Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

तीन नगरसेवक निलंबित
‘संभाजीनगर’वरून पालिका सभेत गदारोळ
औरंगाबाद, २३ जून/प्रतिनिधी
शिवसेनेच्या एका सदस्याने औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा केला आणि महानगरपालिकेच्या आजच्या सभेत एकच गदारोळ झाला. पालिकेच्या सभागृहात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे सदस्य नेहमीच ‘संभाजीनगर’ असा उल्लेथ करतात. याला विरोधी पक्षाचे सदस्य कधीच आक्षेप घेत नाहीत. आज मात्र अपक्ष सदस्य मुजीब आलम शहा, जावेद कुरेशी आणि काँग्रेसचे सलीम मौला यांनी यास विरोध केला. बाकांवर उभे राहून जोरदार घोषणा दिल्याने या तिघांचे सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द करण्यात आले.

सिंचनक्षमता
काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने २००८-०९चा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर केला. या अहवालात सामाजिक आणि आर्थिक विकासाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. कृषी आणि सिंचन याबाबतची वस्तुस्थितीसुद्धा स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने कृषी आणि सिंचन हा एक चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्राची अन्नधान्याची उत्पादकता देशाच्या उत्पादकतेच्या तुलनेने फक्त ५० टक्के आहे. देशात सिंचनक्षमतेचे प्रमाण ४० टक्के आहे. महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण आजही फक्त १६ टक्के आहे. दुसऱ्या सिंचन आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात अंदाजे १ कोटी २६ लाख हेक्टर म्हणजेच एकूण लागवडीखालील क्षेत्राचे ५५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य आहे.

सर्वाची मते घेऊनच निर्णय - चव्हाण
महापौरपदाचे इच्छुक मुख्यमंत्र्यांना भेटले
नांदेड, २३ जून/वार्ताहर
महापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ द्या, त्यानंतर सर्व नगरसेवकांची मते घेऊन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.महापौर बलवंतसिंग गाडीवाले यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. ‘गाडीवाले हटाव मोहिमे’ची धुरा सांभाळणाऱ्या श्री. अजयसिंह बिसेन यांनी आज मुंबईत श्री. चव्हाण यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केले.

बाराशे शाळांची आज तपासणी
नांदेड, २३ जून/वार्ताहर

जिल्हा परिषदेच्या बाराशे शाळांची उद्या (बुधवारी) एकाच दिवशी तपासणी होणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या आदेशानुसार ही तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्वाना शिक्षण मोहिमेत देण्यात येणारे साहित्य, मोफत पाठय़पुस्तके, गणित, इंग्रजी, विज्ञान पेटय़ा, पाढे, तक्ते, आनंददायी वाचन कार्डस व अन्य साहित्य शाळेवर वेळीच न पोहोचणे, काही शाळांत त्याचा वापर न करणे आदी बाबी निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभीच तपासणी करण्याचा आदेश दिला.

टोपे पिता-पुत्र बॅकफूटवर!
लक्ष्मण राऊत
जालना, २३ जून

जिल्ह्य़ातील नगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव टोपे आणि संपर्कमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशाची त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी पर्वा केली नाही! अंबड, भोकरदन आणि जालना या तिन्ही नगरपालिकांमध्ये हाच अनुभव आला.

साखर कारखान्यांनीच जिल्हा बँकेला गंडा घातला
सुहास सरदेशमुख
उस्मानाबाद, २३ जून

घोटाळ्यांमुळे जिल्हा सहकारी बँक बदनाम झाली, पण खऱ्या अर्थाने बँकेला गंडा घातला तो साखर कारखानदारांनी! त्यांनी २ अब्ज ९५ कोटी ७९ लाख रुपये कर्ज म्हणून उचलले. त्याची परतफेड मात्र धीम्या गतीने. परिणामी शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याची पतदेखील बँकेकडे राहिली नाही. जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने कारखानदारांकडून तारण न घेताच कर्जपुरवठा केल्याचेही सर्वज्ञात असतानाही कारवाई काहीच झाली नाही.

आत्मपरीक्षण करा - वरपूडकर
सत्तास्थाने ताब्यात असूनही पराभव का झाला?
परभणी, २२ जून/वार्ताहर
सर्व सत्तास्थाने, स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असूनही आपला पराभव का झाला, याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. यापुढे कोणतीही निवडणूक स्वत: न लढविता तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे कृषी खात्याचे राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांनी काल सांगितले.

बोडखेच्या घरातून पिस्तुलासह घातक शस्त्रे जप्त
मानसी देशपांडे खूनप्रकरण
औरंगाबाद, २३ जून /प्रतिनिधी
मानसी देशपांडे हिच्या खुनाच्या गुन्ह्य़ात पोलिसांनी अटक केलेला आरोपी राम बोडखे याच्या घरात एअर पिस्तुल, कोयता, चॉपर, जांबिया, गुप्ती आणि कात्री अशी घातक शस्त्रे तसेच चोरीचे ४ मोबाईल आढळून आले. बोडखे आणि दुसरा आरोपी प्रदीप चंडालिया चालवित असलेल्या ‘पंचम हॉटेल’मध्ये बनावट विदेशी दारू आढळून आली.

सुधीर बांगर यांच्या चित्रप्रदर्शनाचे मुंबईत कौतुक
कळंब, २३ जून/वार्ताहर

शहरापेक्षा खरे सौंदर्य हे ग्रामीण भागातच आहे. हे सौंदर्य शब्दामध्ये चित्रामध्ये रेखाटण्यासाठी कलाकार प्रयत्न करीत असतो. ग्रामीण जीवनाच्या विविध रंगच्छटा साकारण्याचा छंद कळंब तालुक्यातील बांगरवाडी येथील सुधीर बांगर यांनी जोपासला आहे. या तरुण चित्रकाराच्या ब्रशमधून कॅनव्हासवर साकारलेल्या छटा मन मोहून टाकणाऱ्या आहेत. ग्रामीण भागातील या तरुणांच्या रंगच्छटांचे प्रदर्शन नुकतेच मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरले होते. तालुक्यातील येरमाळा गावाजवळ असलेल्या बांगरवाडी या खेडेगावातला सुधीर बांगर याला लहानपणापासूनच चित्र रेखाटण्याचा छंद आहे.

पत्नीचा खून करून तरुणाची आत्महत्या
गेवराई, २३ जून/वार्ताहर

चारित्र्याचा संशय घेऊन गर्भवती पत्नीचा खून करून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील मनुबाई जवळा येथे ही हृदयद्रावक घटना घडली.मनुबाई जवळा येथे महादेव गणपत कांबळे (वय ३२) आई-वडील, पत्नी व लहान मुलासह राहत होता. संशयी स्वभावामुळे महादेवचे पत्नी मंगल (वय २५) हिच्याशी नेहमी भांडण होत असे. काल त्याचे पत्नीबरोबर कडाक्याचे भांडण झाले. दुपारी व रात्री पुन्हा भांडण जुंपले. संतापाच्या भरात महादेव कांबळे याने लोखंडी सळईने मंगलच्या डोक्यात व तोंडावर जोराचे वार केले. डोक्याला मार लागल्यामुळे ती जागीच ठार झाली.काही वेळाने झाल्या प्रकाराचा पश्चात्ताप होऊ लागल्यामुळे महादेवने बाजूच्या वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घडत असताना महादेवचे आई-वडील आणि दीड वर्षांचा मुलगा बाजूच्या खोलीत झोपले होते. तो सकाळी उठून रडू लागल्याने महादेवचे म्हातारे आई-वडील जागे झाले व झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला.

गॅस्ट्रोच्या साथीत वृद्धाचा मृत्यू
निलंगा, २३ जून/वार्ताहर

तालुक्यातील माळेगाव (कल्याणी) येथे गॅस्ट्रोने वृद्धाचा मृत्यू झाला. गोविंद व्यंकट सगर (वय ७५) असे त्यांचे नाव आहे. साथीची १४० गावकऱ्यांना लागण झाली. पावसामुळे सखल भागातील दूषित पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत गेल्याने पाणी दूषित झाले. याच विहिरीतील पाणी गावकऱ्यांनी पिण्यासाठी वापरल्याने रविवारपासून जवळपास १४४ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. शेळके, तहसीलदार भाऊसाहेब मुपडे यांनी गावास भेट दिली.

लेखा व वित्त अधिकारी निलंबित
जालना, २३ जून/वार्ताहर
जिल्हा परिषदेतील सिंचन विभागात झालेल्या नियमबाह्य़ कामातील देयकांच्या गैरव्यवहाराबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामदास मिसाळ याला निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील वित्त विभागाचा आदेश आज आला. जिल्हा परिषदेत सुमारे २३ कोटी रुपयांची सिंचन विभागातील देयके देताना गैरप्रकार झाल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत झाला होता. अन्य काही अभियंते व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई झालेली असली तरी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली नसल्याने सदस्य संतप्त झाले होते.

तरुणाचा भोसकून खून;जालन्यात काही काळ तणाव
जालना, २३ जून/वार्ताहर
देशी दारूच्या दुकानात झालेल्या वादानंतर भगीरथ हुकूमचंद भगत (वय ३१) याचा काल रात्री भोसकून खून करण्यात आला. त्यामुळे शहरात काल रात्री व आज दुपारी काही काळ तणाव होता.जगदीश खट्टर यांच्या देशी दारूच्या दुकानात शिरणाऱ्या पाच-सहा जणांना काल रात्री भगीरथ भगत याने चाकू घेऊन जाण्यास मनाई केली. दुकानात गेलेल्या तरुणांचा पैशावरूनही वाद झाला. त्यानंतर झालेल्या चाकूहल्ल्यात भगीरथचा मृत्यू झाला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. जावेद, सलीम, अमजद, अकील बाबामिया, हमीद अशी त्यांची नावे आहेत.या घटनेनंतर काल रात्रीपासूनच पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविला. भगीरथ भगतवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आज दुपारी शहरातील सुभाष रस्ता, सिधी बाजार, सावरकर चौक आदी मुख्य बाजारपेठेत अफवेमुळे धावपळ झाली. व्यापाऱ्यांनी काही काळासाठी दुकाने बंद केली. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

रेल्वे फाटकाला दुचाकीची धडक; १ ठार
अंबाजोगाई, २३ जून/वार्ताहर

अंबाजोगाई-अहमदपूर रस्त्यावरील बंद रेल्वे फाटकाला मोटरसायकल धडकून मध्यरात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. मृताचे नाव रामचंद्र बाबुराव मोरे (वय ३०, सायगाव, तालुका कन्नड) आहे. ते अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयात काम करीत होते. परळीहून हैदराबादकडे डिझेल इंजिन जात असल्याने हे फाटक बंद करण्यात आले होते. मोरे दुचाकीवरून (क्रमांक एमएच १४ झेड २७९४) गावाकडे जात होते. फाटक बंद बंद असल्याचे दिसले नाही. दुचाकी रेल्वे गेटवर जाऊन आदळल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे ते जागीच मरण पावले.

आदेश न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी
उमरगा, २३ जून/वार्ताहर
कोणत्याही खासगी वाहनावर वाहन परवाना क्रमांकाशिवाय इतर शीर्षक लिहिल्यास त्यावर परिवहन विभागाने व पोलीस खात्याने कडक कारवाई करावी, असा सरकारी आदेश असतानाही शहर व परिसरात याची पायमल्ली होत आहे. पोलीस व परिवहन विभागाने याविरुद्ध मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. काही वाहनचालकांनी आपापल्या गाडय़ांवर सुवाच्च व स्पष्टपणे क्रमांक लिहिलेले नाहीत. ३१११ असा क्रमांक असल्यास ३ लहान व १११ मोठय़ा अक्षरात लिहिल्याचे सर्रास दिसून येते. दादा, बाबा, सर, दाजी, डॉन असे शब्द नंबर प्लेटवर क्रमांकाऐवजी दिसतात. शहरात अनेक दुचाकी व चार चाकींवर ‘प्रेस’ हा इंग्रजी शब्द लिहिलेला दिसत आहे. वास्तविक वार्ताहर, पत्रकारांनासुद्धा आपल्या वाहनावर ‘प्रेस’ हा शब्द लिहिण्यास बंदी आहे. संबंधित विभागांनी धडक मोहीम राबवून अशा वाहनांवर व वाहनचालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

डॉ. कराड यांचा वाढदिवस उत्साहात
लातूर, २३ जून/वार्ताहर
पुणे येथील माईर्स एमआयटी संचलित एम. आय. एम. एस. आर. वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या आधुनिक ‘महाराष्ट्राचा जनसंवाद वाढदिवस’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य एन. एन. सय्यद, प्रा. डॉ. तुकाराम दौड, प्रा. बच्चेवार, प्रा. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटण्यात आल१. तसेच मुकुंदराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.

खुनी हल्ल्याबद्दल तिघांना सक्तमजुरीची शिक्षा
लातूर, २३ जून/वार्ताहर

तालुक्यातील वासनगाव येथे १७ डिसेंबर २००७ रोजी परमेश्वर जाधव यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्या बब्रुवान दिलीप गायकवाड, विलास दिलीप गायकवाड, सतीश नाशिकराव गायकवाड (सर्व राहणार वासनगाव, तालुका लातूर) यांना प्रत्येकी चार वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. काळे यांनी दिली.
लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार परमेश्वर जाधव यांना जुन्या भांडणाची कुरापत उकरून सतीश गायकवाड, बब्रुवान गायकवाड, विलास गायकवाड यांनी मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. तपास अधिकारी गोविंद राठोड यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी ओम जाधव, विशाल दहीटने व जखमी परमेश्वर जाधव यांच्या जबानी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून शिक्षा दिली.

‘चौगुले क्लासेस’चे दीडशे विद्यार्थी एम.बी.बी.एस. प्रवेशासाठी पात्र
नांदेड, २३ जून/वार्ताहर

वैद्यकीय प्रवेशासाठी आतापर्यंत शेकडो विद्यार्थी घडविणाऱ्या नांदेडच्या ‘चौगुले क्लासेस’ने या वर्षीही यशाची परंपरा कायम राखली. एम.बी.बी.एस. प्रवेशासाठी ‘चौगुले क्लासेस’चे दीडशेहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले. सी. ई. टी. परीक्षेत ‘चौगुले’च्या ज्ञानेश्वर जाधव याला १९३ गुण मिळाले. विनोद साबू याने १९२ गुण मिळवत डोंगरी विभागातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. वैभव आंबटवार (१९०) इतर मागास प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला आला. सुवर्णा हत्ते १९० गुण घेऊन वैद्यकीय विभागात जिल्ह्य़ात पहिली आली आहे. एन. टी. -थ्री प्रवर्गात पवन बिडगिरे मराठवाडय़ात सर्वप्रथम ठरला. याच प्रवर्गात विदर्भातून पहिला येण्याचा गौरव दिनेश बडे याने मिळविला. एस.टी. प्रवर्गाचा विद्यार्थी अभिजीत लखमावाड राज्यात द्वितीय व औरंगाबाद विभागातून प्रथम आला आहे. किरण झडते व विश्वनाथ बडजे यांनी जीवशास्त्रामध्ये शंभरपैकी १०० गुण मिळविले. याच विषयात सुवर्णा हात्ते, मयुरेश रामपूरकर, भगवान भोसले, प्रतीक गावंडे, संदेश कदम, वैभव आंबटवार, विनोद साबू या विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९९ गुण मिळविले आहेत.

विद्यापीठात ग्रंथालयाची इमारत उभारणार
नांदेड, २३ जून/वार्ताहर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ग्रंथालयाच्या इमारत बांधकाम सुरु होणारआहे. अंदाजे नऊ कोटी रुपये खर्च यासाठी करण्यात येणार आहे. साडेचार कोटी रुपये सरकारने मंजूर केले आहेत. हे ग्रंथालय ६७ हजार चौरस फुटाचे व दोन मजली असेल. इमारतीचे बाह्दृश्य विद्यापीठाच्या बोधचिन्हातील गरुडाच्या आकाराचे असणार आहे. ‘अपंग कक्ष’ या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. इलेक्ट्रॉनिक जर्नल्स, इंटरनेट यासाठी स्वतंत्र कक्ष असतील. ४० आसन क्षमता असणारा सेमिनार हॉल, अभ्यागत कक्ष, संगणकीकृत तालिकेसाठी दोन्ही मजल्यावर स्वतंत्र कक्ष, संशोधकांना अध्ययनासाठी स्वतंत्र क्युबिकल्स तसेच ग्रंथालयाच्या प्रत्येक विभागाला जोडून स्वतंत्र वाचन कक्ष असणार आहे. पुस्तकांचे वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी विशेष उपाययोजना केली जाणार आहे. वास्तुविशारद दिलीप काळे यांनी या इमारतीची संकल्पना व आराखडा तयार केला आहे. ग्रंथालयासाठी निवडलेली जागा ही विद्यापीठातील सर्व संकुलांना सोईची असल्याचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितले.

खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आकात बिनविरोध
परतूर, २३ जून/वार्ताहर

खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आकात यांची व उपाध्यक्षपदी सुखलाल राठोड यांची आज बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदांसाठी एकएकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रीता मेत्रेवार यांनी जाहीर केले. सहकारी संस्था मतदारसंघातून बाबासाहेब आकात, सुरेश खरात, दिलीप आडळकर, सदाशिव सावरे, कठाळू काटे, अण्णासाहेब काळे, लिंबाजी कऱ्हाळे, पाराजी मुळे, ज्ञानोबा गायवळ वभरतराव तौर निवडून आले. व्यक्तिगत मतदारसंघातून जिजाभाऊ शेळके, दुर्बल घटक मतदारसंघातून भुजंगराव धुमाळ, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून किसन मुंडे, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून किसनरावमनग, विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सुखलाल राठोड, तर महिला राखीव मतदारसंघातून सुमनबाई राऊत व शांताबाई करपे निवडून आल्या.

विवाहितेने पेटवून घेतले
बीड, २३ जून/वार्ताहर

दारूडय़ा पतीच्या त्रासाने वैतागलेल्या महिलेने पेटवून घेतले. ती ७० टक्के भाजली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील संगीता तात्याराम सावंत (वय २८) हिने काल अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. पती दारू पिऊन त्रास देत असल्याने वैतागून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

गरीब नवाज एक्सप्रेसला उद्या हिरवा झेंडा दाखवणार
औरंगाबाद, २३ जून/खास प्रतिनिधी
निजामाबाद-अजमेर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या गरीब नवाज एक्सप्रेसला गुरुवारी, रात्री अडीच वाजता मुफ्ती मौलाना सरदार आश्रफी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. ही एक्सप्रेस बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता निजामाबादहून निघणार आहे. या एक्सप्रेसचे आगमन रात्री अडीच वाजता औरंगाबाद रेल्वे स्थानकावर होणार आहे. ही रेल्वे मनमाड-जळगावमार्गे अजमेरला जाणार आहे. या रेल्वेचे स्वागत मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. अजमेरला जाणाऱ्या भक्तांसाठी प्रवास सुखकर होवो यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. रफीक अहमद मित्र मंडळातर्फे भाविकांना पेनखजूरचे वाटप करण्यात येणार आहे.

शेतकरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना
औरंगाबाद, २३ जून/प्रतिनिधी

केंद्र व राज्य सरकार यांच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरात शेतकरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. महसूल विभागाचे उपायुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीकांत तौर, सहसचिवपदी पत्रकार तुकाराम शिंदे व उपाध्यक्षपदी कल्याण आर्दड यांची निवड करण्यात आली. शेतकरी मेळावे घेणे, आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे, मातीपरीक्षण केंद्र उभारणे, कृषी वाचनालयाची सेवा उपलब्ध करून देणे, सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना धडे देणे आदी कामे या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

श्रीकृष्ण इन्स्टिटय़ूटचे एमबीए महाविद्यालय
औरंगाबाद, २३ जून/खास प्रतिनिधी

‘श्रीकृष्ण इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’तर्फे व्यवस्थापनशास्त्राचे महाविद्यालय सुरू करण्यात आल्याचे संचालक मनोज गुप्ता यांनी सांगितले.मराठवाडय़ातील अनेक विद्यार्थ्यांना व्यावसायिक संस्था व उद्योग कसा चालतो याची माहिती नसते. मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांकडे प्राथमिक शिष्टाचार आणि संवाद साधण्याचे कौशल्य नाही. त्यातच केवळ न्यूनगंडामुळे अनेक विद्यार्थी इंग्रजीतून संभाषण करू शकत नाही. या उणिवा दूर करण्यासाठी एम. बी. ए. महाविद्यालय स्थापन करण्यात येत आहे, असे श्री. गुप्ता यांनी सांगितले.एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना दुपारी दोन तास वर्ग घेऊन इंग्रजी संभाषण, व्यावसायिक संभाषण, शिष्टाचार, नेतृत्व आणि सांघिक जबाबदारी याचे शिक्षण दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाला हरियाणाच्या रोहटक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाने मान्यता दिली आहे. या विद्यापीठातर्फे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एम.बी.ए.ची पदवी दिली जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून अभ्यासक्रमाचे शुल्क ९६ हजार रुपये आहे. एम.बी.ए.चे वर्ग मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहेत.

सचखंड गुरुद्वारामध्ये पाणीटंचाई
नांदेड, २३ जून/वार्ताहर

शिखांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील सचखंड गुरुद्वारामध्ये भाविकांना सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. गुरू-ता-गद्दी सोहळ्यादरम्यान ७५ कोटी रुपये खर्च करून गुरुद्वाराची इमारत बांधण्यात आली, पण येणाऱ्या यात्रेकरूंकरिता पाणीपुरवठय़ाची कोणतीही योजना करण्यात आली नाही. यामुळे भाविक नाराज होऊन लंगरसाहिब गुरुद्वारामध्ये जात आहेत. गुरुद्वारा परिसराला आजही १९९९ मध्ये बनविण्यात आलेल्या वाहिनीतूनच पाणीपुरवठा होतो. गुरुद्वारा परिसरातील अनेक वॉटर कूलर बंद आहेत. लाखो रुपये खर्च करून गोविंदबागमध्ये बसवलेले कारंजे पाण़्ाअभावी बंद आहेत. सध्या गुरुद्वारातर्फे भाविकांकरिता टँकरद्वारे पाणी आणले जात असले तरी ते कमी पडत आहे. रणजितसिंग यात्री निवास येथे पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आली आहे. टाकी उभारण्यासाठी गुरुद्वारा सचखंड मंडळाची जागा देण्यात आली. या टाकीतून गुरुद्वाराला पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी अट त्यावेळी घालण्यात आली होती. मात्र तेथून अद्यापि पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. यात्रेकरूंचा अशा प्रकारे पाण्याअभावी चालविलेला छळ खेदजनक असल्याची प्रतिक्रिया गुरुद्वारा मंडळाचे माजी अध्यक्ष शेरसिंग फौजी यांनी व्यक्त केली.

युतीच्या कार्यकर्त्यांचे लातूरमध्ये ‘रास्ता रोको’
लातूर, २३ जून/वार्ताहर
मुंबई येथे २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या राम प्रधान समितीचा मूळ अहवाल जनतेसाठी प्रकाशित करावा या व अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीने आज शिवाजी चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.मुंबईत दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम प्रधान समितीचा मूळ अहवाल सरकारने सभागृहात ठेवला नाही. त्यामुळे सरकारने सभागृहाचा व जनतेचा विश्वासघात केला. मूळ अहवाल विधिमंडळात पटलावर ठेवावा म्हणून प्रखर मागणी करणाऱ्या युतीच्या तीन सदस्यांना निलंबित करण्यात आले. त्यांचे निलंबन रद्द करावे, अशी मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली.
आंदोलनात भा. ज. प. चे शहराध्यक्ष देवीदास काळे, अभिमन्यू पवार, विष्णू साठे, रवी सुडे, तानाजी ऐतनबोने, शिवराज टेंकाळे, रामेश्वर भराडिया, जमीलभाई मिस्त्री, गिरीश तुळजापुरे, सदानंद सोनवणे, विजय बाहेती, रवी कांबळे, राजाभाऊ मुळे, सुरेश राठोड आदींनी भाग घेतला. शिवाजीनगर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांना जामिनावर सोडून दिले.

नितनवरे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
निलंगा, २३ जून/वार्ताहर
नगराध्यक्षा राजेश्वरी नितनवरे (बाहेती) व उपनगराध्यक्ष वीरभद्र स्वामी यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. या वेळी माजी नगराध्यक्ष बाबुराव नितनवरे, विजयकुमार पाटील, डॉ. शरद पाटील निलंगेकर, रामविलास धूत, पाणीपुरवठा सभापती ईश्वर पाटील, नगरसेवक अजित नाईकवाडे आदी उपस्थित होते.नगरपालिका प्रशासनातर्फे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती नितनवरे म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक पाटील-निलंगेकर यांच्यामुळेच आपल्याला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. नागरिकांच्या व सहकारी नगरसेवकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या.
श्री. स्वामी म्हणाले की, अडीच वर्षांच्या कार्यकाळात पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे शहरातील विकासकामे पारदर्शीपणे पूर्ण करण्यात येतील. शहराच्या विकासाच्या विविध योजनांकरिता जास्तीतजास्त विकासनिधी आणून शहराचा कायापालट करण्याचा मानस आहे.

‘वात्सल्य अनाथालयाचा समाजासमोर आदर्श’
उमरगा, २३ जून/वार्ताहर
‘वात्सल्य अनाथालय’ हा उपक्रम समाजासमोर आदर्श आहे. या ठिकाणी अनाथांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यास वाव असल्याने येथे वाढणारा सामान्य मुलगासुद्धा जिल्हाधिकारी होईल, असे मत मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले.वात्सल्य अनाथालयाच्या तिसऱ्या वर्धापनदिनी आयोजित महिला बाल मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी टी.डी.एस.एस. संस्थेचे प्रकल्प संचालक सज्जी जोशफ, समाज विकास संस्थेचे अध्यक्ष भूमिपुत्र वाघ, विद्या वाघ, दगडूबाई वाघमारे, लातूरच्या महिला बालकल्याण सभापती कुशावार्ता बेळ्ळे आदी उपस्थित होते.श्री. आव्हाड म्हणाले की, केवळ माता-पिता व पैसा यामुळेच माणूस मोठा होईल असे नसून या अनाथालयातील मुलेही मोठय़ा पदावर जाऊ शकतील. त्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा.या वेळी उपेक्षित समाजाच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या कुशावार्ता बेळे, मनीषा घुले, रामभाऊ लगाडे, भास्कर मुंडे, केशरबाई जाधव यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन महावीर डोके यांनी केले. इरफान पटेल यांनी आभार मानले.

तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
तुळजापूर, २३ जून/वार्ताहर
पावसासाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना शनिवारपासून तुरळक पाऊस झाल्याने थोडासा दिलासा मिळाला. हवेतील गारवा व ढगाळ हवामान पाहून खरिपाच्या पेरणीसाठी पुरेसा पाऊस होईल, अशी आशा बाळगून शेतकऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
खते, बियाणांची दुकाने सजली असली तरी या दुकानांमधून दर्जेदार कंपन्यांची खते उपलब्ध होत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा कायम आहे. शेतकऱ्यांच्या गरजेची नोंद घेऊन व्यापारीवर्ग दुय्यम दर्जाची खते विकत असल्याचेही दिसून येत आहे.
स्वस्त दराने बियाणांचे वितरण करण्याची शासनाने आखलेली योजना अजून खेडय़ापर्यंत पोहोचली नसल्याचेही या निमित्ताने दिसून येत आहे. दिर्घ प्रतिक्षेनंतर तुरळक प्रमाणात का होईना पण पाऊस झाला असल्यामुळे शेतकरीवर्गाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत असल्याचे बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाले.

ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न फसला
नांदेड, २३ जून/वार्ताहर
सेवेत विनाअट सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी काल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून या सदस्यांना पिटाळून लावले. त्यानंतर या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी ठरल्याप्रमाणे दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर ‘आनंदनिलयम्’ या घरासमोर जमले. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन होणार असल्याने पोलीस अधिकारी तेथे धावले. आंदोलनकर्त्यांना त्यांनी पिटाळून लावल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

महिलेस मारहाण प्रकरणी तिघांना सक्तमजुरी व दंड
हिंगोली, २३ जून/वार्ताहर
महिलेस मारहाण करणाऱ्या तिघांना न्यायालयाने प्रत्येकी तीन महिने सक्तमजुरी व २०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तालुक्यातील खांबाळा येथील द्वारकाबाई शिखरे यांना शेतातील तूर का नेली असे विचारून मारोती शिखरे, गोविंदा शिखरे, गोपाळा शिखरे व वंदना शिखरे यांनी मारहाण केल्याची तक्रार द्वारकाबाईंनी हिंगोली ग्रामीण पोलिसात २७ जानेवारी २००७ रोजी दिली.
आरोपी मारोती, गोविंदा व गोपाळा यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राध्यापकांची निदर्शने
लातूर, २३ जून/वार्ताहर
सहाव्या वेतन आयोगाची १ जानेवारी २००६ पासून अंमलबजावणी करावी या व अन्य मागण्यांसाठी एम. फुक्टो प्राध्यापक संघटनेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. निदर्शकांनी त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. विठ्ठल मोरे, प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड, प्राचार्य डॉ. मधुकर मुंडे, प्रा. सुधीर देशमुख आदी प्राध्यापक उपस्थित होते.

स्वामी समर्थाची आजपासून परिक्रमा
लातूर, २३ जून/वार्ताहर
दत्तअवतारी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पालखी परिक्रमेचे उद्या (बुधवारी) शहरातील खाडगाव रस्त्यावरील अजित पाटील यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे. त्या निमित्ताने सायंकाळी ७ वाजता महापूजा, आरती व महाप्रसाद होणार आहे.
गुरुवारी पहाटे स्वामीजींच्या पादुकांना रुद्राभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर महापूजा व महाप्रसादाचे होणार आहे. सकाळी १० वाजता पालखी विजयकुमार सोमाणी यांच्या जुना औसा रोड परिसरातील लक्ष्मी कॉलनीत येणार आहे.

राधाबाई शर्मा यांचे निधन
लातूर, २३ जून/वार्ताहर

श्रीमती राधाबाई शर्मा यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती व वृत्तपत्र विक्रेते जी. एन. शर्मा, कांतिलाल, लक्ष्मीकांत, मनोज ही तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. राधाबाई यांच्यावर येथील मारवाडी राजस्थान स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बदली न झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक अज्ञातस्थळी रवाना
जिंतूर, २३ जून/वार्ताहर

हव्या असलेल्या ठिकाणी बदली झाली नसल्याने अस्वस्थ होऊन बोरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नागरगोजे ‘स्टेशन डायरीत’ नोंद करून अज्ञातस्थळी गेले आहेत.नागरगोजे बोरी पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम करीत आहेत. तेथून त्यांना बदली हवी होती. यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे विनंतीअर्जही केले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तीन दिवसांपूर्वीच जिल्ह्य़ातील अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्या बदल्यांच्या यादीमध्ये नागरगोजे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते तीव्र नाराज झाले. कुणालाही सूचना न देता पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीत आपली बदली झाली नसल्याने मन:स्थिती बिघडली आहे. त्यामुळे आपण अस्वस्थ होऊन अज्ञातस्थळी जात असल्याची नोंद करून नागरगोजे गायब झाले आहेत. याबाबत बोरी पोलीस ठाणे अंमलदारांनी पोलीस अधीक्षकांना कळविले असून या पोलीस ठाण्याची तात्पुरती जबाबदारी उपनिरीक्षक कैलास दंडी यांच्याकडे देण्यात आली आहे.