतील. मी स्वत: निर्णयप्रक्रियेत असत नाही, असे डॉ.गोऱ्हे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.