Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

युवा धोरणावर बिनधास्त बोलली तरुणाई
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

देशातील तरुण- तरुणींच्या ओठांवर रेंगाळणाऱ्या गाण्यावरून त्या देशाचे भवितव्य ठरवले जाते, असे म्हणतात. भारतात प्रचंड संख्येने असलेल्या युवा शक्तीच्या मनात दडलय तरी काय आणि त्यांच्यासाठी कोणती धोरणे असावीत याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. खा सुप्रिया सुळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि युवा नेते सलील देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी युवा धोरणाविषयी दिलेल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या होत्या. प्रतिष्ठानच्या वतीने बुटी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थी- विद्यार्थिनींनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.
रोजगार, मुलींच्या समस्या, परीक्षांचे ओझे, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती असे अनेक प्रश्न उपस्थित करून देवेंद्र गणवीर, मीना जगताप, देवेंद्र चिमणकर, नफीस शेख, कैलास सहारे, महेश पवार या युवकांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. कैलास सहारे म्हणाला, दहा तऱ्हेच्या एन्ट्रन्स परीक्षा देऊन केवळ तणावग्रस्त विद्यार्थीच तयार केले जात आहेत. उच्च शिक्षण घेताना प्रचंड मानसिक क्लेशातून विद्यार्थ्यांना जावे लागते. त्याने फी भरून कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा. त्यानंतर टय़ुशन क्लास करायचे. या समांतर टय़ुशन क्लासच्या इंडस्ट्रीतून कधी मेडिकल तर कधी इंजिनिअरिंगसाठी केवळ प्रवेश परीक्षा देत रहायच्या? दिवस रात्र, एसईईई, एआयईईई, पीएमटी अशा दहा-दहा परीक्षा विद्यार्थ्यांनी का द्यायच्या? संपूर्ण देशात एकच शिक्षण पद्धत का नसावी? या एन्ट्रन्स परीक्षांमध्ये तणावग्रस्त युवा पिढी तयार होत असून युवा धोरण बनवताना याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
यवतमाळचा देवेंद्र गणवीर म्हणाला, युवा शब्द उलटा केल्यास अर्थ वायू होतो. वायूमध्ये प्रचंड शक्ती असते. वायुरूपी वादळात प्रचंड जहाजालाही उलथवून टाकण्याची ताकद असते. मात्र, आज युवा शक्ती ही जात, धर्म, पंथाच्या नावाखाली वाटली जात आहे. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा आहेत मात्र त्याहीपेक्षा युवाशक्तीसाठी महत्त्वाची गरज रोजगाराची आहे. त्यामुळेच युवकांच्या हाताला काम देणारे युवा धोरण राबवणे आवश्यक आहे. विदर्भात मोठय़ा प्रमाणात पडीक जमीन आहे. या जमिनीचा उपयोग शासनाने युवा शक्तीच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी करावा. तसेच शासनाच्या अनेक कामांची कंत्राटे विशिष्ट लोकांना वर्षांनुवर्षे मिळत असतात. ती युवा शक्तीला देण्यात यावीत. शासनाने शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला द्यावी. अनेकदा वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. त्याचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोग काय?
यवतमाळच्याच मीना जगताप या विद्यार्थिनीने मुलींचे उच्च शिक्षणातील अल्प प्रमाण या विषयावर पोटतिडकीने मत मांडले. विदर्भातील आदिवासी बहुल भागात मानवनिर्मित वा नैसर्गिक अशी कोणतीही आपत्ती आल्यास सर्वात प्रथम मुलीचे शिक्षण थांबवले जाते. मुलींनी केवळ बी.एड., डी.एड. किंवा नर्सिगकडेच जावे, अशी एक सामाजिक मानसिकता बनली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील फार थोडय़ा मुली त्यांच्या पसंतीचे उच्च शिक्षण घेऊ शकतात. आदिवासी भागात कुमारी मातांचा प्रश्न, मुलींच्या आरोग्याचा प्रश्न, तसेच त्यांच्या शोषणाला वाचा फोडण्यासाठी युवा धोरण उपयोगी ठरेल, अशी आशा तिने व्यक्त केली. गडचिरोलीचा देवेंद्र चिमणकर म्हणाला, गडचिरोलीत मुलांचे सातवी- आठवीपर्यंत शिक्षण संपते. उच्च शिक्षण फार कमी मुलेमुली घेतात. व्यसनाधिनता भयानक आहे. कारण शिक्षणासाठी प्रवासाच्या साधनांचा मोठा अभाव आहे. जिल्हात बाहेरून येणारे अधिकारी बरेचसे प्रभारी पदावर असतात ते युवकांच्या योजनांच्या बाबतीतच नव्हे तर कोणत्याच शासकीय योजनांवर ठोस निर्णय घेत नाहीत. शासकीय योजना केवळ जिल्ह्य़ापुरत्या मर्यादित न राहता, त्या तालुका पातळीवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणाही युवा धोरणात असावी. कोंढाळीच्या नफीस शेख याने युवा धोरणात गाव तेथे क्रीडांगणाचा समावेश करावा. तसेच यापूर्वी जे काही युवा धोरण ठरवण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणांचा प्रस्ताव ठेवला.
युवक-युवतींच्या प्रश्नावर खासदार सुळे यांनी वेळोवेळी उत्तरे देऊन शिक्षणासंदर्भातील सामाईक प्रश्न केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्याकडे पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच रिझव्‍‌र्हेशन आणि शिष्यवृत्तीसंदर्भातील प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून युवा धोरण प्रभावीपणे राबवणार असल्याचे सांगितले. व्यासपीठावर सलील देशमुख आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.