Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आमदार मुळक यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

अस्थायी फवारणी कर्मचारी संघटनेतर्फे आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरातील जिल्हा हिवताप कार्यालयापुढे अस्थायी फवारणी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. आमदार राजेंद्र मुळक यांनी धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले.
अस्थायी फवारणी कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार आरोग्य सेवक पदासाठी नियुक्ती करावी, वयोमर्यादेची अट रद्द करावी, फवारणी कर्मचाऱ्यांना वर्षांतून अकरा महिने काम द्यावे, ज्यांनी ९० दिवस काम केले नाही, त्यांचे नाव ज्येष्ठता यादीतून वगळण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा हिवताप निर्मूलन फवारणी कर्मचारी संघटनेचे१० जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. आमदार राजेंद्र मुळक यांनी सोमवारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
कर्मचाऱ्यांचे प्रश्न आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन मुळक यांनी कर्मचाऱ्यांना दिले. याप्रसंगी वसंत मुंडले, चंद्रशेखर गेडाम, नरेश मेश्राम, मुरली घरडे, नरेश घरडे, ज्ञानेश्वर मानवटकर, शिवशंकर हिरेखन, श्यामराव दहेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.