Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

शेतकरी हवालदिल
दिलीप शेळके
नागपूर, २३ जून

मान्सूनच्या लहरीपणाचा विदर्भाला यावर्षी मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भाची शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्यामुळे कधी सुकाळ तर, कधी दुष्काळ अशी स्थिती विदर्भात असते. यंदा मान्सून लांबल्याने विदर्भातील शेतकरी अस्वस्थ झाला आहे. जूनचा शेवटचा आठवडा सुरू होऊनही पावसाचा पत्ता नासल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांचे या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडले आहे.

९०:१० कोटा शैक्षणिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांच्या हिताचा
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

९०:१० कोटय़ामुळे सरकार राज्य शिक्षण मंडळ (एसएससी) आणि आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करीत आहे, असा युक्तिवाद आयसीएसई, सीबीएसईच्या विद्यार्थी-पालकांकडून तसेच संस्थाचालकांकडून करण्यात येत आहे. मात्र या कोटय़ामुळे शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे ९०:१० कोटा हा भेदभाव करणारा नसून उलट न्याय देणारा असल्याचे, मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

१६ बी.पी.एड. महाविद्यालयांचे निकाल विद्यापीठाने रोखले
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित १६ बी.पी.एड. महाविद्यालयांचे निकाल विद्यापीठाने रोखून ठेवल्यामुळे एक हजार विद्यार्थी त्यामुळे प्रभावित झाले आहेत. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ४० महाविद्यालयांपैकी २४ महाविद्यालयांना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) मान्यतेचे पत्र यापूर्वी मिळाले असून त्यांचे निकाल १२ जूनला घोषित झाले मात्र, १६ महाविद्यालयांचे निकाल जाहीर करण्यास नागपूर विद्यापीठाने नकार दिला आहे.

मेगा ब्लॉकमुळे अनेक गाडय़ा रद्द; एक्सप्रेस धावणार पॅसेंजरसारख्या
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

भिलाई ते दुर्ग यादरम्यान २३ ते २५ जून या कालावधीत नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे या तीन दिवसात अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून काही एक्सप्रेस गाडय़ा पॅसेंजर म्हणून सोडण्यात येणार आहेत. प्रवासी आणि मालगाडय़ांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या बघता रेल्वेने भिलाई ते दुर्ग असा तिसरा मार्ग टाकण्याचा निर्णय घेतला. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेला या मार्गावरून चालणाऱ्या मालगाडय़ांतून कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळते.

युवा धोरणावर बिनधास्त बोलली तरुणाई
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

देशातील तरुण- तरुणींच्या ओठांवर रेंगाळणाऱ्या गाण्यावरून त्या देशाचे भवितव्य ठरवले जाते, असे म्हणतात. भारतात प्रचंड संख्येने असलेल्या युवा शक्तीच्या मनात दडलय तरी काय आणि त्यांच्यासाठी कोणती धोरणे असावीत याविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. खा सुप्रिया सुळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि युवा नेते सलील देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी युवा धोरणाविषयी दिलेल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या होत्या.

विकास आणि संपर्कही
चंद्रशेखर बोबडे

तब्बल एक दशक मंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघाचा विकासच केला नाही तर प्रभावी संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून मतदारसंघही बांधला आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाची कारकीर्द सुरू केलेल्या अनिल देशमुख यांनी प्रथम अपक्ष म्हणून काटोल मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढविली आणि जिंकलीही. राज्यात अपक्षाच्या मदतीने भाजप-सेना युतीची सत्ता आल्याने अनिल देशमुख यांना मंत्रिपदही मिळाले. पहिल्या पाच वर्षांतच त्यांनी मतदारसंघ बांधायला सुरुवात केली. रस्ते, पाणी, वीज आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ बांधला.

गा मेरे मन गा- कनकाचा स्तुत्य प्रयत्न
डॉ. सुलभा पंडित

स्थानिक ‘कनक सूर मंदिर’ प्रस्तुत ‘गा मेरे मन गा’ हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. डॉ. दत्ता हरकरे यांच्या ‘कनक सूर मंदिर’ या संगीत विद्यालयात संगीताचे अध्यापन ते करीत आहेत. आजकाल संगीत शिकण्याकडे एकंदरीतच सर्वाचा कल वाढलेला आहे. लहान वयापासून ते मध्यम वयापर्यंतच्या सर्वानाच संगीत शिकण्याची इच्छा होत आहे. हे एक संगीत क्षेत्राच्या दृष्टीने स्वागतार्ह वातावरण आहे, असे नक्कीच म्हणता येईल. हौशी कलाकारांची संख्या त्यातून वाढते, हे लक्षणीय आहे. अशातूनच एखादा व्यावसायिक कलाकारही निघू शकतो, ही त्यातील जमेची बाजू म्हणता येईल.

भटक्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात सामावून घ्या -खासदार सुळे
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

भटक्या आणि आदिवासी विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणापासून मुख्य प्रवाहात सामावून घ्या, असे आग्रही मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शिक्षण विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित विदर्भस्तरीय प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यशाळेत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. विदर्भात भटक्या जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यासाठी प्राथमिक शाळा आणि तुकडय़ा वाढाव्यात असे सांगून सुळे म्हणाल्या की, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आंतरिक मूल्यमापन व्हावे. हे मूल्यमापन शासनाऐवजी दुसऱ्या संस्थेकडून करून घ्यावे.

फवारणीचे काम अद्यापही अपूर्णच आ. मुळक यांचे मदतीचे आश्वासन
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील फवारणी कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे फवारणीच्या कामांना अद्यापही सुरुवात होऊ शकली नसल्याने जिल्ह्य़ात आगामी दिवस आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचे ठरणार आहे. फवारणी कर्मचाऱ्यांतर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपाला आमदार राजेंद्र मुळक यांनी सोमवारी भेट देऊन प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.

आयुष्य कामगारांप्रती समर्पित -खा. मुत्तेमवार
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

आपले आयुष्य कामगारांप्रती समर्पित असल्याचे सांगून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन खा. विलास मुत्तेमवार यांनी दिले.राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे बैद्यनाथ चौकातील सभागृहात नुकताच खासदार मुत्तेमवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमात आ. दीनानाथ पडोळे, संघाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. एस.डी. ठाकूर, अध्यक्ष गंगाधर पारखेडकर, जिल्हा इंटकचे अध्यक्ष एन. एस. पिल्लई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

युवकांचा गुणवत्ता विकास आराखडा ऑगस्टमध्ये सरकारला सादर करणार
वार्तालाप कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी
युवकांच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा तात्पुरता आराखडा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येत्या ऑगस्ट महिन्यात सरकारला सादर करणार असल्याची माहिती बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना दिली. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, प्राथमिक शिक्षणाशी ज्या घटकांचा संबंध येतो त्यांना एकत्र आणून, गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत आम्ही सरकारला सूचना करतो. यासाठीच विभागनिहाय गटचर्चा सुरू आहेत.

मेयोतील सिकलसेल संशोधन केंद्र बंद
विविध संघटनांतर्फे तीव्र निषेध
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी
मेयोमधील सिकलसेल संशोधन केंद्र राज्य शासनाने एका अध्यादेशाद्वारे तडकाफडकी बंद केल्याने खळबळ उडाली आहे. सिकलसेल नियंत्रणासाठी काम करणाऱ्या विविध संघटनांनी राज्य शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. सिकलसेल प्रतिबंध कृती समिती व जनआंदोलनाच्या दबावामुळे राज्य शासनाने १० जुलै २००१ रोजी मेयो रुग्णालयात सिकलसेल संशोधन केंद्र सुरू केले.

..तर राष्ट्रपती भवनासमोर आंदोलन
पशु व मत्स्य विद्यापीठ कृती समितीचा इशारा
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी
राज्यपालांनी आंदोलनाची दखल न घेतल्यास राष्ट्रपती भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा पशु व मत्स्य विद्यापीठ भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने दिला आहे. विद्यापीठातील शिक्षक व बिगर शिक्षक अशा ४५० पदांच्या पदभरती घोटाळ्याची चौकशी विभागीय आयुक्त आनंद लिमये यांच्या मार्फत सुरू असताना सुद्धा विद्यापीठाने २० जूनपासून नवीन पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे.

‘प्रिन्टर्स गिल्ड’च्या अध्यक्षपदी बिसने, कांडगे सचिवपदी
नागपूर, २३ जून/प्रतिनिधी

विदर्भातील मुद्रांकाची संघटना ‘प्रिन्टर्स गिल्ड’ नागपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा २१ जूनला नंदनवन कॉलनीमधील मुद्रक भवनात पार पडली. सभेमध्ये नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी प्रकाश बिसने यांनी अध्यक्ष पदाची व श्रीकांत कांडगे यांनी सचिवपदाची सुत्रे हाती घेतली. कार्यकारिणीचे उपाध्यक्ष म्हणून जगदीश कोठारी, सहसचिव ओजस्विनी डिखोळकर, कोषाध्यक्ष हरिराम मोरारका यांनी पदाची सुत्रे स्वीकारली. अरविंद मार्डीकर, अजय धाक्रस, राजेश चौबे, अतुल तापस, सचिन घाडगे यांचा कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश बिसने यांचा मधुरादास पनपालिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अरविंद मार्डीकर यांनी नवीन अध्यक्षांचा परिचय दिला. यावेळी प्रकाश बिसने यांनी येत्या वर्षभरात होणाऱ्या कार्याची रुपरेषा दिली. शेवटी राजेश चौबे यांनी सर्वाचे आभार मानले.

नागपूरकर केतकी देशमुखला भारतीय वायुदलात कमिशन
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

केतकी देशमुखला भारतीय वायुदलात कमिशन मिळाल्याबद्दल नागपूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. केतकी ११ जुलैला हैदराबाद येथील एअरफोर्स अकादमीत फ्लाईंग ऑफिसरपदी रुजू होणार आहे. केतकीचे वडील किशोर देशमुख पोलीस खात्यात तर आई पुण्यात न्यायाधीश आहे. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीचे सचिव शरद देशमुख यांची केतकी पुतणी आहे. केतकीच्या यशाबद्दल स्थानिक लोकाधिकार समितीतर्फे सरचिटणीस चंद्रहास राऊत यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी राजा रामदार, विलास मामूलकर, अनिल तळोकर, डॉ. लुईस जॉन, मनोज समर्थ, संजीव सोनारे, नितीन समर्थ, सुशील भुते, दीपक देशमुख आणि विजय देशमुख आदी उपस्थित होते.

पटवर्धन शाळा परिसरात शनिवारी शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा
नागपूर, २३ जून/प्रतिनिधी

२७ जूनला सकाळी ११ वाजता पटवर्धन शाळेच्या परिसरात वेतनपथक कार्यालयाच्या बाजूच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. खासगी व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे पंचबुद्धे, फडणवीसांचे आभार
नागपूर, २३ जून/प्रतिनिधी
मागासवर्गीय आरक्षणासाठी आवश्यक असलेली नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर ठेवण्याचे आश्वासन, मागासवर्गीय विभागाचे राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांनी दिल्याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अतिरिक्त सरचिटणीस प्रा. चंद्रसेन गोंडाणे यांनी त्यांचे आभार मानले आहे. याच मुद्यावर आमदार देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार फडणवीस यांचेसुद्धा आभार मानले आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर अनेक कर्मचाऱ्यांचे उत्पन्न मर्यादेच्या वर गेल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागणार होते. याबाबत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी हा मुद्दा वारंवार सरकारसमोर मांडला. त्यामुळे सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अतिरिक्त सरचिटणीस प्रा. चंद्रसेन गोंडाणे, सत्यदेव रामटेके, अशोक गाणार आदींनी सरकार तसेच, मागासवर्गीय विभागाचे राज्यमंत्री नाना पंचबुद्धे व आमदार देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

‘फादर्स डे’निमित्त सेवानिवृत्तांचा सन्मान
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

‘फादर्स डे’निमित्त डॉ. राजेंद्रप्रसाद बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात सेवानिवृत्त आणि समाजसेवेला समर्पित नागरिकांना डॉ. राजेंद्रप्रसाद सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते.समाजात जगण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत पण, योग्य मार्गाची निवड करणे कठीण काम आहे, असे मत डॉ. मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केले. त्यागाच्या भावनेतून समाजसेवेचे कार्य करावे. प्रामाणिक काम करणाऱ्यांचाच येथे सत्कार होतो, असे मिश्रा म्हणाले. समारंभात सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षणाधिकारी प्रदीप काटेकर, धनवटे नगर विद्यालयाचे शिक्षक अरूण बोधे, नागपूर विद्यापीठाचे इलेक्ट्रीशियन मनोहर घाटोळे, सीपीडब्ल्यूडीचे बबन भुयारकर, स्टेट बँक ऑफ पटियालाचे श्रीराम मेघरे, आदर्श प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक कमल मासुरकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष प्रदीप खानोरकर यांनी केले. प्रकाश मासुरकर यांनी आभार मानले.

पालिकेत सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आठवडाभरात
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

महापालिका कर्मचारी व शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील निर्णय आठवडाभरात घेतला जाईल, असे आश्वासन महापौर मायाताई इवनाते यांनी राष्ट्रीय कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले. एम्प्लॉईज असोसिएशन व मनपा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सहावा वेतन आयोग लागू करावा यासाठी सोमवारी मनपा कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने महापौर मायाताई इवनाते यांना मागण्याचे निवेदन देऊन चर्चा केली असता आठवडाभरात यासंदर्भातील प्रस्ताव मागवण्यात येईल, असे आश्वासन इवनाते यांनी दिले. यावेळी मनपातील सत्तापक्षनेते अनिल सोले, नाना श्यामकुळे, कृष्णा खोपडे, शिवसेनेचे गटनेते शेखर सावरबांधे, लोकमंचाचे दीपक पटेल, प्रवीण दटके, प्रकाश तोतवाणी, निता ठाकरे, विष्णू बुटे, मनपाचे अप्पर आयुक्त प्रकाश बोकड, अतिरिक्त उपायुक्त गु.ना. शेळके, वित्त अधिकारी गुप्ता, संघटनेचे सुदाम महाजन, सुरेंद्र टिंगणे, राजेंद्र ठाकरे, राजेश गवरे, रमेश पानतावणे, रंजन नलोडे, मधू पराड, अलका झकारिया, देवराव मांडवकर, दिवाकर मोहाडीकर, विठ्ठल क्षीरसागर, सुशील यादव, अजय देवरणकर आदी उपस्थित होते.

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेची दोन सहाय्य केंद्रे
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ऑनलाईन सुविधेच्या धर्तीवर ११ वीच्या प्रवेशासाठी शिवसेनेतर्फे दक्षिण नागपुरात विद्यार्थ्यांसाठी दोन सहाय्य केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीचा निकाल गुरुवारी, २५ जूनला जाहीर होणार आहे. यानंतर ११ वीच्या प्रवेशासाठी मंडळाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या सेवेची विशेष माहिती नसल्याने लाभ होणार नाही. त्यामुळे अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी सेनेतर्फे दक्षिण नागपुरात २ सहाय्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उमरेड रोडवरील रेशीमबाग चौकात शिवसेनेच्या कार्यालयात आणि मानेवाडा चौकात भेदे कॉम्प्लेक्समध्ये ही केंद्रे उघडण्यात आली आहेत. गरजू व गरीब विद्यार्थ्यांना याठिकाणी ११ वीच्या प्रवेशासाठी विनामुल्य ऑनलाईन प्रवेशअर्ज भरून देण्यात येतील. ३० जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून ही दोन्ही केंद्रे सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत सुरू राहणार आहेत. गरजू विद्यार्थी व पालकांनी या केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक शेखर सावरबांधे यांनी केले आहे.

३०० ज्येष्ठ नागरिकांना सवलत कार्डचे वाटप
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्यावतीने मुख्य कार्यालयात ज्येष्ठ नागरिक संमेलन व ज्येष्ठ नागरिक सवलत कार्ड वाटप कार्यक्रम परिषदेचे संस्थापक अध्यक्ष खासदार दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी मेघे यांच्या हस्ते सुमारे ३०० नागरिकांना ज्येष्ठ नागरिक सवलत कार्डचे वाटप करण्यात आले. विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या माध्यमातून विदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांची फळी तयार झाली असून त्यांच्या माध्यमातूनच विदर्भात चांगले काम केले जात आहे, असे प्रतिपादन खासदार मेघे यांनी यावेळी केले. आतापर्यंत परिषदेच्या माध्यमातून सुमारे आठ हजार नागरिकांना सवलत कार्डचे वाटप करण्यात आले असून, सरकारने जाहीर केलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवणे, गरीब विद्यार्थ्यांना नि:शुल्क संगणक प्रशिक्षण आदी कामे परिषदेच्या माध्यमातून केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी जयंत लुटे, महमूद अंसारी, रत्नाकर राऊत, अशोक काटले, प्रतापसिंह चव्हाण, अ‍ॅड. उषा पांडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रविराज दासलवार यांनी केले. नामदेव चरपे यांनी आभार मानले.

नवीन मीटर देण्याची मागणी
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी
विदर्भ प्रदेश विकास परिषदेने वीज चोरीचे खापर वीज मंडळावरच फोडले असून वस्तीतील नागरिकांचे जुने बिल माफ करून कमी खर्चात नव्याने मीटर देण्याची मागणी केली आहे. झोपडपट्टीतील नागरिकांना ५० हजार, ३० हजार रुपयांचे विज मंडळ बिल पाठवत असते. हे बील भरणे झोपडपट्टीतील नागरिकांना शक्य होत नाही. त्यामुळे वीज मंडळ मीटर काढून घेऊन जाते. त्यामुळे वस्तीतील लोक आकडे टाकून वीज चोरी करतात, असेही त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

नंदनवन परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी
नंदनवन झोपडपट्टी परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध दारुची दुकाने व जुगाराचे अड्डे असल्याने याभागातील नागरिकांना गुंडगिरीला तोंड द्यावे लागते. त्याचा सर्वात जास्त परिणाम लहान मुले आणि महिलांच्या दैनंदिन कामावर होतो. या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत यापूर्वी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, अद्याप गुंडगिरी करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे बहुजन झोपडपट्टी विकास महासंघाचे संघटक राजकुमार वंजारी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शिवाय पत्रकात नगरसेवक रूपेश मेश्राम यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी बहुजन झोपडपट्टी विकास महासंघाने केली आहे.

यू.जी.सी. निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळली
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

एम.फिल. व पी.एच.डी. धारकांना नेट-सेटच्या परीक्षेतून पूर्वी दिलेली सूट अजूनही कायम ठेवण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यू.जी.सी.) निर्णयाविरुद्ध करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. ज्या उमेदवारांनी एम.फिल. किंवा पी.एच.डी. पदवी मिळवलेली आहे, त्यांना नेट-सेटच्या परीक्षेतून सूट देण्याचा आदेश यू.जी.सी.ने १४ जून २००६ रोजी काढला होता. एम.फिल. केलेल्यांना ही सवलत देण्याविरुद्ध पी.एच.डी. धारकांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने यूजीसीला या संदर्भात तीन महिन्यात निर्णय घेण्यास सांगितले होते. यानंतर, जोपर्यंत नवे आदेश येत नाहीत, तोपर्यंत जुनाच निर्णय कायम राहील, असे परिपत्रक यू.जी.सी.ने ११ फेब्रुवारी २००९ रोजी काढले होते. त्याला आव्हान देणारी याचिका भूपेश मुडे यांनी केली होती. आज ही याचिका सुनावणीला आली, तेव्हा तुमचा या प्रश्नाशी काय संबंध आहे, तुम्हाला यू.जी.सी.च्या निर्णयामुळे काही त्रास झाला आहे काय, असा प्रश्न न्या. सिन्हा व न्या. भंगाळे यांच्या खंडपीठाने विचारला आणि ही याचिका फेटाळून लावली.

अलमास नाझीमचा समीर मेघेंकडून सत्कार
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत तसेच एमएचटी- सीईटी मध्ये द्वितीय क्रमांक घेऊन नागपूर शहराचे भूषण ठरलेल्या अलमास नाझीम हिचे तिरुपती अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष समीर मेघे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच ३,००० रुपये बक्षीस दिले. अलमासने केवळ तिच्या कुटुंबीयांचेच नव्हे तर, वैदर्भियांचे नाव उंचावले. नागपूरकरांसाठी हे भूषणावह असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शिवाय तिच्या आईवडिलांचेही याप्रसंगी अभिनंदन केले. याप्रसंगी बँकेचे रमेश बोरकुटे, शकील सत्तार व अलमासचे आईवडील उपस्थित होते.

पूनम नागदिवेचे सुयश
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

यशोदा कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूनम योगेश्वर नागदिवे हिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. अंतिम वर्षांच्या परीक्षेत विद्यापीठातून गुणवत्ता यादीत आठवे स्थान पटकावले. यानिमित्त तिचा यशोदा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. अजहर हयात आणि महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.