Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गा मेरे मन गा- कनकाचा स्तुत्य प्रयत्न
डॉ. सुलभा पंडित

 

स्थानिक ‘कनक सूर मंदिर’ प्रस्तुत ‘गा मेरे मन गा’ हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. डॉ. दत्ता हरकरे यांच्या ‘कनक सूर मंदिर’ या संगीत विद्यालयात संगीताचे अध्यापन ते करीत आहेत. आजकाल संगीत शिकण्याकडे एकंदरीतच सर्वाचा कल वाढलेला आहे. लहान वयापासून ते मध्यम वयापर्यंतच्या सर्वानाच संगीत शिकण्याची इच्छा होत आहे. हे एक संगीत क्षेत्राच्या दृष्टीने स्वागतार्ह वातावरण आहे, असे नक्कीच म्हणता येईल. हौशी कलाकारांची संख्या त्यातून वाढते, हे लक्षणीय आहे. अशातूनच एखादा व्यावसायिक कलाकारही निघू शकतो, ही त्यातील जमेची बाजू म्हणता येईल. डॉ. दत्ता हरकरे यांची कन्या आणि शिष्या कु. कनका ही अशीच आपल्यासमोर घडत असलेली कलाकार आहे. तिला आपण बाल कलाकार असल्यापासून गाताना ऐकत आहोत. तिने आजवर अनेक कार्यक्रमही दिले आहेत.
अनेक स्पर्धामधून ती गायली आहे आणि तिला अशा काही स्पर्धामध्ये पुरस्कारही मिळालेले आहेत. तिची गायिका म्हणून जडणघडणही सध्या सुरू आहे. घरचेच मार्गदर्शन आणि संगीताचे वातावरण आणि तिची मेहनत यामुळे ती नक्कीच योग्य त्या मार्गावर आहे, असा विश्वास प्रस्तुत कार्यक्रमाने निर्माण केला, हे सुरुवातीलाच सांगायचे आहे. आशा भोसले यांच्या गीतांवर कार्यक्रम देणे हे एक आव्हानच असते हे आपण जाणतो. लहान वयात हे आव्हान पेलण्याचा स्तुत्य प्रयत्न तिने या कार्यक्रमातून केला. तिचा आवाज सुगमसंगीताला योग्य आहे आणि या सादरीकरणासाठी तिने भरपूर मेहनतही केली होती, हे यावेळीही स्पष्ट झाले.
निवडक मराठी-हिंदी गीतांचा नजराणा रसिकांना नक्कीच आवडला. कारण, त्यातील गीतांची निवड ही जाणीवपूर्वक करण्यात आली होती. गायनाचा कस लागेल, अशी शास्त्रीय संगीतावर आधारित काही गीते या प्रसंगी मुद्दाम निवडण्यात आली होती. ही गीते सादर करणे खरोखरच कौशल्याचे व निपुणतेचे काम होते. मुळातच हे मोठे आव्हान स्वीकारून ते समाधानकारक रितीने पूर्ण करणे हे कनकाचे या कार्यक्रमातील वैशिष्टय़ ठरले. त्यासाठी ती गीते निवडून तिच्याकडून तयारी करून घेणे हे काम गुरू या नात्याने डॉ. दत्ता हरकरे यांनी पार पाडले, हे मुद्दाम सांगितले पाहिजे.
‘वक्रतुंड महाकाय’ या गणपती स्तुतीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर तिने सादर केलेल्या गीतांमधील सांगीतिक तयारी व गुणवत्तेनुसार उल्लेखनीय ठरलेली होती. ‘तोरा मन दर्पन कहलाए’, भिनी भिनी भोर आयी’, ‘पिया बावरी’, ‘चैनसे हमको कभी’, ‘जुस्तजू जिसकी थी’, ‘निगाहे मिलाने को’, ‘यातील बारीक हरकतींना तिने चांगला न्याय दिला’, ‘भिगी भिगी फजा’, ‘ जब तक रहे तनमें जिया’, ‘ गा मेरे मन गा’, ‘मेरा कुछ सामान’, ‘शोख नजर की बिजलिया’, ‘क्यू मुझे इतनी खुशी दे’, ‘साथी रे भूल जाना’, इ. गीते तिने व्यवस्थित सादर केली. एकूण कार्यक्रमात ‘आज कुणीतरी यावे’ आणि ‘एकाच या जन्मी जणू’ ही दोनच मराठी गीते सादर झाली. ती चांगली होतीच परंतु, आशा भोसले यांची मराठी चित्रपट संगीत व सुगम संगीताची कारकीर्द इतकी संपन्न आणि समृद्ध आहे की, यातील आणखी काही गीतांची निवड करून (प्रसंगी हिंदी गीतांची संख्या कमी करूनही) त्या पूर्ण कार्यक्रमाला आणखी एक आयाम मिळाला असता. मराठी लावणी, भक्तिगीत, नाटय़गीत हे प्रकार तिच्यासारख्या नव्या दमाच्या गायिकेने सादर केले तर ते रसिकांना नक्कीच आवडेल आणि या सर्व प्रकारात आशाबाईं इतका समर्थ आवाज आणखी कोणाचा आहे? त्याचा पाठपुरावा करणे म्हणजे आपल्याच गायनाला पैलू पाडणे होय.
कार्यक्रमाचे निवेदन करण्याचा उत्तम वस्तुपाठ श्वेता शेलगावकर या नवोदित निवेदिकेने दाखवून दिला. त्याबद्दल तिचे विशेष अभिनंदन. माहिती व सादरीकरण यांचे संपूर्ण गुण तिला द्यावे लागतील. हिंदी निवेदकांमध्ये एक चांगली भर तिच्या रूपाने जाणवली. कार्यक्रमाचा वाद्यवृंद नेहमीप्रमाणेच समाधानकारक होता. श्रेय नामावली- शैलेश दाणी- सिंथेसायझर, अरविंद उपाध्ये- बासरी, विलास पुजारी- संवादिनी, गिटार -प्रवीण लिहीतकर, व्हायोलिन -निशिकांत देशमुख, तबला- मोरेश्वर दहासहस्त्र, इतर तालवाद्ये- गजानन रानडे, ऑक्टोपॅड व ढोलक राजू ठाकूर व दीपक कांबळे एकूण एक स्तुत्य प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाकडे पाहावे लागेल. कनकास हार्दिक शुभेच्छा.
०७१२-२२८४८७२