Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

२०० तालुके कोरडे; उडीद, मूग पीके हातची गेली
राज्यातील खरीप पीक संकटात
पुणे, २३ जून / खास प्रतिनिधी

 

पावसाचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील खरिपाचे पीक संकटात सापडले असून उडीद आणि मूग पीक शेतक ऱ्यांच्या हातून गेले आहे. खरिपाचे तब्बल २०० तालुके पावसाअभावी कोरडे राहिल्याने आतापर्यंत केवळ एक टक्का क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे. पाऊस आणखी काही काळ लांबल्यास शेतक ऱ्यांना पर्यायी पिकांकडे वळावे लागणार आहे.
विदर्भ आणि मराठवाडय़ातील जिल्ह्य़ांची खरिपाची स्थिती तुलनेने अधिक बिकटावस्थेत आहे. कोकण आणि नाशिक विभागातील जिल्ह्य़ांतही पावसाच्या विलंबाचा परिणाम जाणवणार आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास राज्यात आपत्कालीन आराखडा राबविण्याची तयारी राज्य सरकारने चालविली असून चारही कृषी विद्यापीठांनी, पर्यायी पिके कोणती घ्यावीत, कोणता वाण लावावा याचा विभागनिहाय आराखडा तयार केला आहे. पावसाचे राज्यातील आगमन यंदा लांबले आहे. मृगाची चाहूल लागायच्या आताच नक्षत्र उलटून गेले आहे. गतवर्षी २२ जूनपर्यंत राज्यात सरासरीच्या १३० मिलिमीटर म्हणजे ५९ टक्के पाऊस पडला होता. यंदा मात्र या वेळेपर्यंत फक्त ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस १८ टक्क्य़ांच्या आसपास आहे. राज्यात खरिपाचे एक कोटी २८ लाख हेक्टर एवढे क्षेत्र आहे. हे क्षेत्र २९९ तालुक्यांमध्ये आहे. खरिपाच्या या तालुक्यात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. तब्बल २०० तालुक्यांमध्ये जूनच्या सरासरीच्या फक्त १० टक्के पाऊस झाला आहे. १० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या जिल्ह्य़ांत ठाणे, रायगड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, अकोला, बुलढाणा, वाशिम यांचा समावेश आहे. ५३ तालुक्यांमध्ये वीस ते चाळीस टक्के आणि २२ तालुक्यांत ४० ते ६० टक्के एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. ६० ते ८० टक्के पाऊस केवळ पाच तालुक्यांत तर १०० टक्के पाऊस फक्त तीन तालुक्यांत झाला आहे.
राज्यातील २०० तालुके खरीप पिकांच्या दृष्टीने संकटग्रस्त आहेत. त्यात विदर्भाचे ९६, मराठवाडय़ातील ३४, कोकणातील २७ व नाशिकमधील २८ व पुणे विभागातील १५ तालुक्यांचा समावेश आहे. पाऊस लांबल्यामुळे आतापर्यंत फक्त एक टक्का म्हणजे एक लाख ५५ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. गतवर्षी हे प्रमाण चार ते पाच टक्के एवढे होते. गतवर्षी मान्सून वेळेवर आला आणि काही काळ स्थिरावला होता. यंदा मात्र पावसाचे आमगनच लांबल्यामुळे उडीद व मूग पिके हातून गेली आहे. ही पिके आता घेऊ नयेत असे आवाहन कृषी खात्याने शेतक ऱ्यांना केले आहे. पाऊस आणखी लांबल्यास या पिकांऐवजी सूर्यफूल, तूर, मका, संकरित बाजरी लावावी असेही खात्याने स्पष्ट केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह कोकण पट्टय़ात भात रोपांची लागवड शेतक ऱ्यांनी केली आहे. ही रोपे उगवून आली आहेत. परंतु पाऊस लांबल्याने रोपे तग धरू शकणार नाहीत आणि त्यांच्या वाढीवरही परिणाम होईल. आणखी दोनचार दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास ही रोपे जळून जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे शेतक ऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते. खरिपाच्या पिकांची साधारणत: १५ जुलैपर्यंत पेरणी केली जाते. मात्र पहिल्या पंधरवडय़ात लागण होणाऱ्या पिकांना मुकावे लागले आहे.