Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

नाशिकच्या अ‍ॅथलिट्सचा ‘मान्सून धमाका’
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

प्रतिनिधी / नाशिक

मीनी सुवर्णा, कविता राऊत, दीपिका वारके, मोनिका आथरे आदी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स देशाला देणाऱ्या येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात ‘साई’ केंद्रातील खेळाडूंनी पुणे येथे आयोजित राज्य मैदानी स्पर्धेवर पुन्हा एकदा आपल्या सुवर्णमयी कामगिरीचा ठसा उमटविला आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या कामगिरीची दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी या खेळाडूंना गौरविले. राज्य मैदानी स्पर्धेवर पुणे, मुंबई व नागपूर येथील खेळाडूंची कायमची छाप. परंतु यंदा पुणे येथे झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत नाशिकने पुणे व मुंबईला चांगलाच हादरा दिला. तर नागपूरचे वर्चस्व मोडीत काढले.

पोलिस आयुक्तांच्या भेटीचा ‘फॅण्टास्टिक डे’!
नाशिकमध्ये मध्यंतरी बोकाळलेल्या अर्निबध गुंडगिरीविषयी सई कावळे या अकरावीतील प्रवेशेच्छु विद्यार्थिनीने ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’च्या माध्यमातून आपले मन मोकळे केले होते. ते वाचून दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांनी तिच्या भावनांची दखल घेतली व सईला थेट भेटीसाठी आपल्या कार्यालयात पाचारण केले. हा अनुभव तिच्यासाठी कसा होता, आयुक्तांनी तिला कशाप्रकारे आश्वस्त केले ते तिच्याच शब्दांत..

वेध औद्योगिक वसाहतीचा
जाचक अटी व गुंतागुंतीच्या नियमांचा चक्रव्यूह

प्रतिनिधी / नाशिक

जिल्ह्य़ाची एकूणच भौगोलिक परिस्थिती आणि हवामान पाहता औद्योगिक क्षेत्राचा विकास प्रारंभीच्या काळात झपाट्याने होत गेला. त्यावेळी उद्योगांना चालना मिळावी म्हणून नियम शिथिल होते. अधिकाऱ्यांनी निष्ठेने उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले. मागेल त्याला जमीन देण्याचे तेव्हा धोरण होते.

बँकांनी उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करावे - रमेशचंद्र बंग
नाशिक / वार्ताहर

बँकेच्या माध्यमातून गरजूंना व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे ध्येय आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे भरीव कार्य सहकार क्षेत्रातील बँकांनी करावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेशचंद्र बंग यांनी केले. सिन्नर येथे महेश को-ऑपरेटिव्ह बँक चतुर्थ शाखेचे उद्घाटन बंग यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आ. माणिकराव कोकाटे, आ. सुरेश जेठालिया, प्रकाश वाजे, सुनील बर्वे, अशोक बंग, द्वारकानाथ चांडक, सुदाम सांगळे, सिन्नरच्या नगराध्यक्षा सिंधूताई गोजरे उपस्थित होते. मार्च २०१० पर्यंत गोरगरीब व सर्वसामान्य माणसापर्यंत धान्य पुरविण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे असेही बंग यांनी सांगितले. डॉ. बच्छाव यांनी सिन्नर परिसरातील महिला बचत गटांना चार टक्के दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, तळागाळातील उपेक्षित घटकांना व शेतकरी बांधवांना व्यवसायासाठी कर्जे उपलब्ध देण्याची सूचना केली.

एचपीटी महाविद्यालयात एमसीजे प्रवेश प्रक्रिया सुरू
नाशिक / प्रतिनिधी

येथील एचपीटी आर्टस् अ‍ॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले स्कूल ऑफ कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम विभागात एम.ए.एम.सी.जे (जनसंज्ञापन व पत्रकारिता) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ४ जुलै रोजी प्रवेश परीक्षा व त्यानंतर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. पदवीप्राप्त व पदवी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर अर्ज करावेत आणि सोबत ब्रँच सेकेट्ररी, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा २५० रूपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडावा, असे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी व विभागप्रमुख डॉ. वृन्दा भार्गवे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-२३११४५२ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.