Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

फवारणीचे काम अद्यापही अपूर्णच आ. मुळक यांचे मदतीचे आश्वासन
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

जिल्ह्य़ातील फवारणी कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे फवारणीच्या कामांना अद्यापही सुरुवात होऊ शकली नसल्याने जिल्ह्य़ात आगामी दिवस आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचे ठरणार आहे. फवारणी कर्मचाऱ्यांतर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपाला आमदार राजेंद्र मुळक यांनी सोमवारी भेट देऊन प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.
फवारणी कर्मचाऱ्यांना ९० दिवसांचे काम देण्यात यावे, फवारणी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी जिल्हा हिवताप निर्मूलन अस्थायी फवारणी कर्मचारी संघटनेतर्फे आरोग्य उपसंचालक कार्यालयापुढे सुरू असलेले साखळी उपोषण सोमवारी १२ व्या दिवशीही सुरूच होते. पावसाळा तोंडावर असतानाही फवारणीची कामे अपूर्ण असल्याने प्रशासनही चिंतेत आहे.
साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी फवारणी आवश्यक असतानाही ही होऊ शकली नसल्याने पावसाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर कठीण प्रसंग उद्भवू शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. मुळक यांनी आंदोलन मंडपाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांचे प्रश्न मुंबई दरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विविध मागण्यांसाठी १९८० पासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. ४०० पेक्षा जास्त फवारणी कर्मचारी असून त्यांना केवळ आठच दिवसांचे काम दिले जाते. आरोग्य विभागात बाहेरच्या विभागातील लोकांची भरती करून खऱ्या कामगारांवर अन्याय करण्यात आल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांचे काम होते. मात्र ते आता केवळ आठ दिवसांवर आले असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांना निवेदन देण्यात आले. असून मागण्या मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.