Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भटक्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात सामावून घ्या -खासदार सुळे
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

भटक्या आणि आदिवासी विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणापासून मुख्य प्रवाहात सामावून घ्या, असे आग्रही मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शिक्षण विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित विदर्भस्तरीय प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यशाळेत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
विदर्भात भटक्या जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी प्राथमिक शाळा आणि तुकडय़ा वाढाव्यात असे सांगून सुळे म्हणाल्या की, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आंतरिक मूल्यमापन व्हावे. हे मूल्यमापन शासनाऐवजी दुसऱ्या संस्थेकडून करून घ्यावे. भटक्यांची बोलीभाषा शिक्षणातील अडसर ठरू शकत नाही. प्राथमिक शिक्षण त्यांच्यासाठी असलेल्या शाळांमधूनच दिले गेल्यानंतर पुढचे शिक्षण मात्र, इतराप्रमाणेच मिळावे. याकरता त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोय करावी, असेही सुळे यांनी सूचवले.
ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही शाळाबाह्य़ मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत सुळे म्हणाल्या की, तत्कालिन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी मुंबईतील बालकामगारांना शिक्षित करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने मोहीम राबवली होती. या उपक्रमाला मुंबईत चांगले यश आले. शेकडो बाल कामगारांना या मोहिमेतंर्गत शिक्षण दिले गेले. त्या धर्तीवर राज्यात अन्य ठिकाणी शाळाबाह्य़ मुलांना शिक्षण उपलब्ध करून देता येईल, असेही सुळे यांनी सुचवले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून शासनाने परिपत्रक काढले आहे. त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची टीका त्यांनी केली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. सर्व शिक्षण अभियानातंर्गत हे शक्य आहे. या कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणात गुणवत्ता वाढीसाठी जे सूचवले जाईल, त्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर कार्यशाळेत ‘विदर्भातील प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती व पुढील दिशा’ या विषयावर अमरावतीचे वि. ला. देऊस्कर, ‘विदर्भातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता’ विषयावर शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे, ‘विदर्भातील आदिवासी मुलांचे शिक्षण’ यावर हेरंब कुळकर्णी, ‘विदर्भातील प्राथमिक शाळांमधील साधन सुविधा’ या विषयावर अमरावतीचे शिक्षण उपसंचालक लक्ष्मीकांत पांडे आणि ‘अपंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या’ या विषयावर विजय कान्हेकर यांचे भाषण झाले. यावेळी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, शिक्षण सचिव संजय कुमार, माजी केंद्रीय सचिव कुमुद बन्सल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष गिरीश गांधी होते.