Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कोकण विकासासाठी विशेष पॅकेज
ओरोस येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घोषणा
मुंबई, २३ जून / खास प्रतिनिधी

 

विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशपाठोपाठ कोकणासाठी विशेष पॅकेज उद्या सिंधुदुर्गचे मुख्यालय ओरोस येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केले जाणार आहे. कोकणाच्या विकासासाठी पुढील दोन-तीन वर्षांंकरिता सुमारे दोन ते अडीच हजार कोटींचे पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीसह कुडाळमध्ये काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संपर्क यात्रेचाही प्रारंभ केला जाणार आहे.
लोकशाही आघाडी सरकारने आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशला विशेष पॅकेज दिले आहे. कोकणालाही पॅकेज मिळावे, अशी मागणी उद्योगमंत्री नारायण राणे हे सातत्याने करीत होते. मात्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व राणे यांच्यातील कटुतेचे संबंध लक्षात घेऊन देशमुख यांनी राणे यांना शह देण्याकरिता कोकणाकडे दुर्लक्षच केले होते.
आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र कोकणाकडे विशेष लक्ष दिले आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना कोकणाला झुकते माप देण्यात आले होते. दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विदर्भाला तर सप्टेंबर महिन्यात औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडय़ाला विशेष मदत दिली जाते.
कोकण विकासासाठी पुढील दोन-तीन वर्षांंचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. रस्ते, सिंचन, पाणीपुरवठा योजना, सागरी महामार्ग, बंदरे, जेटय़ा, मच्छिमारी यासाठी तरतूद केली जाणार आहे. कोकणासाठी सुमारे दोन हजार कोटींचे पॅकेज दिले जाणार असल्याचे मंत्रालयातील सूत्राकडून सांगण्यात आले. राज्यातील प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र पॅकेज देण्यास राज्य नियोजन आयोगाने मात्र विरोध केला आहे. कोकणातील रखडलेल्या योजनांना निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने पॅकेजचा उपयोग होईल. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रदेश काँग्रेसने कोकणासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हात सध्या खाणींचा मुद्दा गाजत आहे. खाणींना मोठय़ा प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. खाणींना परवानगी देऊ नये, अशी स्थानिकांची मागणी आहे. सिंधुदुर्गच्या विकासासाठी मोठे प्रकल्प तेथे येणे आवश्यक असून त्यातूनच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असा राणे यांचा युक्तिवाद आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यभर राबविलेल्या जनजागरण यात्रेस मिळालेल्या यशामुळे काँग्रेसने आता संपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची सुरुवात उद्या मुख्यमंत्री चव्हाण, नारायण राणे व माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये होणार आहे.