Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अभ्यासात सातत्य असल्यास स्पर्धा परीक्षेत यश -नाथे
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

लोकसेवा आणि राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवा करण्याची उत्तम संधी तरुणांना उपलब्ध आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन, जिद्द, मेहनतीची तयारी व अभ्यासातील सातत्य असल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन प्रा. संजय नाथे यांनी केले.
अखिल भारतीय बेलदार समाजाच्यावतीने ‘१० वी, १२ वी व पदवीनंतर करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदास श्रीगिरीवार होते. प्रा. नाथे म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. मात्र, याच स्पर्धेमुळे करिअरच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. जागतिकीकरण व उदारीकरणाने जशा खाजगी क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यात, त्याचप्रमाणे शासकीय व्याप वाढल्यामुळे शासनाच्या सर्वच विभागात नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. शासकीय सेवेचे आकर्षण असलेल्या तरुणांसाठी शासनाच्या विविध विभागात करिअर करण्याच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
दहावी, बारावीनंतर रेल्वे, बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन, इपीएफओ, जिल्हा निवड मंडळ आदीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा देता येतात, असेही प्रा. नाथे यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रा. अमोल दूरने, अखिल भारतीय बेलदार समाजाचे अध्यक्ष डॉ. मनोहर मुद्देशवार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला डॉ. रमेश सिंगम, सुधाकर गुंडलवार, हरिभाऊ दासरवार, अरविंद ब्रोमरतवार, विनोद आकुम्बर, रितेश सिंगम, डॉ. सुरेश आकुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.