Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

वरसगावचे रिसॉर्ट अखेर ‘एमटीडीसी’च्या ताब्यात
पुणे, २३ जून/खास प्रतिनिधी

तब्बल दहा वर्षांच्या न्यायालयीन लढय़ानंतर वरसगाव धरणालगतचे ‘रिसॉर्ट’ ललित संगतानी यांच्या बॅरन हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडकडून महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या ताब्यात मिळाले आहे. रिसॉर्टच्या भाडेदराच्या थकबाकीसह ते महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. गेली सात वर्षे बंद असलेले हे रिसॉर्ट न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा पर्यटकांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला आहे.

सर्वपक्षीय नगरसेवकांचा इशारा
विद्यार्थी मोफत प्रवास योजना पीएमपीला राबवावीच लागेल
पुणे, २३ जून / प्रतिनिधी
‘विद्यार्थी मोफत प्रवास’ योजनेबाबत पीएमपीने कितीही नकारात्मक भूमिका घेतली, तरी पीएमपी प्रशासनाला ही योजना कोणत्याही परिस्थितीत राबवावीच लागेल, असा इशारा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिला. पीएमपीच्या विरोधात मनसेच्या नगरसेवकांनी सभा सुरू होताच जोरदार निदर्शने करत सभेचे कामकाज अर्धातास रोखून धरले.
सर्वसाधारण सभा सुरू होताच आज मनसेच्या नगरसेवकांनी हातात फलक फडकवत विद्यार्थी पास योजना उद्यापासून लागू करा आणि ज्येष्ठ नागरिक पासच्या दरात कपात करा, अशा दोन मागण्या करत घोषणा द्यायला सुरुवात केली.

पिंपरी पालिकेतील ४० प्लंबरच्या बदल्या
बेकायदा नळजोड देणाऱ्या रॅकेटला ‘दे धक्का’
पिंपरी, २३ जून / प्रतिनिधी

शहरातील बेकायदा नळजोड देण्याच्या रॅकेटमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्लंबर मंडळींना ‘धक्का’ देत त्यांच्यावर पालिका प्रशासनाने आज कारवाईचा बडगा उगारला. आयुक्त आशिष शर्मा यांच्या आदेशानुसार महापालिकेतील ४० प्लंबरच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याने पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

यवत-केडगाव रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करणार
मध्य रेल्वेची जिल्हा परिषदेला नोटीस
पुणे, २३ जून / खास प्रतिनिधी
पुणे-दौंड रेल्वेमार्गावरील यवत-केडगाव दरम्यानचे रेल्वे क्रॉसिंग फाटक येत्या २५ जूनपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची नोटीस मध्य रेल्वेने जिल्हा परिषदेला बजावली आहे. या फाटकाच्या देखभाल शुल्काची १९ लाखांची थकबाकी न भरल्याने मध्य रेल्वेने हा कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे मात्र नागरिकांना मोठय़ा गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

पर्यटन महामंडळाची तीस टक्के सवलतीची ‘मान्सून ऑफर’
पुणे, २३ जून / खास प्रतिनिधी

अंगावर सरींवर सरी झेलत चिंब चिंब होण्याचा आनंद लुटण्यासाठी पावसाने पर्यटकांना वाट पाहायला लावली असली तरी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मात्र पावसाळी पर्यटनासाठी सवलतींचा पाऊस पाडला आहे. पर्यटनस्थळांवरील महामंडळाच्या निवासस्थानाच्या दरात तब्बल तीस टक्के सवलत देणारी ‘मान्सून ऑफर’ जाहीर करण्यात आली आहे.
पर्यटन महामंडळाने पावसाळी पर्यटन पॅकेज दोन वर्षांपूर्वी बंद केले आहे.

आळंदी देवस्थानसाठी पिंपरी पालिकेचे २५ लाखाचे अर्थसाहाय्य
पालकमंत्र्यांच्या सूचना
पिंपरी, २३ जून / प्रतिनिधी
आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दर्शनबारी मंडपाच्या कामासाठी िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला.

साखर संकुल येथे उद्यापासून बचत बाजार
खरेदीचा जल्लोष
पुणे, २३ जून / प्रतिनिधी
शहरातील ३०० बचत गटांतील अडीच हजार महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू, तयार तसेच पारंपरिक खाद्यपदार्थ, कपडे, नावीन्यपूर्ण कलाकुसरीच्या वस्तू, घरगुती उपकरणे आदींची विक्री करण्यासाठी ‘बचत बाजार-खरेदीचा जल्लोष’ या उपक्रमाचे आयोजन महापालिकेने केले असून या बाजाराचे उद्घाटन गुरुवारी (२५ जून) सायंकाळी होणार आहे.

घरेलू कामगार मंडळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा
पुणे, २३ जून / प्रतिनिधी
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ कायदा मंजूर होऊन अद्यापही त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. या संदर्भातील मागण्यांसाठी आज पुणे जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. डिसेंबर २००८ मध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ कायदा मंजूर केला असून तो अमलात आणण्यासाठी लवकरात लवकर नियमावली तयार करावी. कायद्यांतर्गत सुरू करण्याच्या विविध कल्याणकारी योजनांना स्पष्ट स्वरूपात मांडाव्यात. तसेच राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना राज्यातील तमाम घर कामगारांना देण्यात यावी आदी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.या वेळी कामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे, सचिव सरस्वती भांदिर्गे, उषा दातार आदी उपस्थित होते.

दरोडय़ाच्या तयारीमधील सहाजणांच्या टोळीला अटक
पुणे, २३ जून / प्रतिनिधी
शिवाजीनगर गोदामाजवळील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहाजणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, कुकरी, तलवार अशी हत्यारे पोलिसांनी जप्त केली. निलेश विलास धनकवडे (वय २३), अनुज ऊर्फ प्रसाद अशोक कांबळे (वय १९), परेश विलास धनकवडे (वय २१), अमर दादासाहेब पवार (वय १९), हर्षद बाळकृष्ण पाटील (वय १९) आणि पंकज नामदेव कसबे (वय १९, सर्व रा. रा. धनकवडी) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

‘दिनकरराव फाटे यांनी अनेक समस्या सोडवल्या ’
पुणे, २३ जून / प्रतिनिधी
सामाजिक जबाबदारी म्हणून कै. दिनकरराव फाटे यांनी मोठी जबाबदारी पेलली. गावातील अनेक समस्या सोडविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याचे मत नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केले.कात्रज येथील चार एकर परिसरातील सर्व समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला नगरसेवक मोरे आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नाने माजी सदस्य कै. दिनकरराव फाटे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी मोरे बोलत होते.ह.भ.प. गुरुवर्य जनार्दन जंगले यांच्या हस्ते नगरसेवक वसंत मोरे यांच्या उपस्थितीत नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन कात्रज येथील स्मशानभूमीत विकास फाटे यांनी केले होते. या प्रसंगी ज्ञानेश्वर माउलीच्या दिंडी क्रमांक ९७ चे प्रमुख जनार्दन जंगले यांच्यासह सुमारे ९०० वारकरी उपस्थित होते.प्रवेशद्वाराचे नामकरण झाल्यानंतर भारूड आणि वांजले महाराजांचे प्रवचन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला.

कचरा डेपोसाठी वनजमिनींचा प्रस्ताव
पुणे, २३ जून/खास प्रतिनिधी
पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असतानाच हा कचरा आता महापालिका हद्दीबाहेर असलेल्या वनजमिनींमध्ये टाकण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. कचरा डेपोसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या जमिनीबाबत पालकमंत्री अजित पवार व वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्यात नुकतीच चर्चाही झाली.पुण्यातील कचरा देवाची उरुळी येथे टाकण्यास तेथील नागरिकांनी विरोध केला आहे. या विरोधामुळे सध्याचा हा कचरा डेपो सात महिन्यांत टप्प्या-टप्प्याने बंद करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले आहे. शहरातील या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच विविध भागांत कचरा टाकला जावा, असा प्रयत्न आहे.

डॉ. अशोक कामत यांना जीवनव्रत पुरस्कार
पुणे, २३ जून / प्रतिनिधी
श्री चतुशृंगी सेवा समितीच्या वतीने देण्यात येणारा जीवनव्रत पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना जाहीर झाला आहे. चतुशृंगी सेवा समितीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येत असून, पंचवीस हजार रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

जिल्ह्य़ात ९५ टक्के मुलींमध्ये बळावतोय रक्ताक्षय
पुणे, २३ जून / खास प्रतिनिधी

जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून ‘आरोग्य अभियाना’त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येत असून दहा हजार मुलींच्या तपासणीत ९५ टक्के मुलींमध्ये रक्ताक्षयाचा आजार बळावत असल्याचे निदर्शनास आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी ही माहिती दिली. जिल्ह्य़ातील १ लाख ५ विद्यार्थिनींची तपासणी होणार आहे. सुरुवातीला दहा हजारांपैकी ९५ टक्के मुलींमध्ये रक्ताक्षय बळावल्याचे निदर्शनास आले. हिमोग्लोबिनचे प्रमाण टिकून राहण्यासाठी लोहयुक्त गोळ्या देणार असल्याचेही संजीवकुमार यांनी स्पष्ट केले.

वसंत पवार यांच्यावरील ‘वसंतलावण्य’ ग्रंथाचे प्रकाशन
पुणे, २३ जून / प्रतिनिधी
मराठीतील प्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांच्यावर मधु पोतदार यांनी लिहिलेल्या ‘वसंतलावण्य’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन येत्या २७ जून रोजी करण्यात येणार आहे.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. प्रकाशनाचे ए. अभ्यंकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या २७ जून रोजी ज्येष्ठ संगीत-दिग्दर्शक प्रभाकर जोग यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या प्रकाशन समारंभास ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील अध्यक्ष, तर संगीत दिग्दर्शक आनंद मोडक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ पाडळे पॅलेस सभागृह येथे होणार आहे. पुस्तक प्रकाशनानंतर वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

शारदाबाई धारवाडकर यांचे निधन
पुणे, २३ जून/प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां आणि काँग्रेस सेवा दलाच्या वरिष्ठ सदस्या शारदाबाई मोरेश्वर धारवाडकर (वय ८७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शारदाबाई या गृहसंरक्षक दलात (होमगार्ड) प्रमुख पदावर कार्यरत होत्या. तसेच सेवासदन सोसायटीमध्ये त्यांनी खाद्यपदार्थ विभागात काही वर्षे काम केले होते. कर्वे रस्त्यावरील ‘स्त्री संघटना औद्योगिक सहकारी मंडळा’च्या त्या संस्थापक सदस्या होत्या. महिला सबलीकरणाच्या हेतूने या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्यांचा विविध संस्थांशी निकटचा संबंध होता.

बाळकृष्ण वाळुंजकर यांचे निधन
पुणे, २३ जून / प्रतिनिधी

तिळवण तेली समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण रामभाऊ वाळुंजकर (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष व गणेश पेठ येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष होते. संरक्षण विभागात त्यांनी सेवा केली होती. तिळवण तेली समाज संस्थेचे विश्वस्त घनश्याम वाळुंजकर यांचे ते वडील होत.

महापौरांच्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध दावा
पिंपरी, २३ जून/प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके राहात असलेल्या इमारतीतील रहिवाशांनी केलेल्या अतिरिक्त बांधकामाच्या विरोधात येथील एका बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयात दावा दाखल केला आहे. चिंचवडच्या िलक रस्त्यावर ‘देदीप्यमान’ या इमारतीत महापौर डोके राहातात. त्यांच्यासह इमारतीतील आठजणांनी अतिरिक्त बांधकाम केल्याचा आक्षेप राजेंद्र गावडे या बांधकाम व्यावसायिकाने घेतला होता. या प्रकरणी त्यांनी खासगी वकिलामार्फत या सर्वाना नोटिसाही बजावल्या होत्या. त्यानुसार आज गावडे यांनी आकुर्डी न्यायालयात महापालिका प्रशासन, महापौर, तसेच या इमारतीतील अन्य रहिवाशी यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. तथापि यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास महापौरांनी नकार दिला.

सराफ सुवर्णपेढीकडून ‘श्री व सौ महोत्सव’
पिंपरी, २३ / प्रतिनिधी

परंपरा, विश्वास, दर्जा व तत्पर सेवा यामुळे उद्योगनगरीत लोकप्रिय असलेल्या चंदूकाका सराफ अॅंण्ड सन्स प्रा. लिमिटेड या सुवर्णपेढीच्या वतीने चिंचवड शाखेमध्ये गुरुवार (२५ जून) पासून गुरुपुष्पमृताच्या मुहूर्तावर ‘श्री व सौ महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात पुरुषांना प्रथमच स्त्रियाबरोबर सोनेखरेदीवर आकर्षक भेटवस्तू मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. चंदूकाका सराफ अॅण्ड सन्सच्या संचालिका संगीता शहा यांनी ही माहिती दिली. त्यावेळी चिंचवड शाखेचे प्रमुख प्रशांत मेहता आणि कंपनीचे खरेदी व विपणन प्रमुख एस. एम. चाणेकर उपस्थित होते. यावेळी सोनसाखळी, अंगठी, ब्रेसलेट, टॉप्स, घडय़ाळ व हिऱ्याचे दागिने खरेदी केल्यास पैठणी, ब्रॅण्डेड शर्ट, ट्रॅव्हल बॅग, टिफिन बॅग अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. १८ ते २४ कॅरेटचे दागिने उपलब्ध असतील. महोत्सव फक्त चिंचवड शाखेतच आहे. सुट्टीच्या दिवशी देखील दालन खुले ठेवण्यात येणार आहे, असे श्रीमती शहा यांनी सांगितले.

पार्किंगमधील मोटारीतून दोन लाखांसह बॅग चोरीला
पुणे, २३ जून / प्रतिनिधी

श्री शिवाजी मराठा संस्थेच्या विधी महाविद्यालयाच्या आवारात पार्किंग केलेल्या मोटारीतून दोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरटय़ाने चोरून नेली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.पांडुरंग नारायण वाळुंज (वय ५६, रा. साडेसतरानळी, हडपसर) यांनी याबाबत खडक पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री शिवाजी मराठा संस्थेच्या आवारातील विधी महाविद्यालयाच्या इमारतीजवळ वाळुंज यांनी त्यांची मोटार लावली होती. मोटारीच्या दरवाजांना लॉक करण्यात आले नव्हते. याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरटय़ाने मोटारीतील बॅग चोरून नेली. बॅगमध्ये दोन लाखाची रोकड होती. खडक ठाण्याचे सहायक फौजदार ए.एल. भोसले याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.