Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

लाल बंगला उद्या नागरिकांसाठी खुला राहणार
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

सिव्हिल लाईन्स परिसरातील उद्योग भवनाजवळ असलेल्या लाल बंगला उद्या, बुधवारी नागरिकांना बघण्यासाठी खुला करण्यात येत आहे. या बंगल्याबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जागतिक बंधुत्वदिनी म्हणजेच बुधवारी हा बंगला नागरिकांना पाहता येईल, अशी माहिती फ्रिमेसन्स ऑफ नागपूर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक बंधुत्व दिनानिमित्त येत्या बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर बंगल्यातील मंदिर सर्वांसाठी खुले राहणार आहे. या ठिकाणी सदस्यांशिवाय इतरांना पहिल्यांदाच प्रवेश देण्यात येणार आहे, असे संघटन सचिव तरुण मेहरा यांनी सांगितले.
संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबवण्यात येतात. पण, त्याची फारशी वाच्यता करण्यात येत नाही. मातृ सेवासंघाला अलीकडे काही खोल्या बांधून देण्यात आल्या, याकडेही मेहरा यांनी लक्ष वेधले. फ्रिमेसन्स ही एक चळवळ असून अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांसह देश-विदेशातील अनेक मान्यवर या संस्थेचे सदस्य आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस संघटनेचे सदस्य कर्नल अभय पटवर्धन, बालेश माथुर, पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, प्रवीण कोटेश्वर, जितेन श्रीवास्तव, आबिद चिमथानवाला आदी उपस्थित होते.