Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेगा ब्लॉकमुळे अनेक गाडय़ा रद्द; एक्सप्रेस धावणार पॅसेंजरसारख्या
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

भिलाई ते दुर्ग यादरम्यान २३ ते २५ जून या कालावधीत नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे या तीन दिवसात अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून काही एक्सप्रेस गाडय़ा पॅसेंजर म्हणून सोडण्यात येणार आहेत.
प्रवासी आणि मालगाडय़ांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या बघता रेल्वेने भिलाई ते दुर्ग असा तिसरा मार्ग टाकण्याचा निर्णय घेतला. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेला या मार्गावरून चालणाऱ्या मालगाडय़ांतून कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळते. या हावडा मार्गावर सध्या ‘अप अँड डाऊन लाईन’ आहेत. या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी रेल्वेने तीन दिवस ‘मेगा ब्लॉक’ घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
३७५/३७६ इतवारी-रायपूर पॅसेंजर, रायपूर-डोंगरगड-गोिदया-दुर्ग, डोंगरगड-रायपूर मेमू तसेच रायपूर-दुर्ग दरम्यान धावणाऱ्या सहा पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. तर, लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडय़ा विशिष्ट रेल्वे स्थानकादरम्यान पॅसेंजर म्हणून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूरहून शालीमार एक्सप्रेस, छत्तीसगड एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेसमधून २३ ते २५ जून या कालावधीत मुंबई, हावडा, बिलासपूर, रायपूर, अमृतसरचा प्रवास करताना विलंब होणार आहे.
(८२३८) अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्सप्रेस दुर्ग ते बिलासपूर आणि (८०२९) लोकमान्य टिळक-शालीमार एक्सप्रेस दुर्ग ते रायपूर यादरम्यान पॅसेंजर म्हणून धावणार आहेत. तर, (२८५५) बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस आणि (२८५४) भोपाळ-दुर्ग अमरकंटक एक्सप्रेस रायपूर ते दुर्ग यादरम्यान धावणार आहे. या विशिष्ट रेल्वे स्थानकाचे अंतरपार केल्यानंतर परत एक्सप्रेसच्या गतीने या गाडय़ा धावतील.
यासंदर्भात बोलताना दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक प्रदीपकुमार म्हणाले की, ‘मेगा ब्लॉक’ची सूचना विविध माध्यमातून प्रवाशांना देण्यात आली आहे. काही पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडय़ा विशिष्ट सेक्शनमधून कमी गतीने म्हणजे पॅसेंजर ट्रेन म्हणून धावतील. हे सेक्शन पार केल्यानंतर मात्र, नेहमीच्या गतीने या गाडय़ा धावणार आहेत.