Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

नागपूर रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या तीन अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वेने आज कारवाई केली.
रेल्वेचा परवाना असल्याशिवाय स्थानकावर किंवा फलाटावर खाद्यपदार्थाची विक्री करता येत नाही. रेल्वे विक्रेत्यांना परवाना देताना खाद्यपदार्थांची गुणवत्ता राखावी लागते त्यासाठी निकषही ठरवण्यात आले आहेत. परंतु, परवाना धारक विक्रेते निकष पाळत नाही. उलट अधिक शुल्क आकारत असल्याचे आढळून आले. याशिवाय, नागपूर रेल्वे स्थानकावर अनेक अनधिकृतपणे विक्रेते खाद्यपदार्थ विकतात. मात्र यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत नाही. थातूरमातूर कारवाई केली जात असल्यामुळे आठ-दहा दिवसांनी परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचा अनुभव आहे. आज परत, रेल्वेने अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोहीम सुरू केली. यामध्ये प्रवीण राव, अनिल राऊत आणि विलास राव यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना पाचशे रुपये दंड व सहा महिने कैद होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रगड येथे भाजीपोळी तयार करून ती नागपूर रेल्वे स्थानकावर विकल्या जाते. ही भाजीपाळी खाण्यायोग्य नसते. अगदी गाडीत बसल्याजागी भाजीपोळी मिळत असल्याने आणि गाडी सुटणार असल्याने घाईगडीत प्रवासी भाजीपोळी घेतात. अनधिकृत विक्रेत्यांकडून निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जाते. याबाबत वाणिज्य विभागाने रेल्वे स्थानकाची निगराणी करण्याकरिता नियुक्त केलेले कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बल, तसेच लोहमार्ग पोलीस अल्प लाभासाठी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.