Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

तिसऱ्या आघाडीचा पाय कुणाच्या पायात?
स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी करण्याची घोषणा केली आहे. त्यांना पहिले साथीदार लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील लाभले आहेत. तिसऱ्या आघाडीतील पक्षांकडे असणारा हट्टीपणा व दुराग्रहीपणा या आघाडीच्या स्थापनेचा नारळ फोडतानाच दिसून आला. अपारंपारिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना या तिसऱ्या आघाडीत स्थान असणार नाही, असे तेथेच शेट्टी यांनी स्पष्ट केले.

मनसे महिला सेनेच्या अध्यक्षपदी शालिनी ठाकरे?
मुंबई, २३ जून / खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला आघाडी तसेच कामगार सेनेची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आता महिला आघाडीच्या अध्यक्षपदी शालिनी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. कामगार संघटनेच्या अध्यक्षपदासाठी ठाणे येथील मनसेचे लोकसभेचे उमेदवार राजन राजे यांचा विचार करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कामगार व महिला संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून संघटना बांधणीला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

कोळसा व गॅससाठी राज्याचे केंद्राला साकडे
१०० दिवसांत ५६५३ मेगावॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य -सुशीलकुमार शिंदे
नवी दिल्ली, २३ जून/खास प्रतिनिधी
देशात कोळसा उपलब्ध होत नसल्यामुळे राज्यातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी परदेशातून महागाचा कोळसा आयात करावा लागत असल्याने महावितरणावर आर्थिक दबाव वाढत आहे. राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोळसा व गॅसचा तातडीने पुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी आज ऊर्जा मंत्र्यांच्या परिषदेत केली.

पवारांची धोरणे शेतकरी विरोधी -खासदार राजू शेट्टी
बुलढाणा, २३ जून / वार्ताहर

देशाचे कृषीमंत्री शरद पवार यांचे कृषीविषयी धोरण शेतकरी विरोधात आहे. कर्जमाफीच्या यशाचे श्रेय लाटण्याचा ते प्रयत्न करतात. त्यासोबत कर्जमाफीच्या अपयशाची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे. ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्या शेतकऱ्यांसाठी व जिल्हा बँकांचे चांगभले करण्यासाठी होती, असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व हातकणंगले मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजू शेट्टी यांनी केला. येथील विश्राम भवनावर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन अमदाबादकर, रविकांत तुपकर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

हदगाव
काँग्रेसमधील गटबाजी शिवसेनेच्या फायद्याची
गणेश कस्तुरे

नांदेड जिल्ह्य़ात असलेल्या; परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हदगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मतांचे विभाजन होऊन सतत तीन वेळा शिवसेनेने विजय मिळविला असला तरी दिवसेंदिवस कमी होणारे मताधिक्य शिवसेना नेत्यांसाठी डोकेदुखी झाली आहे. काँग्रेसमधील गटबाजी कायम राहिल्यास त्याचा फायदा घेऊन मतदारसंघात पुन्हा भगवा फडकाविण्यासाठी शिवसेनेचे नेते यशस्वी होतील असे मानले जाते. हदगाव विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला.

आघाडी होणार की बिघाडी?
काँग्रेसमध्ये संभ्रम!
मुंबई, २३ जून / खास प्रतिनिधी
‘एकला चलो’ की आघाडी याबाबत पक्षाचे नेतेच परस्पर विधाने करीत असल्याने काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. राष्ट्रवादीवर दबाव वाढविण्याचा भाग म्हणूनच काँग्रेसमधून परस्परविरोधी भूमिका घेतली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू नये, अशी भूमिका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख हे सातत्याने करीत आहेत.

हुसेन यांच्या आक्रमक पवित्र्याने मुख्यमंत्री भांबावले!
नवी मुंबई, २३ जून/ प्रतिनिधी

स्थानिक पातळीवर काम आम्ही करायचे, मात्र झालेल्या कामाचे श्रेय राष्ट्रवादीने घ्यायचे. राज्यात आपण एकत्र सत्तेत आहोत. परंतु ठाणे जिल्ह्य़ात सर्व सत्ताकेंद्र राष्ट्रवादीकडे. अशा परिस्थितीत जिल्ह्य़ात पक्षांतर्गत भांडणे आहेत, म्हणून तुम्ही आमच्याकडे किती दिवस दुर्लक्ष करणार. सगळी सत्ताकेंद्रे राष्ट्रवादीकडे असताना कॉंग्रेस कार्यकर्ता आजही तग धरून आहे, याचे तुम्हाला काही वाटत नाही का...असे एकामागोमाग एक प्रश्न करत कॉंग्रेसचे मीरा-भाईंदरमधील नेते व आमदार मुझ्झफर हुसेन यांनी काल मुख्यमंत्र्यांना भांबावून सोडले.

‘लोकराज्य’ देशात दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई, २३ जून / प्रतिनिधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ‘लोकराज्य’ मासिक देशातील सर्वाधिक खपाचे दुसऱ्या क्रमांकाचे मासिक ठरले आहे. नुकत्याच एबीसीने केलेल्या पाहणीअंती हे सिद्ध झाले असून, ३ लाख ७७ हजार प्रमाणित खप असल्याचे एबीसी प्रमाणपत्र महासंचालनालयाला देण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे मासिक देशातील सर्वाधिक खपाचे प्रथम क्रमांकाचे मासिक ठरेल, असा विश्वास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक व ‘लोकराज्य’च्या मुख्य संपादक मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी व्यक्त केला आहे. पूर्वी कृष्णधवल असलेले ‘लोकराज्य’ १ नोव्हेंबर २००६ मध्ये रंगीत झाले. आकर्षक मांडणी, अचूक, विश्वासार्ह व लोकाभिमुख आशय आणि ‘घरोघरी ‘लोकराज्य’ मोहीम’ यामुळे या मासिकाला प्रचंड प्रतिसाद लाभला. पावणेचार लाख प्रिंट ऑर्डर असलेले हे देशातील एकमेव शासकीय मुखपत्र आहे. अतिशय दुर्गम भागातदेखील ‘लोकराज्य’ पोहोचले आहे. राज्यात सुमारे १०० गावांनी ‘लोकराज्यग्राम’ म्हणून आपली ओळख निर्माण करून शासनाशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे.