Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

जीवनदर्शन
देव आणि असुर
मानवी इंद्रियांना ऋषींनी देव आणि असुर यांची उपमा दिली आहे. ती अर्थपूर्ण वाटते. मूळ आत्मरूप म्हणजे देव. त्यावरील दृश्यांचे झाकण म्हणजे असुर. अध्यात्मसाधना करताना हे जाणवते. इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या जड विश्वाची कोंडी फोडणे अवघड होते. इंद्रियांना वरवरचे तेच खरे वाटते. निदान साधकाला याची थोडीफार जाणीव असते. सामान्याला दृश्य विश्व खरे वाटते. तो जडवादी होतो. दिसणाऱ्या जगाला खरे मानतो. आपल्याला दिसणाऱ्या या अफाट

 

विश्वाच्या गुंतागुंतीत जडद्रव्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे नाही. माणूस म्हणजे देह व मन यांची जोडी होय. मन हे एक जड द्रव्य आहे. मनाच्या पलीकडे आत्मा नावाची वस्तू नाही. मृत्यूनंतर माणसाचे अस्तित्व संपते. अमरत्व हा काल्पनिक भ्रम आहे. असाही जडवाद सर्वत्र आहे. तथापि भारतीय ऋषी यात अडकले नाहीत. त्यांनी खोलवर आत्मरूपाचा दार्शनिक विचार मांडला. म्हणून ते देव ठरले नि दृश्याला मानणारे दानव ठरले. हे द्वंद्व कायम आहे. ते अनिर्णित आहे. कारण ते ते मानणारे ठाम आहेत. आपल्या मतांना परीक्षून घेण्याची भावना फक्त देवांमध्ये आहे. म्हणून देव सगळय़ांना बरोबर घेऊन जातात. याचा विचार उपनिषदकारांनी फार बारकाईने केला आहे. विचारात प्रगत होणे म्हणजे आधुनिक होणे असे ऋषी मानीत. माणूस भौतिक साधनांमध्ये आधुनिक झाला खरा, पण भोगी झाला. श्रमाच्या पूजेऐवजी तो शोषणांना गोंडस तत्त्वांची नवी नावे (भौतिक-सांकल्पनिक) देऊन अधिक भोगी झाला. इंद्रियांवरला संयम सुटला. अभ्यासाला तप न म्हणता सामूहिक कॉप्या तपी झाल्या. शिकवण्यांचा स्वाइन फ्ल्यू पसरला. तो निश्चयापासून चळला. असुरी प्रवृत्ती थैमान घालू लागल्या. आपल्यातल्या हिंस्र वासनांचे खुलेआम प्रदर्शन सुरू झाले. सत्य, शिव, सुंदर ही जगण्याची त्रिवेणी बाजूला झाली नि या त्रिवेणीच्या नावावर बिग बझार मांडला. यातून पुरुषार्थ कसा जन्मणार? यासाठी ऋषींनी देवत्वाची मंत्रपुष्पांजली आपल्याला दिली.
यशवंत पाठक

कुतूहल
किंतारा किंतारा (क्वेसार) म्हणजे काय?
क्वेसार हा शब्द इंग्रजीतील ‘क्वासी-स्टेलार रेडिओ सोर्स’ या संज्ञेचे लघुरूप आहे. इ.स. १९६२ साली कन्या तारकासमूहातील ३सी२७३ हा रेडिओस्रोत चंद्रबिंबामागे झाकला गेला. या पिधानाच्या निरीक्षणांवरून ३सी२७३ या रेडिओस्रोताचे अचूक स्थान कळू शकले आणि या रेडिओस्रोताचा संबंध एका अंधुक ताऱ्याशी असल्याचे लक्षात आले. यानंतर काही काळातच अशा आणखी काही तारकासदृश रेडिओस्रोतांचा -क्वेसारचा- शोध लागला. या तारकासदृश वस्तूंपैकी अनेक वस्तू या क्ष-किरणांचेही स्रोत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे क्वेसार या वस्तू आता ‘क्वासी-स्टेलार रेडिओ सोर्स’ यापेक्षा ‘क्वासी-स्टेलार ऑब्जेक्ट’ या नावानेच जास्त ओळखल्या जातात. वर्णपटांवरून क्वेसार हे दूरच्या दीर्घिकांप्रमाणेच आपल्यापासून कित्येक अब्ज प्रकाशर्वष अंतरावर असल्याचं दिसून आलं आहे. ३सी२७३ हा त्यातल्या त्यात जवळचा क्वेसार असून, त्याचे आपल्यापासूनचे अंतर हे सुमारे दोन अब्ज प्रकाशर्वष इतकं आहे. आजपर्यंत शोधल्या गेलेल्या क्वेसारची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक भरते.
अतिशय दूर असल्याने अंधुक भासणाऱ्या या तारकासदृश वस्तूंची प्रत्यक्ष तेजस्विता ही आपल्या आकाशगंगेसारख्या दीर्घिकांच्या तेजस्वितेच्या १०० पटींहून जास्त आहे. अशा प्रचंड प्रमाणात ऊर्जेचं उत्सर्जन करणारे हे क्वेसार सूर्याच्या तुलनेत कोटय़वधी पटींनी वजनदार असावेत. काही क्वेसारकडून उत्सर्जित केल्या जाणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेत कधीकधी महिन्याभरात (काही वेळा तर आठवडय़ाभराच्या काळातच) बदल घडून येतात. इतक्या झटपट होणारे हे बदल, क्वेसार हे आकाराने आपल्या सौरमालेपेक्षाही लहान असल्याचे दर्शवतात. क्वेसार या वस्तू नेमक्या काय आहेत हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नसल्या तरी कदाचित क्वेसार ही दीर्घिकांच्या उत्क्रांतिकाळातली सुरुवातीची स्थिती असून, त्यांच्या केंद्रस्थानी प्रचंड वजनाची कृष्णविवरे असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते.
अरविंद परांजपे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिनविशेष
वि. का. राजवाडे
अवलिया संशोधक म्हणून महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या इतिहासाचार्य राजवाडे यांचा जन्म २४ जून १८६१ रोजी झाला. कॉलेजात शिकत असताना भांडारकरांसारखा एखाददुसरा प्राध्यापक सोडल्यास इतरांच्या लेक्चरला ते बसत नसत. तेव्हा ग्रंथ हेच गुरू मानून अफाट वाचन त्यांनी केले. पत्नी आणि मुलाच्या अकाली निधनानंतर सारे आयुष्य इतिहास संशोधनासाठी घालवण्याचा त्यांनी निश्चय केला. बी.ए.ची पदवी संपादन करण्यापूर्वीच त्यांनी पानिपत प्रकरणावर ‘मराठय़ांच्या इतिहासाची साधने’ हा पहिला खंड प्रसिद्ध केला. यानंतर त्यांनी असे २२ खंड मराठय़ांच्या इतिहासाच्या साधनांवर प्रकाशित केले. याशिवाय त्यांनी कित्येक ग्रंथ लिहिलेत. आपण ब्रिटिशांचे गुलाम आहोत याचा त्यांना विलक्षण संताप वाटे. इंग्रजांशी टक्कर देण्यासाठी आपण विद्याशास्त्र हस्तगत केले पाहिजे. त्यासाठी मंडळे स्थापली पाहिजेत, असे त्यांचे मत होते. आरोग्य मंडळ, समाजशास्त्र मंडळ त्यांनी स्थापण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. अपवाद भारत इतिहास संशोधन मंडळाचा! राजवाडय़ांचे कोणतेही मंडळ बाळसे धरू शकले नाही. मात्र ७ जुलै १९१० रोजी पुण्यात त्यांनी स्थापन केलेले भारत इतिहास संशोधक मंडळ आज एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र बनले आहे. इतिहास संशोधनासाठी त्यांनी फकिरी पत्करली. ऐतिहासिक साधनांच्या शोधासाठी शेकडो मैल पायी, लोकांच्या घरी, दारोदार फिरत, प्रसंगी डोक्यावर ही सर्व कागदपत्रे वाहून कुठेतरी एकांतात बसून पुढच्या उद्योगाला ते लागत असत. प्रसिद्धी त्यांना आवडत नसे. सणसमारंभात ते मिसळत नसत, तसेच स्वभावही हट्टी आणि संशयी असल्याने लोकसंग्रह फारसा असा नव्हता. गाढा इतिहास संशोधक असा नावलौकिक मिळवणारे राजवाडे ३१ डिसेंबर १९२६ रोजी अचानक निधन पावले.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
प्रेम हेच मंदिर
दोघे सख्खे भाऊ. मोठा भाऊ ब्रह्मचारी. धाकटय़ाचा सुखी संसार. बायको, तीन मुले. दोघा भावांना वडिलोपार्जित जमिनीचा तुकडा मिळाला होता. एकमेकांवरच्या प्रेमामुळे त्यांनी जमिनीची वाटणी केली नव्हती. दोघे मशागत करायचे, राबायचे. पीक आल्यावर पेंढय़ा, जुडगे मोजून समान वाटे करायचे. आपापल्या झोपडीशेजारी रचून ठेवायचे. मोठा भाऊ आपल्या वाटय़ाच्या पिकाच्या ढिगाशेजारी पहुडला होता. झोप येत नव्हती. धाकटय़ाला स्वत:बरोबर बायकोपोरांचे पोट भरावे लागते. माझे एकटय़ाचे पोट भरायला कितीसे लागते. दोघांचा वाटा बरोबर हे चूक आहे. मला पुरून धान्य उरणार. त्यापेक्षा ते धाकटय़ा भावाला द्यावे. मध्यरात्री मोठा उठला. आपल्या पिकातला काही भाग त्याने धाकटय़ाच्या वाटय़ात नेऊन टाकला. परत आल्यावर त्याला समाधानाने झोप लागली. धाकटाही झोपेविना तळमळत होता. डोक्यात विचारांचे वादळ होते. मोठा बिचारा जगात अगदी एकटा आहे. म्हातारपणी माझी काळजी वाहायला, दोन घास घालायला माझी मुले आहेत. हातपाय चालेनासे झाले तर ती या म्हाताऱ्याची काठी होतील. मोठय़ाला कोण आहे म्हातारपणी. त्याला म्हातारपणासाठी साठवण करायला हवी. ती तरतूद मीच करायला हवी, नाहीतर फार अप्पलपोटेपणा होईल. निष्ठुरपणा होईल. छे! असे होता कामा नये. धाकटा उठला. पिकाच्या वाटय़ातला काही भाग त्याने मोठय़ाच्या भागात नेऊन मिसळला. परत आल्यावर धाकटय़ालाही शांत झोप लागली. पहाटे उठल्यावर दोघाही भावांच्या लक्षात आले की, वाटा कमी झालेला नाही. पूर्वी होता तेवढाच आहे. दोघांनाही आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार घडला. तिसऱ्या रात्री एकमेकांकडे धान्य नेताना दोघांची अचानक भेट झाली. एकमेकांच्या बंधुप्रेमाचा आणि परोपकाराचा चकार उल्लेख दोघांपैकी कुणीही केला नाही. पण दोघांच्या हातात असलेले धान्याचे भारे पाहून काय समजायचे ते दोघे समजले. दोघांचे डोळे पाणावले. हृदय दाटून आले. एक शब्दही न बोलता दोघे आपापल्या झोपडीकडे परतले. दोघा भावांचे हे विलक्षण प्रेम, काळजी, करुणा, एकमेकांच्या अडचणी समजून घेणे आणि केल्या उपकारांचा थोडाही उल्लेख न करणे या गोष्टी लोकांनी पूजनीय, आदर्श मानल्या. दोन भावांचे प्रेम विश्वबंधुत्वाचा आदर्श ठरले. इस्रायलच्या सालोमन राजाने दोघा भावांची अबोल भेट झाली तिथे मंदिर बांधले. फक्त स्वत:चा विचार न करता जो दुसऱ्याचा विचार आधी करतो तो माणुसकीचा आदर्श ठरतो. केलेल्या उपकारांचा अक्षरानेही जो उल्लेख करीत नाही तो श्रेष्ठ माणूस. माणसांनी एकमेकांवर भावाप्रमाणे प्रेम केले तर जगातले कितीतरी प्रश्न सुटतील. आजचा संकल्प : मी नेहमी इतरांचा विचार करून सत्कृत्य करेन व त्याचा उल्लेखही करणार नाही.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com