Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विकास आणि संपर्कही
चंद्रशेखर बोबडे

 

तब्बल एक दशक मंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघाचा विकासच केला नाही तर प्रभावी संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून मतदारसंघही बांधला आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाची कारकीर्द सुरू केलेल्या अनिल देशमुख यांनी प्रथम अपक्ष म्हणून काटोल मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढविली आणि जिंकलीही. राज्यात अपक्षाच्या मदतीने भाजप-सेना युतीची सत्ता आल्याने अनिल देशमुख यांना मंत्रिपदही मिळाले. पहिल्या पाच वर्षांतच त्यांनी मतदारसंघ बांधायला सुरुवात केली. रस्ते, पाणी, वीज आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ बांधला. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर अनिल देशमुख निवडून आले. अनिल देशमुख यांचे मतदारसंघात वलय अधिक असल्याने देशमुखांना २००४ मधील विधासभेची निवडणूकजिंकणे कठीण गेले नाही. उलट त्यांचे मताधिक्य सातत्याने वाढतच गेले. युतीची सत्ता असतानाही आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यावर देशमुख मंत्रिमंडळात होते. मंत्रिपदाचा उपयोग त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी केला. आज काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये एकही गाव नाही जेथे रस्ता नाही, आतापर्यंत १५० कोटी रुपये रस्त्याच्या कामावर खर्च झाल्याचा दावा देशमुख करतात.
मंत्री असताना अनिल देशमुख यांनी काटोल, नरखेड येथे रेल्वे उड्डाण पूल मंजूर करून घेतले. पुलांवर ७० कोटी रुपये खर्च होणार आहेत. कधीकाळी सधन शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटोल-नरखेड तालुक्यात संत्र्याचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते, आता पाण्याचा मोठय़ा प्रमाणात उपसा झाल्याने पाण्याची पातळी कमालीची खाली गेली आहे. हा परिसर भूजल सर्वेक्षण विभागाने ‘ड्राय झोन’ जाहीर केल्याने सिंचनाचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात निर्माण झाला. या समस्येवर लक्ष केंद्रित करताना आतापर्यंत ३०० कोटी रुपये यावर खर्च केल्याचे देशमुख सांगतात. दान प्रकल्पासाठी १०३ कोटी रुपये, कार प्रकल्पासाठी ११० कोटी रुपये, चिखली प्रकल्पासाठी ४५ कोटी रुपये आणि पिंपळगाव प्रकल्पासाठी ४० कोटी रुपये मंजूर झाल्याचा दावाही अनिल देशमुख करतात. मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पासोबतच भीष्णूर, खैरगाव, तारा, वाढोणा येथे ५० कोटी रुपये कोल्हापुरी बंधाऱ्यावर खर्च करण्यात आले. पाणलोट क्षेत्र विकासात काटोलचा समावेश झाल्याने यामाध्यमातूनही या भागात जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. विहीर पुनर्भरण योजनेतून सरकारच्या खर्चातून शेतकऱ्यांना विहिरी खोदून मिळणार आहेत. पूर्वी हा खर्च शेतकरी क रीत असत.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन नरखेड, मोवाड, काटोल येथे १६ कोटी रुपयांच्या नवीन नळयोजना सुरू करण्यात आल्या. नरखेडसाठी २३ किलोमीटरवर जलवाहिनी टाकून शहराचा पाणी प्रश्न निकालात काढण्यात आला. मोवाड पालिकेसाठी ८ कोटीची, सावरगाव येथे ५.५० कोटीची योजना मंजूर करण्यात आली. पाण्यासोबत गावातील विजेच्या प्रश्नातही देशमुख यांनी लक्ष घातले. भारनियमनामुळे अडचणीत सापडलेल्या गावकऱ्यांना सिंगल फेजच्या माध्यमातून दिलासा मिळाला. आता किमान घरची वीज जात नाही, नागपूर जिल्ह्य़ात सर्वप्रथम सिंगल फेजचे काम काटोल तालुक्यात सुरू झाले, हे येथे उल्लेखनीय. भारसिंगी, काटोल येथे नवे उपकेंद्र सुरू करण्यात आले. यावर १६० कोटी रुपये खर्च करण्यात आले.
शिक्षणाच्या सोयीतही काटोल मतदारसंघ मागे नाही. आश्रमशाळेपासून तर वसतिगृहांपर्यंत आणि आयटीआयपासून तर नव्या महाविद्यालयांपर्यंत सोयी करण्यात आल्या. गावागावातील शाळेच्या जीर्ण इमारती पाडून तेथे नव्या खोल्या बांधण्यात आल्या. नरखेड तालुक्यात यासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले.
तीर्थक्षेत्र विकास निधीतून पारडसिंगा, मन्नतेश्वर, चांदणीबर्डी, चिंतामणीशवर, सोमेश्वर मंदीर आणि आनंद गढ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात आला. आज पारडशिंगा हे मोठे तीर्थक्षेत्र म्हणून उदयासयेत आहे. निराधार महिलां-पुरुषांसाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ९५०० निराधारांना आर्थिक आधार देण्यात आला. यासाठी विशेष शिबीर घेण्यात आले. एक खिडकी योजना राबवून लाभार्थ्यांचे अर्ज या योजनेसाठी भरून घेण्यात आले.
आमदार अनिल देशमुख यांनी दहा वर्षे मंत्री असताना मतदारसंघाचा विकास हेच ध्येय ठेवून काम केले. वेगवेगळ्या योजना राबवल्या. योजनेत जाणीवपूर्वक लक्ष घालून त्याचा फायदा सर्वसमान्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे योजना यशस्वी झाल्या. सामूहिक विवाह सोहोळ्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुला -मुलींचे विवाह लावून देण्यात मदत केली. आतापर्यंत ५५० जोडप्यांना याचा लाभ झाला. काटोल ते नागपूर अंतर बरेच असल्याने गरिबांसाठी रुग्णवाहिका सुरू केल्या. गरीब, हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला. शक्य होते ते सर्व केले पण, बरेच काही करायचे राहून गेले, असे देशमुख म्हणतात.
कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असल्याने कुणीही त्यांना त्यांचे काम सांगू शकतात. मंत्री असताना असलेल्या कार्यव्यस्ततेमुळे अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती आणि मुलगा सलील ही जबाबदारी सांभाळत असत. मंत्रीपद गेल्यावर खुद्द अनिल देशमुखच कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात.

मार्गी लागलेली कामे
*दान प्रकल्पासाठी १०३ कोटी रुपये
* कार प्रकल्पासाठी ११० कोटी रुपये
* चिखली प्रकल्पासाठी ४५ कोटी रुपये
* पिंपळगाव प्रकल्पासाठी ४० कोटी रुपये
* नरखेड, मोवाड, काटोल येथे १६ कोटी रुपयांच्या नवीन नळयोजना सुरू
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
* कोल्हापुरी बंधारे
* पिण्याचा पाण्याचा प्रश्न
पुन्हा निवडून आल्यास
* काटोल तालुक्यात मोठे उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न राहील.