Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ऑनलाईन प्रवेशाला ‘पाठबळ’ शक्तिशाली सव्‍‌र्हरचे!
पुणे, २३ जून/खास प्रतिनिधी

 

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाकरिता शक्तिशाली सव्‍‌र्हरचे भरभक्कम पाठबळ पुरविण्यात आले असून अमेरिकेतील डेटाबेस सव्‍‌र्हरची विशेष मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे एकाच वेळी लाखो विद्यार्थी ऑनलाईन आले, तरीही प्रक्रियेमध्ये कोणताही खंड पडण्याची शक्यता नसल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रवेशाचा मुंबईतील प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील वर्षीपासून राज्यभर अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यामुळेच मुंबईतील प्रवेशांकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अकरावीसाठी मुंबईत दोन लाखांहून अधिक जागा असल्याने एकाच वेळी हजारो-लाखो विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्यास दाखल झाले, तर संकेतस्थळ ‘हँग’ होण्याची भीती आहे. त्यामुळेच अकरावीच्या प्रवेशादरम्यान अशी आपत्ती आल्यास काय होणार, अशी भीती त्यांच्या मनात आहे. या पाश्र्वभूमीवर ही प्रक्रिया राबविणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी ‘लोकसत्ता’ला तांत्रिक पाठबळाची माहिती दिली. ‘अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाकरिता दोन वेब सव्‍‌र्हर आणि एक डेटाबेस सव्‍‌र्हर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी अमेरिकेतील एका डेटासेंटरमधील उच्चक्षमतेच्या सव्‍‌र्हरची मदत घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ऑनलाईन प्रवेशाच्या घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष चाचणीच्या वेळी सव्‍‌र्हरच्या क्षमतेचाही अंदाज घेण्यात आला. तेव्हा सुमारे १० ते १५ हजार ठिकाणी एकाच वेळी ‘लॉग-इन्’ करण्यात आले होते. तेव्हा सव्‍‌र्हरच्या एकूण क्षमतेपैकी फक्त दोन टक्केच वापर करण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे एकाच वेळी जरी दीड ते दोन लाख विद्यार्थी ऑनलाईन आले, तरीही सव्‍‌र्हर ‘हँग’ होण्याचा धोका नाही,’ असे सावंत यांनी स्पष्ट केले. ऑनलाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या इंटरनेटच्या पत्त्याव्यतिरिक्त आणखी एक पत्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळेच पहिल्या नेटवर्कमधील इंटरनेट जोडणीला समस्या उद्भविल्या, तरी दुसऱ्या नेटवर्कच्या माध्यमातून ही प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पाडण्याची क्षमता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.