Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘राज्यातील बेरोजगारांना नोकरीसाठी शस्त्रपरवाने उपलब्ध करून द्यावेत’
सांगली, २३ जून / प्रतिनिधी

 

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये बेरोजगार युवकांना नोकरीसाठी शस्त्रपरवाने दिले जातात. पण महाराष्ट्रात शस्त्रपरवाने देताना प्रशासनाकडून अडवणूक केली जात आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांना नोकरीसाठी शस्त्रपरवाने उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा मनसेस्टाइल आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क नेते सुनील बसाखेत्रे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिला.
महाराष्ट्रातील बँका, एटीएम यासह अनेक ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक म्हणून परप्रश्नंतीयांची संख्या मोठी आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये शस्त्रपरवाने तत्काळ दिले जात असल्याने तेथील युवकांना कोठेही उदरनिर्वाहाचे साधन मिळू शकते. पण महाराष्ट्रात शस्त्रपरवाने देताना अडवणूक केली जात असल्याने बेरोजगारांना सुरक्षारक्षक म्हणून नोकरी मिळू शकत नाही. परप्रश्नंतीयांच्या बाबत राज्य शासनाची भूमिका दुटप्पी असून राज्यातील बेरोजगारांना नोकरीसाठी शस्त्रपरवाने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही श्री. बसाखेत्रे यांनी केली. सांगली जिल्ह्य़ात मनसेची बांधणी करण्यासाठी पक्षसंघटनेतील उणिवा लवकरच दूर केल्या जातील, असे सांगून जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघांत मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या वेळी श्री. बसाखेत्रे यांनी जिल्हा कार्यकारिणीचीही घोषणा करीत शहर उपाध्यक्षपदी धीरज घोडके, सुनील शेवाळे, दर्शन फाटक यांची निवड जाहीर केली.