Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

..तर राष्ट्रपती भवनासमोर आंदोलन
पशु व मत्स्य विद्यापीठ कृती समितीचा इशारा
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

राज्यपालांनी आंदोलनाची दखल न घेतल्यास राष्ट्रपती भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा पशु व मत्स्य विद्यापीठ भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने दिला आहे. विद्यापीठातील शिक्षक व बिगर शिक्षक अशा ४५० पदांच्या पदभरती घोटाळ्याची चौकशी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांच्या मार्फत सुरू असताना सुद्धा विद्यापीठाने २० जूनपासून नवीन पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी बेजबाबदार भूमिकेबाबत कुलपती व कुलगुरू यांचा मुंबईतील आझाद मैदानावर ‘राज्यपाल हटाओ पशुविज्ञान विद्यापीठ बचाओ’ आंदोलन करण्यात आले. कारण राज्यपालांनी कुलपती या नात्याने पदभरतीला स्थगिती दिली नसल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. दरम्यान मुंबईत राज्यपालांचे प्रभारी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या सोबत समितीच्या लोकांची चर्चा झाली. पशु विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण निनावे यांनी चौकशी दरम्यान सुरू केलेली पदभरती प्रक्रिया ही भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान परिषद यांच्या दबावामुळे होत असून राज्यपाल कार्यालय त्यास स्थगिती देण्यास असमर्थ असल्याचे समितीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या पदभरती घोटाळ्याच्या चौकशीचा अंतिम अहवाल ३० जूनपर्यंत सादर न झाल्यास त्याचप्रमाणे पदभरती प्रक्रियेला त्वरित स्थगिती न दिल्यास आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास समितीतर्फे राष्ट्रपती भवनासमोर आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात डॉ. सुरेंद्र सावरकर, रमेश भंडारे, सुरेंद्र गाडबैल, युसूफ इसार, दत्त पराते, सर्जेराव वाघमोडे, संदेश जैन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.