Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

२०० तालुके कोरडे; उडीद, मूग पीके हातची गेली
राज्यातील खरीप पीक संकटात
पुणे, २३ जून / खास प्रतिनिधी
पावसाचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील खरिपाचे पीक संकटात सापडले असून उडीद आणि मूग पीक शेतक ऱ्यांच्या हातून गेले आहे. खरिपाचे तब्बल २०० तालुके पावसाअभावी कोरडे राहिल्याने आतापर्यंत केवळ एक टक्का क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे. पाऊस आणखी काही काळ लांबल्यास शेतक ऱ्यांना पर्यायी पिकांकडे वळावे लागणार आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील जिल्ह्य़ांची खरिपाची स्थिती तुलनेने अधिक बिकटावस्थेत आहे. कोकण आणि नाशिक विभागातील जिल्ह्य़ांतही पावसाच्या विलंबाचा परिणाम जाणवणार आहे.

आफ्रिकी देशांपेक्षाही भारत अधिक भुकाकंगाल
अमर्त्य सेन यांच्या विधानाची देशभरातून दखल
समर खडस
मुंबई, २३ जून

‘‘भारतातील गरिबीचा स्तर आता इतक्या टोकाला गेला आहे की, जागतिक आकडेवारीनुसार भारत हा सर्वाधिक भुकेकंगाल आणि कुपोषित लोकांचा देश आहे. टक्केवारीच्या हिशेबात तर अनेक गरीब आफ्रिकी देशांपेक्षाही भारताची स्थिती अत्यंत दयनीय आहे.’’ नोबेल पारितोषिक सन्मानित डॉ. अमर्त्य सेन यांनी दोन दिवसांपूर्वी केम्ब्रीज विद्यापीठाने आयोजिलेल्या त्यांच्या विशेष सन्मान सोहळ्यानंतर भारताचे वर्णन असे केले. सेन यांच्या मुलाखतीचे पडसाद देशभरात उमटले असून विविध अर्थतज्ज्ञांनी भारतातील गरिबीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कोकण विकासासाठी विशेष पॅकेज
ओरोस येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घोषणा
मुंबई, २३ जून / खास प्रतिनिधी
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशपाठोपाठ कोकणासाठी विशेष पॅकेज उद्या सिंधुदुर्गचे मुख्यालय ओरोस येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केले जाणार आहे. कोकणाच्या विकासासाठी पुढील दोन-तीन वर्षांंकरिता सुमारे दोन ते अडीच हजार कोटींचे पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीसह कुडाळमध्ये काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संपर्क यात्रेचाही प्रारंभ केला जाणार आहे.

ऑनलाईन प्रवेशाला ‘पाठबळ’ शक्तिशाली सव्‍‌र्हरचे!
पुणे, २३ जून/खास प्रतिनिधी

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाकरिता शक्तिशाली सव्‍‌र्हरचे भरभक्कम पाठबळ पुरविण्यात आले असून अमेरिकेतील डेटाबेस सव्‍‌र्हरची विशेष मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे एकाच वेळी लाखो विद्यार्थी ऑनलाईन आले, तरीही प्रक्रियेमध्ये कोणताही खंड पडण्याची शक्यता नसल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रवेशाचा मुंबईतील प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील वर्षीपासून राज्यभर अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यामुळेच मुंबईतील प्रवेशांकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

‘एसआरए’चे १० कोटी स्टेट बँकेने परस्पर तिसऱ्यालाच दिले!
अजित गोगटे
मुंबई, २३ जून

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (एसआरए) एक वर्षांच्या मुदत ठेवीत ठेवण्यासाठी म्हणून दिलेली १० कोटी रुपयांची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वागळे इस्टेट (ठाणे) शाखेने सर्वधर्म मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट या ठाण्यातील एका विश्वस्त संस्थेला परस्पर देऊन टाकल्याचे एक धक्कादायक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापुढे आले असून स्टेट बँकेने १० कोटी रुपये कोर्टात जमा करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

‘रेडिओ कॉलरिंग’साठी वन अधिकारी अनुकूल
आतापर्यंत टाळाटाळ का? - वन्यजीवतज्ज्ञांचा सवाल

राखी चव्हाण, नागपूर, २३ जून

‘रेडिओ कॉलरिंग’ची प्रक्रिया महागडी असून त्याची फारशी गरज वाटत नसल्याने राज्यात अजूनपर्यंत त्याचा प्रयोग करण्यात आला नाही, असे राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव व प्रशासन) ए.के. सक्सेना यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. असंरक्षित क्षेत्रातील तीन वाघीण व नऊ बछडय़ांच्या भवितव्याबाबत छेडले असता, गरज पडेल तेव्हा नक्कीच ‘रेडिओ कॉलरिंग’चा प्रयोग राज्यात राबवण्यात येईल, अशी सारवासारव सक्सेना यांनी केली. वाइल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ डॉ. के. शंकर म्हणाले, इतर राज्यांना रेडिओ कॉलरिंगची सुविधा पुरवली जात आहे तर, महाराष्ट्राच्या वन विभागाला रेडिओ कॉलरिंग किंवा सॅटेलाईट कॉलरिंगसाठी मदत करण्यास आमची काहीच हरकत नाही.

शिवसेनाप्रमुख मातोश्रीवर!
मुंबई, २३ जून/प्रतिनिधी

श्वसनाच्या विकारामुळे गेले सहा दिवस लीलावती रुग्णालयात उपचाराकरिता दाखल असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज सायंकाळी डॉक्टरांनी घरी जाण्यास अनुमती दिली. ‘मातोश्री’वर ठाकरे दाखल होताच राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
श्वसनाच्या विकारावरील उपचाराकरिता ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार-पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यावर ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांना दोन दिवस देखरेखीखाली ठेवल्यावर डॉक्टरांनी आज सायंकाळी घरी जाण्यास परवानगी दिली. यावेळी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे सोबत होते. ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले तेव्हा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दूरध्वनी करून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उद्धव ठाकरे यांच्याशीही राष्ट्रपतींनी चर्चा केली.

रेल्वे रूळ ओलांडल्याबद्दल सात दिवसांचा तुरुंगवास
मुंबई, २३ जून / प्रतिनिधी

रेल्वे रूळ ओलांडल्याबद्दल विरार येथील रेल्वे कोर्टाने प्रकाश पाठक नावाच्या एका मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला सात दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. रेल्वे रूळ ओलांडल्याबद्दल एखाद्या व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षा होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. पाठक यांची ठाणे तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. याखेरीज रेल्वे रुळ ओलांडताना पकडलेल्या राजू गेडिया (३३) आणि दीपक राय (३५) या अन्य दोन प्रवाशांनाही न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दीपक राय यांना न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत तर राजू गेडिया यांना तीन दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी