Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

युवकांचा गुणवत्ता विकास आराखडा ऑगस्टमध्ये सरकारला सादर करणार
वार्तालाप कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

युवकांच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा तात्पुरता आराखडा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येत्या ऑगस्ट महिन्यात सरकारला सादर करणार असल्याची माहिती बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना दिली.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, प्राथमिक शिक्षणाशी ज्या घटकांचा संबंध येतो त्यांना एकत्र आणून, गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत आम्ही सरकारला सूचना करतो. यासाठीच विभागनिहाय गटचर्चा सुरू आहेत. १३ ते ३५ वर्षे वयोगटातील युवकांचे आरोग्य, शिक्षण व नोक ऱ्या या विषयांशी संबंधित मुद्यांचा यात विचार करण्यात येत आहे. राज्याचे कुठलेही युवा धोरण नाही. त्यामुळे गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा तात्पुरता आराखडा येत्या १२ ऑगस्टला आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत. सरकारने त्याचा अभ्यास करून १२ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करावी, असा आग्रह धरला जाईल.
युवा, शिक्षण आणि महिलांचे बचतगट असे आमचे तीन उपक्रम असून त्यापैकी पहिल्या दोन विषयांबाबत आज नागपुरात चर्चा झाली. बचतगटांची बैठक उद्या मुंबईत बोलावण्यात आलेली असल्याने त्याबाबत चर्चा होऊ शकली नाही, असे सुळे म्हणाल्या. गावांमध्ये चांगले शिक्षण व इतर मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या तर, शहरांकडे येणारे लोंढे थांबतील. गावांमध्ये कौशल्याचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनाही गावांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात गुणवत्तेची कमतरता नाही, मात्र मागास भागातील मुलांना संधी मिळाली पाहिले. राज्यातील औद्योगिक शिक्षण संस्थांचा (आय.टी.आय.) दर्जा वाढवून तेथे विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तुम्हाला सामाजिक उपक्रम महत्त्वाचे वाटतात की राजकारण, या प्रश्नावर या दोहोंमध्ये आपल्याला विशेष फरक वाटत नसल्याचे उत्तर सुप्रिया यांनी दिले. मी ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करते, त्यांचेच प्रश्न मी या माध्यमातून मांडत असल्याचे त्या म्हणाल्या. राजकारणात निवृत्तीची वयोमर्यादा असावी काय, या प्रश्नावर ‘अजिबात नाही’ असे त्या उत्तरल्या. मग युवकांना वाव कसा मिळेल, असे विचारले असता युवकांनी कामाच्या माध्यमातून पुढे यावे, असे त्या उत्तरल्या. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणे हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीच अडचणीचा मुद्दा नव्हता, असे त्या म्हणाल्या.
बारामतीतून लोकसभेवर निवडून येण्याची कामगिरी केल्यामुळे केवळ ‘शरद पवार यांची मुलगी’ ही तुमची मर्यादित ओळख पुसली गेली आहे काय, असा प्रश्न विचारला असता ‘आयुष्यभर शरद पवार यांची मुलगी अशी ओळख राहायला मला आवडेल’ असे सुप्रिया यांचे उत्तर होते. शेतकऱ्यांसाठीच्या पॅकेजमुळे त्यांच्या आत्महत्या कमी झाल्या असल्या तरी, केवळ पॅकेज हा उपाय नाही. त्यांच्यासाठी असलेल्या योजना पूर्ण करण्याची गरज आहे, असे सुळे म्हणाल्या.
माओवाद्यांचा प्रश्न गंभीर असून, त्यांची समस्या असलेल्या भागात विकास पोहचवू, तेव्हाच हा प्रश्न सुटेल. या उद्देशानेच केंद्राने त्या भागासाठी विशेष पॅकेज तयार केले आहे. गृहमंत्री चिदंबरम यांनी या संदर्भात घेतलेला निर्णय योग्यच असणार, असेही त्या म्हणाल्या. राज्यात गडचिरोली भागाकडेही सरकार लक्ष देत असून येत्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही त्या भागात जाऊ, असे त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नागपूर विभागीय अध्यक्ष गिरीश गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक धवड यावेळी हजर होते.