Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

ग्रामीण भागातील गुन्हेगारी मोडून काढण्याची मागणी
गेल्या काही महिन्यात शहरी भागातील गुंडगिरीचे लोण ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे. विविध पक्षांच्या झेंडय़ांचा आधार घेत अवैध व्यवसायिकांची पाळेमुळे घट्ट होत चालली आहेत.
वार्ताहर / वणी
शहरी भागात फोफावलेल्या गुंडगिरीप्रमाणेच ग्रामीण भागातही गुन्हेगारी घटनांत वाढ झाली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावनांचे जनक्षोभात रूपांतर होण्यापूर्वी पोलीस यंत्रणेने प्रथम अवैध व्यवसायांसोबत प्रस्थापित केलेले संबंध तोडून टाकण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होऊ लागले आहे. या युतीमुळेच गुन्हेगारांविरोधातील कारवाईकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार असून गुन्हेगारी मोडून काढण्याची मागणी होत आहे.

अमळनेर तालुक्यातील रूग्णालयांच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर
अमळनेर / वार्ताहर

तालुक्यातील ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण व पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी शासनाकडून दोन कोटी ४१ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यामुळे तालुक्यातील वैद्यकीय स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

सटाणा महाविद्यालय दमदार वाटचालीच्या प्रतीक्षेत
सटाणा / वार्ताहर

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सटाणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची स्थिती ४२ वर्षांनंतरही ‘थोडा हैं, थोडे की जरूरत हैं’ अशी आहे. महाविद्यालयाची स्पर्धात्मक, गुणात्मक प्रगती झाली असली तरी या महाविद्यालयापेक्षा उशिराने सुरू झालेल्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाने जी दमदार वाटचाल केली आहे, तशी सटाणा महाविद्यालयाची झाली नसल्याचे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.

जळगाव पालिका सुवर्ण जयंती योजना : प्रकरणांच्या चौकशीची मागणी
वार्ताहर / जळगाव

सुवर्ण जयंती रोजगार योजना या केंद्र सरकारच्या तसेच महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या येथील सर्व प्रकरणांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. शहरी भागातील दारिद्रय़ रेषेखालील लोकांसाठी केंद्र शासनामार्फत सुवर्ण जयंती योजना राबविण्यात येते. महापालिकेचा यासाठी स्वतंत्र विभाग असून बचत गटांच्या माध्यमातून गरजुंना याव्दारे सहाय्य करण्यात येते. जमा-खर्चाची नोंद करण्यासाठी असलेल्या रजिष्टरमध्ये मोठे फेरफार करण्यात आल्याची संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती असून यात सुमारे पाच लाख रूपयांचा गैरप्रकार झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. महापालिकेकडून सुवर्ण जयंती योजनेचे काम शत प्रतिशत करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक बोगस व बनावट प्रकरण तयार करून पैसा हडपण्याचा प्रकार एक वरिष्ठ अधिकारी राजरोसपणे करीत असल्याची उघड चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. काही भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी गरजूंपर्यंत योजना पोहचू देत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेतील या प्रकरणांची चौकशी करावी व जनसामान्यांपर्यंत योजना न पोहचू देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

‘अंनिस’तर्फे शाळांमध्ये ‘फिरते नभांगण’ उपक्रम
वार्ताहर / धुळे

आंतरराष्ट्रीय खगोल वर्षांनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शालेय व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ‘फिरते नभांगण’ उपक्रम शाळांमधून राबविण्यात येणार असल्याची माहिती समितीचे खगोलवर्ष कार्यक्रम समन्वयक संजय बनसोडे यांनी दिली. या उपक्रमाची सुरूवात एक जुलैपासून येथून होणार असून प्रकल्प प्रमुख म्हणून हेमंत धानोरकर काम पाहणार आहेत. जुलै महिन्यात धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील निवडक शाळांमधून या उपक्रमातंर्गत कार्यक्रम होतील. पुणे विद्यापीठातील ‘आयुका’मार्फत दिलेल्या एका भव्य अर्धगोलाकार घुमटात आकाशगंगा, ग्रह, ताऱ्यांचे दर्शन घडविले जाणार आहे. तसेच खगोलवरील प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा आणि स्वयंअध्ययन परीक्षाही घेतली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय खगोल वर्षांनिमित्ताने याशिवाय समितीतर्फे आकाश निरीक्षण यात्रा, दुर्बिण निर्मिती प्रशिक्षण, खगोलशास्त्र व अंधश्रद्धा विषयक प्रशिक्षण, वक्तृत्व स्पर्धा व लिखाण साहित्य निर्मिती यासारखे कार्यक्रम होणार आहेत. फलज्योतिष शास्त्र का नाही, याची ज्योतिषांना आव्हान देणारी शास्त्रीय चाचणीही जाहीर करण्यात येणार असल्याचे समितीने म्हटले आहे.

रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात मेळावा
धुळे / वार्ताहर

शासकीय सेवेच्या संधी मर्यादित असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी वर्षां शेडगे यांनी येथे केले. धुळे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात सिल्वासा, दमण मध्ये असणाऱ्या जय कार्प लिमिटेड कंपनीत टेक्सटाईल व प्लास्टिक विभागात रोजगार मिळण्यासाठी आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी रोजगार व स्वयंरोजगार सहाय्यक संचालक एम. एन. धाकड, कंपनीचे अध्यक्ष बी. के. अमेटा, उपाध्यक्ष एन. एन. येलगावकर, सहाय्यक महाव्यवस्थापक हिमांशू व्हायडा उपस्थित होते. प्रास्तविकात धाकड यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. कंपनीचे अध्यक्ष अमेटा यांनी बेरोजगार उमेदवारांना टेक्सटाईल व प्लास्टिक कंपनीच्या कामाची माहिती दिली. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. येलगावकर यांनी बेरोजगारीला सामोरे जाताना उमेदवारांनी मिळेल ते काम करावे, गाव सोडून जाण्याची तयारी ठेवावी, त्यामुळे त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे सांगितले. रोजगार मेळाव्याच्या जाहिरातीनुसार उपस्थित ५०७ पैकी १०१ उमेदवारांच्या मुलाखती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतल्या. मुलाखतीत पात्र ६२ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन कनिष्ठ सेवा योजना अधिकारी मनोहर नागरे यांनी केले. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शक एन. बी. सोनार यांनी आभार मानले.

साऊथ देवळाली एअरफोर्सकामगार कल्याण समितीवर रमेश बोथे बिनविरोध
भगूर / वार्ताहर

साऊथ देवळाली एअरफोर्स कामगार कल्याण समितीच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुरेश गायकवाड, दशरथ कनोजिया, त्र्यंबक मेढे, पी. डी. जाधव हे विजयी झाले. बोथे हे एकमेव उमेदवार अविरोध निवडून आले. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाची निवडणूक चांगलीच गाजली. दहा जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात होते. कूक विभागातून निवृत्ती भांगरेंनी माघार घेतल्याने रमेश बोथे हे अविरोध निवडून आले. लष्कर विभागातून त्र्यंबक बोथे, राकेश पोपटकर, दशरथ कनोजिया विजयी झाले. तर ज्ञानेश्वर पावसे या विद्यमान सदस्यास एकमताने पराभव पत्करावा लागला. कनोजिया हे या विभागातून दोनदा निवडून आले आहेत. सफाई कामगार विभागातून सुशिल कुमार विजयी झाले असून त्यांनी विद्यमान सदस्य मधु झुंज यांना पराभूत केले. सुतारकाम विभागातून पोपरे यांनी संजय राजगुरू यांचा पराभव केला. भांडार विभागातून रामु राव, विद्यमान सदस्य पी. डी. जाधव हे विजयी झाले. विद्यमान सदस्य हिरामण भोळे पराभूत झाले. परिवहन विभागातून सुरेश गायकवाड सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. अग्निशमन व व्यवस्थापन विभागातून त्र्यंबक मेढे हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. आर. पोपटकर व गांगुर्डे यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

माणिकपूंज धरणासाठी सात कोटी
मनमाड / वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील माणिकपूंज धरणाच्या कामासाठी सात कोटी २२ लाख रुपये देण्यात आले असून महिन्याभरात सांडव्याच्या कामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आ. संजय पवार यांनी दिली. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. माणिकपूंज मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पवार यांनी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. नांदगाव हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणून प्रसिध्द आहे. शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तालुक्यास सतत भेडसावत असतो. उध्र्व गोदावरी पाटबंधारे प्रकल्प, नाशिक विभाग अंतर्गत माणिकपूंज पाटबंधारे प्रकल्प, सांडव्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा निम्मेच २४३ एम. सी. एफ. टी. पाणीसाठा होतो. सांडव्याचे काम पूर्ण झाल्यास ही क्षमता ४९५ एम. सी. एफ. टी. होईल. सद्यस्थितीत १६०० हेक्टर शेती सिंचनाखाली आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास २,६८६ हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. धरणाच्या कामासाठी १० कोटी व कालव्याच्या कामासाठी १६ कोटी निधीची आवश्यकता आहे. तालुक्यातील पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने माणिकपूंज प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी संजय पवार यांनी केली होती.

१० हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठय़पुस्तक योजनेचा लाभ
मनमाड / वार्ताहर
शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातंर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षांत शहरातील १० हजार ४७८ विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सहजपणे शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने सर्व शिक्षा अभियान योजनेंतर्गत मोफत पाठय़पुस्तक देण्याचा उपक्रम सुरू केला असून शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी पुस्तके मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पालक सभा, पालक मेळावा, पटनोंदणी पंधरवडा असे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन शालेय प्रशासनस्तरावर सुरू आहेत. शहरातील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व खासगी अनुदानित शाळा तसेच रेल्वेच्या दोन शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी असून शहरातील सर्व शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. शहरात इयत्ता पहिलीसाठी एक हजार १६४, दुसरी एक हजार ९७, तिसरी एक हजार १२२, चवथी एक हजार ८०, पाचवी एक हजार ६४६, सहावी एक हजार ५८८, सातवी एक हजार ४२८ तर आठवीत एक हजार ३६२ मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.

ग्रामसुरक्षा दलाने गावांमध्ये जागरुकता वाढवावी - शेख
मनमाड / वार्ताहर

मनमाड शहर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील २२ गावांमध्ये ग्रामसुरक्षा दलाने शांतता व सलोखा टिकवून ठेवण्यासह गावात जागरूकता वाढवावी, असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक रफिक शेख यांनी ग्रामसुरक्षा दलाच्या मेळाव्यात केले. यावेळी पोलीस ठाण्यातर्फे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अशी स्पर्धा घेण्याचा पहिला मान या पोलीस ठाण्याने मिळविला. सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मेळाव्यात सहभागी झाले होते. विजेत्यांना पोलीस ठाण्यातर्फे चषक भेट देण्यात आला. ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी गावात सुरू असलेले अवैध धंदे, गुन्हे व गुन्हेगारांची माहिती द्यावी, गावात दररोज रात्री गस्त घालावी व जागरूकता वाढवावी तसेच पोलीस आणि जनता यांच्यात संपर्क ठेऊन गावात शांततेचे वातावरण राहील या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन मेळाव्यात करण्यात आले. ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी यावेळी आपल्या अडचणी मांडल्या. सदस्यांना पोलीस कवायत तसेच लाठी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

सेतू कार्यालयास टाळे ठोकण्याचा राष्ट्रवादीचा इशारा
वार्ताहर / सटाणा

विविध दाखले मिळवण्यासाटी येथील सेतु कार्यालयाबाहेर भर उन्हात नागरिकांना कित्येक तास उभे राहावे लागत असून वेळेवर दाखले उपलब्ध होत नाहीत. कार्यपध्दतीत सुधारणा न केल्यास कार्यालयास टाळे ठोकले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिला आहे. सेतू कार्यालयाबद्दल नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत सोनवणेंसह पक्ष कार्यकर्त्यांनी कार्यालयात गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले. कार्यालय संचालकांच्या प्रतिनिधींना हार, गुच्छ देण्यात आले. तहसीलदार इंदिरा चौधरी यांना सेतू कार्यालयाच्या अंदाधुंद कारभाराबाबत निवेदन देण्यात आले. कार्यालय कर्मचाऱ्यांकडून कागदपत्र, दाखल्यांसाठी पैशांची अवास्तव मागणी केली जाते. दिलेल्या पैशांच्या पावत्या दिल्या जात नाहीत. बेजबाबदारपणे उत्तरे दिली जातात. सेतू कार्यालयात दाखल कागदपत्रेही गहाळ होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढीस लागले असून तहसीलदारांनी याबाबत कारवाई करावी व नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.