Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

रानसईची पाण्याची पातळी खालावली

 

उरण/वार्ताहर - धरण क्षेत्रात पावसाचा थेंबही पडला नसल्याने रानसई धरणातील पाण्याची पातळी कमालीची घसरली आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर कधी नव्हे अशा डेडस्टॉकमधून पाणी घेण्याची वेळ येऊन ठेपण्याची भीती एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
उरण परिसरातील ग्रामीण भागातील गावांना व शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. १५ जूनपर्यंत पावसाचे हमखास आगमन होत असल्याने एमआयडीसीकडून सर्व गावे, शहराला पाणीपुरवठा कमी-अधिक प्रमाणात केला जातो. यावर्षी मात्र पावसाचे आगमन लांबल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू लागली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. अनियमित व अपुरा पाणीपुरवठा यामुळे अनेक ग्रामपंचायतींवर पाणी टंचाईचे संकट ओढवले असून, दोन-तीन दिवसाआड पाणी सोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
रानसई धरणामध्ये ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता किरण भाटे यांनी दिली. आठ दिवसांत रानसई धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही तर डेडस्टॉकमधून पाणी घेण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. डेडस्टॉकचे पाणी थेट समवेलमध्ये घ्यावे लागते. असे पाणी पुन्हा फिल्टरेशन प्लँटमध्ये सोडावे लागते. यामध्ये वेळ व ऊर्जाही वाया जाते. इतक्या वर्षांत डेडस्टॉकमधील पाणी वापरण्याची वेळ एमआयडीसीवर आली नव्हती. तरीही एमआयडीसीने तशी तयारी ठेवली आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस पडेल असा विश्वास व्यक्त करतानाच, तूर्तास ३० जूनपर्यंत रानसई धरणातील पाण्यामुळे ‘नो टेन्शन’ अशी स्थिती आहे, असे भाटे म्हणाले.

पावसाने केला भूमिपूजनाचा विचका
पनवेल/प्रतिनिधी - सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने कळंबोली येथे सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पोलीस प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा विचका झाला.
कळंबोलीतील शिवाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या नवी मुंबई पोलीस प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन सोमवारी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील, खासदार गजानन बाबर, संजीव नाईक, पर्यावरणमंत्री गणेश नाईक, आमदार विवेक पाटील आदी नेते आमंत्रित होते. पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य मंडप टाकण्यात आला होता; परंतु मुख्यमंत्र्यांच्या आधीच पोहचलेल्या जोरदार पावसाने आयोजकांच्या तोंडचे पाणी पळवले. पावसाच्या आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे व्यासपीठावरील छत उडून गेले, तर प्रेक्षागृहात सर्वत्र चिखल झाला. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी प्रेक्षकांना बाहेर काढले. त्यानंतर काही वेळाने आमंत्रित नेते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औपचारिक भूमिपूजन झाल्याचे समजते.