Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

चिखलफेक न थांबवल्यास ‘प्रकरणे’ बाहेर काढू - कर्डिले
विखेंवर गैरव्यवहाराचे अनेक आरोप
नगर, २३ जून/प्रतिनिधी
माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या पद्मश्री विखे फाउंडेशनने विळद घाटात (ता. नगर) सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे तेथे इमारती बांधल्या असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला. विखे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील चिखलफेक न थांबवल्यास त्यांच्या सहकारी व शिक्षण संस्थांमधील प्रकरणे बाहेर काढावी लागतील, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

नगरच्या विकासासाठी १३१ कोटींचा प्रस्ताव
नगर, २३ जून/प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कोकण व नाशिक विभाग विकास कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या वतीने नगर शहर विकासासाठी १३१ कोटी ३४ लाखांच्या विविध कामांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महापौर संग्राम जगताप यांना पत्र देऊन या कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव पाठवण्यास सूचवले होते.

भगवतीपूर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची बंदोबस्तात निवड
तेरापैकी उपाध्यक्षांसह पाच सदस्य गैरहजर
कोल्हार, २३ जून/वार्ताहर
कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ जिजाबा खर्डे, उपाध्यक्षपदी वसंतराव भगवंतराव खर्डे, कोषाध्यक्षपदी बाबासाहेब दळे, तर सचिवपदी हरिकिसन यादवराव खर्डे यांची आज निवड करण्यात आली. मंडळाचे नवनियुक्त १३ सदस्यांपैकी ८ सदस्य या वेळी उपस्थित होते. दरम्यान, नवीन विश्वस्त मंडळ विरोधी आंदोलनाचे प्रमुख सदस्य व कोल्हारचे सरपंच सुरेंद्र खर्डे यांनी सभेची नोटीस न मिळाल्याच्या कारणावरून सभात्याग केला.

दिल्ली दरवाजासमोरील गाळे पाडणार!
नगर, २३ जून/प्रतिनिधी

दिल्ली दरवाजा ते पत्रकार चौक या रस्त्याच्या रूंदीकरणात अडथळा होत असलेले दिल्ली दरवाजासमोरचे ६६ गाळे पाडण्याचा महत्त्वाचा निर्णय आज महापालिकेत यासंबंधी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे निमंत्रण असतानाही सहभागी न होता फक्त आयुक्तांना गाळेधारकांच्या वतीने निवेदन देऊन आमदार अनिल राठोड निघून गेले. पदाधिकाऱ्यांशी बोलणे गरजेचे नाही. प्रशासनाला निवेदन दिले आहे.

इंधन बिलांअभावी ९ टँकर जागेवरच उभे
नगर तालुक्यातील १७ गावे, १२ वाडय़ा तहानलेल्या
नगर, २३ जून/प्रतिनिधी

इंधन बिलांअभावी नगर तालुक्यातील १७ गावे व १२ वाडय़ांना पाणीपुरवठा करणारे ९ टँकर गेल्या ३ दिवसांपासून जागेवर उभे आहेत. नगर तालुक्यातील जि. प. सदस्य अरुण होळकर, बाळासाहेब हराळ व संदेश कार्ले यांनी याबद्दल जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. टँकर बंद पडण्यास प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप या सदस्यांनी केला.

भाजप कार्यकर्त्यांचे उपोषण
तिसऱ्या दिवशीही सुरूच

श्रीरामपूर, २३ जून/प्रतिनिधी

गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी कार्यकर्त्यांनाच धमक्या देण्यास प्रारंभ केल्याने हिंदू रक्षा कृती समितीने उद्या (बुधवारी) ‘शहर बंद’चे आवाहन केले आहे.भाजपचे नेते प्रकाश चित्ते यांच्या खुनाची सुपारी घेणाऱ्या आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु पोलिसांनी गुन्ह्य़ाचा तपास योग्य पद्धतीने सुरू केला नाही, म्हणून शहराध्यक्ष दीपक दुग्गड, संजय पांडे, महेंद्र साळवी व विकास शिंदे यांनी गांधीचौकात सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता.

आमदार घुलेंची आज पाथर्डीत बैठक
प्रचाराचा ‘नारळ’ वाढविणार?
पाथर्डी, २३ जून/वार्ताहर

शेवगावचे राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र घुले उद्या (बुधवारी) तालुक्याच्या दौऱ्यात गोरे मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत घुलेंच्या प्रचाराचा प्रारंभ म्हणून या बैठकीकडे पाहिले जाते. मतदारसंघ पुनर्रचनेत पाथर्डी तालुक्याचे विभाजन होऊन पाथर्डी व टाकळीमानूर ही मंडळे शेवगाव मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली. राज्याच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्याने या नवीन मतदारसंघातून (शेवगाव-पाथर्डी) घुले पुन्हा रिंगणात उतरणार हे निश्चित आहे.

स्वतचा निधी मनपा वापरतच नाही!
पाईपलाईन रस्त्याबाबत तक्रारी; ठेकेदाराला ३ महिने मुदतवाढ
नगर, २३ जून/प्रतिनिधी

रस्ते विकासासाठी राज्य सरकारने महापालिकेला दिलेल्या ११ कोटींच्या निधीच्या पहिल्या टप्प्यातील कामाची व खर्चाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नुकतीच तपासणी झाली. मनपा स्वतच्या निधीची भर न घालता फक्त सरकारच्या निधीतून कामाला सुरुवात करीत असल्याबद्दल आयुक्त कार्यालयाने नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

‘पंचायत राज व्यवस्थाच ग्रामीण भारताचे चित्र बदलेल’
नगर, २३ जून/प्रतिनिधी

हिवरेबाजारचा आदर्श अन्य ग्रामपंचायतींनी घ्यायला हवा. अशा पंचायत राज व्यवस्थेतूनच ग्रामीण भारताचे चित्र बदलू शकेल, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाचे सहसचिव डॉ. सुधीर कृष्णा यांनी केले. नगर तालुक्यातील हिवरेबाजारमधील सर्व विकासकामांची पाहणी डॉ. कृष्णा यांनी केली. श्री. पोपटराव पवारांसारखे दिशादर्शक नेतृत्व, लोकसहभाग आणि कामाविषयी आत्मियता असेल, तर दुष्काळी गावाचे सर्वागीण रूप पालटते, असे ते म्हणाले मागास विभाग विकास प्रकल्पाचे उपसचिव सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, गटविकास अधिकारी अजवेलकर आदी या वेळी उपस्थित होते. श्री. पोपटराव पवार यांनी सर्वाचे स्वागत करून गावाची माहिती दिली.

मालमोटारीची दुचाकीला धडक; एक जागीच ठार, एक जखमी
नगर, २३ जून/प्रतिनिधी
मालमोटारीची धडक बसून मोटरसायकलवरील एकजण ठार, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. नगर-श्रीगोंदे रस्त्यावरील काळेवाडी गावाजवळ आज साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. जि. प. बांधकाम विभागाचे सभापती बाळासाहेब गिरमकर यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत करून रुग्णालयात हलविले. सुरेश लक्ष्मण क्षीरसागर (वय ३०) असे मृताचे नाव असून, ते अपंग होते. दत्तात्रेय नामदेव काळे (दोघेही अजनूज, ता. श्रीगोंदे) अपघातात जबर जखमी झाले. काळे व क्षीरसागर आपल्या मोटरसायकलवरून गावाकडे जात होते. काळेवाडी फाटय़ानजीक त्यांना दौंडकडे जाणाऱ्या मालमोटारीने चिरडले. मागील बाजूस बसलेले क्षीरसागर जागेवरच ठार झाले. अपघातानंतर मालमोटारचालक पळून गेला. अपघातग्रस्त गिरमकर यांच्या गावचे रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच गिरमकर यांनी तातडीने रुग्णवाहिका पाठवून जखमीस नगरला दवाखान्यात आणले. अपघाताबाबत नगर तालुका पोलिसांनी मालमोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आषाढी एकादशीसाठी ३१५ जादा बसगाडय़ा
नगर, २३ जून/प्रतिनिधी

आषाढी एकादशीसाठी (३ जुलै) पंढरपूरला जाऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्य़ातील भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या नगर विभागातर्फे ३१५ जादा बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक जे. एम. उदमले यांनी दिली. दि. २८ जून ते ७ जुलैदरम्यान या जादा गाडय़ा धावणार आहेत. जिल्ह्य़ातील सर्व १४ तालुक्यांतून या गाडय़ा सोडण्यात येतील. किमान ५० भाविक पंढरपूरला जाऊ इच्छित असणाऱ्या गावातून जादा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जाण्याबरोबरच परतीच्या प्रवासाचेही ग्रुप बुकिंग स्थानिक आगारातून करता येईल. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारप्रमुख व स्थानकप्रमुखांची विशेष नियुक्ती या काळात करण्यात आली आहे. या संदर्भात माहितीसाठी नागरिकांनी स्थानिक आगारप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन उदमले यांनी केले.

बाल न्यायमंडळातर्फे उद्या लोकन्यायालय
नगर, २३ जून/प्रतिनिधी

जिल्हा बाल न्यायमंडळातर्फे विधी संघर्षग्रस्त बालक लोकन्यायालयाचे आयोजन रिमांड होम (निरीक्षण गृह) येथे दि. २५ला सकाळी १० वाजता करण्यात आले असल्याची माहिती बाल न्यायमंडळाचे प्रमुख न्यायाधीश अनिल खडसे यांनी दिली. लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रधान जिल्हा न्यायाधीश पी. बी. पाटील यांच्या हस्ते होत असून, अध्यक्षस्थानी शहर वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी अनभुले असतील. मुख्य न्यायदंडाधिकारी गजानन जोगी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्यायाधीश पंकज शहा, सरकारी वकील सुभाष भोर, सुरेश लगड, वकील संघाचे उपाध्यक्ष मंगेश दिवाणे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या लोकन्यायालयात ५० खटले तडजोडीसाठी ठेवण्यात येतील. खटल्यांचे पॅनेल प्रमुख न्यायाधीश खडसे, तर सदस्य म्हणून वकील नीलिमा गांधी व लता वाघ काम पाहतील.

एसटी वेतन करार पॅकेजला पुढील आठवडय़ात मंजुरी शक्य
नगर, २३ जून/प्रतिनिधी
एसटी कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या वेतन कराराच्या पॅकेजला पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महाराष्ट्र एसटी वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष दिनकर लिपाणे यांनी दिली.‘इंटक’चे अध्यक्ष गोविंदराव आदिक यांच्या नेतृत्वाखाली एसटीमधील सर्व संघटनांच्या कृती समितीची बैठक नुकतीच मुंबईत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. पुढील आठवडय़ात मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करून एसटी कामगारांची वेतन करार व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पवार यांनी या वेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले, असेही लिपाणे यांनी सांगितले.

‘न्यू आर्टस्’जवळ लवकरच अंबिका बँकेची शाखा
नगर, २३ जून/प्रतिनिधी
अंबिका महिला सहकारी बँकेला न्यू आर्टस् महाविद्यालयाजवळ नवीन शाखा उघडण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती बँकेच्या अध्यक्ष भारती आठरे यांनी दिली.बँकेची ही तिसरी शाखा असेल. सन २००८-०९ या आर्थिक वर्षांत बँकेस ३१ लाख ६ हजार रुपयांचा नफा झाला असून, ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा संचालकांचा मानस आहे. गतवर्षीच्या तुलनेत बँकेच्या ठेवी व कर्जवाटपात सरासरी २ कोटीने वाढ झाली आहे. बँकेचा एनपीए २.९१ टक्के इतका आहे, असेही आठरे यांनी सांगितले.

कोरठण खंडोबा येथे सोमवती अमावस्या उत्सव
नगर, २३ जून/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान (पिंपळगाव रोठे) येथे सोमवती अमावस्या पर्वणी उत्सव उत्साहात पार पडला.या निमित्ताने खंडोबाच्या स्वयंभू तांदळ्याला मंगलस्नान, पूजा, अभिषेक करण्यात आला. पालखी मिरवणूक, तळीभांडार, महाआरती आदी कार्यक्रम झाले. जगताप, घुले परिवारातर्फे आमटी-भाकरीचा महाप्रसाद वाटण्यात आला. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष रामदास मुळे, सरचिटणीस दादाभाऊ सोनावळे आदी उपस्थित होते.

खर्डा येथे २ जुलै रोजी पत्रकारांसाठी कार्यशाळा
नगर, २३ जून/प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २ जुलै रोजी पत्रकारांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जामखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोषकुमार थोरात यांनी दिली.कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेस नगर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्य़ांतील पत्रकारही उपस्थित राहणार आहेत.

निघोजचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद
निघोज, २३ जून/वार्ताहर
तीन दिवसांपासून पाणीयोजना बंद पडल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.रोहित्र जळाल्याने, तसेच वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठय़ामुळे नवीन नळयोजना तीन दिवस बंद आहे. या परिसरात अनधिकृत वीज जोडणीधारकांची संख्या वाढल्याने कमी दाबाने वीजपुरवठा केला जातो. याचाच फटका नागरिकांना सहन करावा लागतो. रोहित्र जळाल्याने नळयोजना बंद पडल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल झाले आहेत. उद्या (बुधवारी) नळ योजना सुरळीत होईल, असे ग्रामसेवक शिवाजी खामकर यांनी सांगितले. कडक उन्हाळ्यात पाणीटंचाई ग्रामस्थांना जाणवली नाही.

‘इब्टा’चे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू
नगर, २३ जून/प्रतिनिधी

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने ऐच्छिक विमा व लकी ड्रॉमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करीत पैसे परत मिळावेत व दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनच्या (इब्टा) वतीने शिक्षक बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. दिवसभरात बँकेच्या अनेक संचालकांनी आंदोलकांची भेट व धरणे मागे घेण्याची विनंती केली. स्वाभिमानी ऐक्यचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष कल्याण राऊत यांनी आज इब्टाच्या या आंदोलनाला लेखी पाठिंबा दिला. पैसे भरणाऱ्या शिक्षकांना पॉलिसी मिळवून देण्याची संचालकांची तयारी आहे. मात्र, बाहेरील व्यक्तींची जबाबदारी घेण्यास ते तयार नाहीत. फसवणूक झालेल्यांनी पोलीस किंवा सहकार खात्याकडे तक्रार करू नये म्हणून शिक्षकांचे पॉलिसी फॉर्म भरून घेतला जात आहे, यातही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्यांना रोख पैसे परत द्या व विमा पॉलिसी कागदपत्रांची होळी करा, असा इब्टाचा पवित्रा आहे.

लोकन्यायालयात १३५पैकी ८० दावे निकाली
देवळाली प्रवरा, २३ जून/वार्ताहर

राहुरी तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघटनेच्या वतीने राहुरी न्यायालयाच्या प्रांगणात झालेल्या लोकन्यायालयात १३५ दाखल दाव्यांपैकी ८० दावे निकाली कोढण्यात आले.
राहुरी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश रा. सं. पाटील (भोसले) व सहदिवाणी न्यायाधीश द. शं. खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाचे कामकाज पार पडले. या वेळी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष डी. आर. तोडमल, उपाध्यक्ष एन. के. बाचकर, सचिव तुषार भुजाडी, सहसचिव अमोल डौले, गटविकास अधिकारी ज्ञानदेव निमसे उपस्थित होते.
लोकन्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ९० दिवाणी खटल्यांपैकी ४६, तर ४५ फौजदार खटल्यांपैकी ३४ खटले निकाली काढण्यात आले. या वेळी पंच म्हणून प्राचार्य अण्णासाहेब भांड, बी. एल. ढोकणे, बी. आर. आघाव, जी. आर. तोडमल, यू. ए. किनकर, सुचेता कुलकर्णी, अर्चना मैड, गोपाळे आदींनी काम पाहिले.

जिल्हा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी बागवान
नेवासे, २३ जून/वार्ताहर

जिल्हा युवका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सोनई येथील शकील बागवान यांची निवड करण्यात आली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमंत ओगले व ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले.यापूर्वी बागवान सोनई शाखाप्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांनी त्यावेळी विविध प्रश्नांवर आंदोलने केली. या निवडीबद्दल त्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे, शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे, हेमंत ओगले, उस्थळचे सरपंच बाळासाहेब भदगले आदींनी अभिनंदन केले आहे.

‘बंटी जहागीरदारवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी’
नेवासे, २३ जून/वार्ताहर
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या कटातील प्रमुख सूत्रधार बंटी जहागीरदार ऊर्फ असलम शबीर जहागीरदार याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करावी, यासाठी नेवासे तालुका भाजप-सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विठ्ठलराव लंघे, जिल्हा सरचिटणीस डॉ. खंडाळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गरुड, राजू काळे, सुनील लष्करे, भाजप, शिवसेना, पतितपावन, रिक्षा संघटना आदींचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.