Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेगाब्लॉगमध्येही वीज केंद्रांना पुरेसा कोळसा
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

भिलाई- बिलासपूर मार्गावर सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीला अडथळा आलेला असला तरी त्यामुळे कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रांना दैनंदिन लागणाऱ्या कोळशाच्या पुरवठय़ात कोणताही अडथळा आलेला नाही. महानिर्मितीच्या व्यवस्थापनाने यासंदर्भात वेळीच हालचाल केल्याने कोळशाअभावी येऊ घातलेले वीजतुटीचे संकट तुर्त टळले आहे. मेगाब्लॉक २५ जूनपर्यंत होणार असला तरी पर्यायी मार्गानी कोळशाची व्यवस्था करण्यात आल्याचे महानिर्मितीच्या सूत्रांनी सांगितले.
कोराडी व खापरखेडा या दोनही वीज केंद्रातून सातत्याने वीजनिर्मिती होण्यासाठी कोळशाचा पुरेसा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महानिर्मितीच्या दोनही वीजकेंद्रांना वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, महानदी कोलफिल्ड लिमिटेड (एमसीएल) तसेच साऊथ ईस्ट कोलफिल्ड लिमिटेड (एसईसीएल) यांच्याकडून कोळशाचा पुरवठा करण्यात येतो. कोराडी वीज केंद्राला दररोज १३ हजार ५०० टन तर खापरखेडय़ासाठी १५ हजार टन कोळशाची गरज भासते.
भिलाई-बिलासपूर मार्गावर २२ जूनपासून चार दिवस मेगाब्लॉक घोषित करण्यात आल्याने कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रांसाठी लागणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीत व्यत्यय येणार असल्याने वीज उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. कोराडी वीज केंद्राला लागणारा ९० टक्के तर खापरखेडा केंद्राला लागणारा ६२ टक्के एमसीएल तसेच एसईसीएल यांच्यातर्फे एकत्रितपणे पुरवण्यात येतो. यापैकी एमसीएलचा कोळसा संबलपूर-रायपूर-भिलाई-दुर्ग या मार्गाने रेल्वे वाघिणीद्वारे नागपूपर्यंत आणण्यात येतो. त्यामुळे कोळशाचा पुरवठा होऊ शकला नाही तर वीजनिर्मितीत घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
कोळशाची गरज भागवण्यासाठी महानिर्मितीच्या व्यवस्थापनाने प्रयत्न चालवले होते. संकटातून मार्ग काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या अन्य कोळसा पुरवठादार कंपनीकडून जादा कोळशाची व्यवस्था होत आहे. शिवाय नागपूरजवळील सावनेर-डुंबरी खुर्द येथून हा कोळसा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे सध्यातरी संकट दूर आहे, असे महानिर्मितीचे महाव्यवस्थापक बिघाने यांनी सांगितले.