Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मंदिरे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ -स्वामी जयतीर्थ
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

मंदिरे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असून तेथूनच जीवनातील उच्चतम मूल्ये आणि संस्कारांचे चिंतन होत असल्याचे मत त्यांनी स्वामी जयतीर्थ यांनी व्यक्त केले. पूर्व वर्धमाननगर येथील स्वामी नारायण मंदिरात रविवारी १२ वा पाटोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित प्रवचनात स्वामी जयतीर्थ बोलत होते.
यावेळी प्रेमप्रकाश स्वामी, ब्रम्हकीर्तन स्वामी, हरीषभाई कोठारी, हर्षदभाई दोशी प्रामुख्याने उपस्थित होते. पाटोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वेदोपचारात विधिवत महापूजेने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. भाविकांनी भक्तिभावाने तयार केलेल्या पक्वानांचा अन्नकुट भोग देवाचरणी अर्पण करण्यात आला. यावेळी स्वामी नारायण शाळेच्या दहावीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
शाळेतून प्रथम पाच विद्यार्थ्यांंचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात रोहीत, भावेश, ऋतुजा रतकंठीवार, विशाखा तन्ना, सुमिती मुलतानी, जैमीन पटेल यांचा समावेश आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेमप्रकाश स्वामी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. मंदिराचे प्रेमप्रकाश स्वामी यांनी परमेश्वर आणि संतांच्या महिमांचे वर्णन केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याचीही माहिती दिली.