Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जात वैधता प्रमाणपत्रे अविलंब देण्याची मागणी
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल करावी तसेच इतर मागासवर्गीय व मागासवर्गीयांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी नागपूर शहर काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष अरूण नारखेडे यांनी केली.
इतर मागासवर्गीय व मागासवर्गीयांना विनाविलंब जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी दोन वर्षांंपूर्वी नागपूर विभागाच्या समाजकल्याण विभागात तीन कार्यालये स्थापन करण्यात आली होती. वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्हय़ाकरता समिती क्र.१ नागपूर येथे, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ाकरता समिती क्र.२ व त्याचे कार्यालय चंद्रपूर येथे आणि नागपूर जिल्हय़ाकरता समिती क्र.३ व त्याचे कार्यालय नागपूर येथे स्थापन करण्यात आले होते. बारावीचा निकाल लागून दोन आठवडे होऊनसुद्धा नागपूर विभागाच्या आठ हजार अर्जांपैकी फक्त २५०० वैधता प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. समिती एक व दोनची परिस्थिती याहून बिकट आहे.
उच्च शिक्षणाकरिता इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज जमा करतेवेळी महाविद्यालयाने जातीचे वैधता प्रमाणपत्र आवश्यक केल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. एका कार्यालयाची तीन कार्यालये होऊनसुद्धा समस्या कमी झालेल्या नाहीत. अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व समस्या सोडवावी. भविष्यात मुलांना शाळेत शिकताना वेळेच्या आधीच जात वैधता प्रमाणपत्र कसे उपलब्ध होईल, त्याकरता योजनाबद्ध कार्यक्रम तयार करून राबवावा व मागासवर्गीयांना जात वैधता प्रमाणपत्र लवकर मिळण्याकरता प्रयत्न व्हावे, अशी मागणी नारखेडे यांनी केली आहे.