Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

घोडावत इन्स्टिटय़ूटमध्ये अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम
इचलकरंजी, २३ जून / वार्ताहर

 

अतिग्रे (ता. हातकणंगले) या गावात चालू शैक्षणिक वर्षापासून संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संकुलाची अभियांत्रिकी पदवी व व्यवस्थापनशास्त्र या अभ्यासक्रमाने सुरुवात होत आहे. शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालय (एआयसीटी)ची मान्यता मिळाली असून, चार वर्षात जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी महाविद्यालय बनविण्याचा संकल्प आहे, अशी माहिती सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उद्योगपती विनोद घोडावत व नीता घोडावत यांनी पत्रकार बैठकीत सांगितली.
अतिग्रे येथील सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षणसंकुल उभारण्याचा संकल्प संजय घोडावत यांनी केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी घोडावत परिवाराने अल्पावधीतच या उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या कुशीत ११३ एकर जागेवर संकुलाची उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे.
चालू शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंग डिग्री व एमबीए या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी साठ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक इमारत, भव्य क्रीडांगण, कॉम्प्युटर लॅब, सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल लॅब, इंग्रजी लँग्वेज लॅब, एलसीडी प्रश्नेजेक्टी सॅटेलाईट, लेक्चर हॉल आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.