Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महाराजबाग संरक्षक भिंतीचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

महाराजबागेच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारतर्फे ६८ लाख रुपये मंजूर झाले असून, भिंतीचे बांधकाम सुरू झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिल्यानंतर, हे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देश खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. महाराजबागेच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांनी केली आहे. तिच्या सुनावणीदरम्यान न्या. सिन्हा व न्या. भंगाळे यांच्या खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.
महाराजबागेला नाल्याकडच्या बाजूने संरक्षक भिंत नसल्यामुळे या प्राणिसंग्रहालयाला काही सुरक्षा राहिलेली नाही, या व इतर समस्यांकडे लक्ष वेधणारे जे पत्र चौबे यांनी न्यायालयाला पाठवले होते, त्याची न्यायालयाने जनहित याचिकेच्या स्वरूपात दखल घेतली आहे. यापूर्वी याचिकेच्या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने महाराजबागेच्या कामासाठी १ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले असून महापालिकेने ४० लाख रुपये दिले असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली होती. आता सरकारने अर्थसंकल्पात मंजुरी दिलेले ६८ लाख रुपये विभागीय आयुक्तांकडे पोहचले असून, त्यांनीही या कामाला मंजुरी दिली असल्याची माहिती सरकारी वकील नितीन सांबरे यांनी दिली. या कामाचा कार्यादेशही निघाला असून त्याचे बांधकाम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
आता रक्कम मिळाली असल्याने भिंतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश देऊन खंडपीठाने याचिकेची सुनावणी आठ आठवडय़ांसाठी स्थगित केली. याचिकाकर्त्यांतर्फे श्रीकांत खंडाळकर तर, न्यायालयीन मित्र म्हणून एस.सी. मेहाडिया या वकिलांनी काम पाहिले.