Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

साताऱ्यात जनवादी महिला संघटनेच्या वतीने निदर्शने
सातारा, २३ जून/प्रतिनिधी

 

घरकामगारांच्या हिताचे विधेयक मंजूर करावे या मागणीसाठी जनवादी महिला संघटनेच्यावतीने घरकाम करणाऱ्या महिलांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड अंजली महाबळेश्वरकर यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण यांना निवेदन सादर केले.
घरकामागारांना पेन्शन योजना लागू करावी. आठवडय़ाची सुट्टी व आजारपणाच्या सात रजा मिळाव्यात. बोनस व गरज लागल्यास उचल रक्कम मिळावी. कामाचे तास ठरवून त्याप्रमाणे वेतन मिळावे. घरकामागारांना माथाडी कामगार कायदा लागू करावा. घर कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे. घरकामगार संघटनेचे प्रतिनिधी जिल्हा व राज्य समितीवर घ्यावेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे उलटली तरी कोटय़वधी लोक दारिद्रय़रेषेखाली जीवन जगत आहेत. चुकीच्या अर्थव्यवस्थेमुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी वाढत आहे. दिवसेंदिवस निवाऱ्याचा प्रश्न उग्ररूप धारण करत आहे.
घरकामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या मदतीतून घरे मिळाली पाहिजेत. दारिद्रय़रेषेखालील यादीत सर्व घरकामगारांची नावे आली पाहिजेत व त्यांना पिवळी रेशनकार्ड मिळाली पाहिजेत. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.