Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेतकरी हवालदिल
दिलीप शेळके
नागपूर, २३ जून

 

मान्सूनच्या लहरीपणाचा विदर्भाला यावर्षी मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भाची शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्यामुळे कधी सुकाळ तर, कधी दुष्काळ अशी स्थिती विदर्भात असते. यंदा मान्सून लांबल्याने विदर्भातील शेतकरी अस्वस्थ झाला आहे. जूनचा शेवटचा आठवडा सुरू होऊनही पावसाचा पत्ता नासल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांचे या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडले आहे.
यावर्षी रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेले. २००७ साली मान्सूनचे आगमन १८ जूनपर्यंत लांबले होते. मान्सूनचे मुंबईत आगमन झाल्यानंतर साधारणपणे तिसऱ्या दिवशी विदर्भात मान्सूनचे आगमन होते. विदर्भाच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला पण, त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. काही भागात जेमतेम एक टक्का पाऊस झाला आहे. विदर्भात केवळ दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम जिल्ह्य़ात काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे पण, तो पेरणी योग्य नाही. विदर्भात मान्सून सक्रिय होत नाही तोपर्यंत शेतकरी पेरणी करूच शकणार नाहीत. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. कर्ज काढून बियाणे आणि खतांची खरेदी केली. यंदा सर्वाधिक कल सोयाबीन बियाण्यांच्या खरेदीकडेच होता. जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात धूळ पेरणी करण्याची परंपरा आहे. पावसाचा अंदाज घेऊन काही भागातील शेतकरी कोरडय़ा शेतात पेरणी करतात. विदर्भात दीड हजार हेक्टरवर अशी धूळ पेरणी झाली पण, पाऊस न आल्याने ही ती उलटली आहे. खरिपाची पेरणी लांबल्याने त्याचा रब्बी पेरणीवरही परिणाम होणार आहे. कमी दिवसात आणि कमी पावसात येणारी पिके घेण्याकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीनचा पेराही यंदा कमी होण्याची शक्यता आहे.
मान्सून लांबल्याने विदर्भातील जलसाठय़ांची स्थितीही चिंताजनक झाली आहे. सिंचन प्रकल्पांसह मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. अमरावती विभागात २००३ नंतर अशी स्थिती प्रथमच उद्भवली आहे. विभागात अमरावती जिल्ह्य़ातील अप्पर वर्धा, यवतमाळ जिल्ह्य़ातील पूस आणि अरुणावती, बुलढाणा जिल्ह्य़ातील वाण, नळगंगा आणि पेनटाकळी हे मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची जलसाठवणुकीची क्षमता ११३८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सध्या धरणांमध्ये केवळ ७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बाष्पीभवन आणि पिण्यासाठी वापरलेले पाणी यामुळे जलसाठा कमी होत चाललेला आहे. अकोला जिल्ह्य़ातील काटेपूर्णा प्रकल्प कोरडा पडला आहे.
नदी, नाले, विहिरी व प्रकल्प कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. विशेषत: जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जूनच्या अखेपर्यंत गुरांना हिरवा चारा मिळत असतो. खरिपाच्या संपूर्ण पेरण्या संपलेल्या असतात. बीज अंकुरून रोपे वाढू लागतात. काही भागात पिके चांगली डोलू लागतात, असे या दिवसातील दृश्य असते पण, यावर्षी परिस्थिती फारच भीषण झालेली आहे. पेर्ते व्हा चा सूर आवळणारा पक्षी आणि कुहू कुहू गाणारा कोकीळही गप्प आहे. चातक आभाळाकडे चोच करून पावसाची प्रतीक्षा करत आहे.