Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मोटारसायकल ट्रेलरवर आदळली; चालक ठार
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

वेगात असलेली मोटारसायकल ट्रेलरवर आदळून चालक ठार झाला. गेल्या दोन दिवसातील हा तिसरा अपघात असून तिघे ठार झाले.
सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास ओंकारनगर ते मानेवाडा चौकदरम्यान हा अपघात घडला. एमएच३६/१०६९ क्रमांकाचा ट्रेलर नरेंद्र नगरकडून दिघोरीकडे वेगात जात होता. अचानक चालकाने ब्रेक लावल्याने मागून वेगात येत असलेली बजाज कॅलिबर मोटार सायकल (एमएच३१/बीपी/५५४४) ट्रेलरवर आदळली. या अपघातात मोटारसायकल चालक देवेंद्र नारायण इंगोले (रा़ नवीन सुभेदार ले आऊट) हा जागीच ठार झाला़ अजनी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
इनोव्हा कारच्या धडकेने गँगमन ठार
पूर्व नागपुरातील जुना मोटार स्टँड चौकात वेगात आलेल्या इनोव्हा कारने (एमएच३१/सीएन/२८४४) रस्त्याने पायी जाणाऱ्या अमृतलाल काजुराम पारखे (रा़ रामनगर बैतुल) याला जोरदार धडक दिली. यात अमृतलाल ठार झाला. काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. तो दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत गँगमन होता. अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी कार चालकाविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला़
जखमी वृद्धेचा मृत्यू
मोटारसायकलच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या पादचारी वृद्धेचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजतानंतर बोले पेट्रोलपंप ते अलंकार टॉकीज दरम्यान हा अपघात घडला. वेगात आलेल्या मोटारसायकल चालकाने रस्त्याने पायी जाणाऱ्या एका ८० वर्षांच्या महिलेस मागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आल़े तेथे उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला़ त्या महिलेची ओळख पटली नाही. अपघातानंतर पळून गेलेल्या अनोळखी मोटारसायकल चालकाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला़
पादचारी जखमी
मोटारसायकलच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी झाला. कामठी मार्गावरील पिवळी नदीजवळ सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. सुंदरलाल उईके हा पायी जात असता वेगात आलेल्या मोटारसायकलने (एमएच३१/ऐझेड/६५५२) त्याला धड दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुंदरलालला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपगातानंतर पळून गेलेल्या आरोपी मोटारसायकल चालकाविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.