Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

१६ बी.पी.एड. महाविद्यालयांचे निकाल विद्यापीठाने रोखले
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित १६ बी.पी.एड. महाविद्यालयांचे निकाल विद्यापीठाने रोखून ठेवल्यामुळे एक हजार विद्यार्थी त्यामुळे प्रभावित झाले आहेत. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ४० महाविद्यालयांपैकी २४ महाविद्यालयांना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) मान्यतेचे पत्र यापूर्वी मिळाले असून त्यांचे निकाल १२ जूनला घोषित झाले मात्र, १६ महाविद्यालयांचे निकाल जाहीर करण्यास नागपूर विद्यापीठाने नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून १६ महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्राचार्य आणि प्रतिनिधी विद्यापीठात कुलगुरू, प्र-कुलगुरूंच्या कार्यालयात फेऱ्या मारीत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या समस्येवर विद्यापीठाने समाधानकारक तोडगा काढलेला नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमारे १००० विद्यार्थी संख्या असलेल्या १६ बी.पी.एड. महाविद्यालयांकडे एनसीटीईची परवानगी असलेले स्वतंत्र पत्र नाही. बी.पी.एड.च्या २४ महाविद्यालयांना परवानगीचे स्वतंत्र पत्र दिल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाला स्वतंत्र पत्र देण्यापेक्षा महाविद्यालयांची यादी इंटरनेटवरून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एनसीटीईने परवानगी पत्र देण्यास नकार दिला आहे. या १६ महाविद्यालयांनी इंटरनेटवर प्रकाशित झालेल्या यादी कुलगुरू व प्र-कुलगुरूंना दाखवली. मात्र, त्या यादीवर प्र-कुलगुरू आणि कुलगुरूंनी विश्वास ठेवण्यास नकार दिल्याचे या बी.पी.एड. महाविद्यालयांच्या प्राध्यापक व प्राचार्याचे म्हणणे आहे.
आजकाल सर्व कामे इंटरनेटच्या माध्यमातून होतात. या पाश्र्वभूमीवर नेटवरील यादीवर विद्यापीठ प्रशासनाचा विश्वास नसेल आणि अनावश्यक एखाद्या क्षुल्लक कारणासाठी विद्यार्थ्यांंचे निकाल रोखले जात असतील तर आमच्याकडून मोठय़ा देवाणघेवाणीची त्यांची अपेक्षा ठेवली जात आहे, असा आरोप या १६ महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर म्हणाले, कुलगुरू नागपुरात आल्यावर योग्य निर्णय घेऊन लवकरच महाविद्यालयांचे निकाल घोषित करण्यात येतील.
बी.पी.एड.चे निकाल घोषित न झालेल्या १६ महाविद्यालयांमध्ये नागपूरचे हिंगणा मार्गावरील ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नारा मार्गावरील निर्मल कॉलनीतील इंदूताई शारीरिक शिक्षण स्मृती महाविद्यालय, उमरेड तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मौद्याचे माधवराव तिडके शारीरिक शिक्षण महाविद्यालय, भंडाऱ्याचे हरीश मोरे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, तुमसरचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, साकोलीचे वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गोंदिया जिल्ह्य़ातील देवाजी बुधे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर जिल्ह्य़ातील चिमूरचे नारायणसिंग उईके शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नारायण पाटील (वासाडे) शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गडचांदूरचे विदर्भ शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापूरचे राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, तळोधी-बाळापूरचे चक्रधर स्वामी शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि पूलगावचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय आदींचा समावेश आहे.