Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अग्रवालने कळमना अर्बनमध्ये २० कोटी गुंतवल्याचे उघड
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

आरोपी प्रमोद अग्रवालने विविध प्रलोभने दाखवून गोळा केलेल्या ठेवींमधून वीस कोटी रुपये एकटय़ा कळमना अर्बन सोसायटीत गुंतवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
दामदुप्पटीचे आमिष दाखवून महादेव लँड डेव्हलपर्सचा संस्थापक आरोपी प्रमोद अग्रवालने ८ कोटी ६ लाख ९४० रुपये गोळा केले. या रकमेतून त्याने महादेव लँड डेव्हलपर्समध्ये रक्कम गुंतवलीच याशिवाय कळमना मार्केट अर्बन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत वीस कोटी रुपये गुंतवले असल्याचे खुद्द आरोपी प्रमोद अग्रवाल याने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला सांगितले.
या सोसायटीत त्याची पत्नी रेणुका महादेव लँड डेव्हलपर्सची संचालक आहे. कळमना अर्बन सोसायटीचा अध्यक्ष मुकेश रामरतन अग्रवाल हा अध्यक्ष, आशीष विजय अग्रवाल हा उपाध्यक्ष तर गजानन लीलाधर अग्रवाल हा संचालक आहे. हे तिघे प्रमोद अग्रवालचे पुतणे आहेत. प्रमोद सोसायटीचा सचिव आहे. रेणुका अग्रवाल, मुकेश अग्रवाल, आशीष अग्रवाल व गजानन अग्रवाल या चार आरोपींना धंतोली पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने २० तारखेला अटक केली. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने आज प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी तिवारी यांच्यापुढे हजर करण्यात आले. रेणुकाला न्यायालयीन कोठडी तर इतर तिघांना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.