Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

कुलगुरु निवडीवरून मुक्त विद्यापीठात रंगतोय् डावपेचांचा आखाडा !
नाशिक, २३ जून / खास प्रतिनिधी

 

‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहचविण्याचा वसा घेतलेल्या यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सध्या कुलगुरु निवडीच्या कारणावरून अक्षरश: डावपेचांचा आखाडा रंगू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीगत इच्छुकांकरवी गावगुंडीचे प्रदर्शन होणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पत्ता कट करण्यासाठी समर्थकांचे शिष्टमंडळ वरिष्ठांच्या पुढय़ात दाखल केले जाणे, समोरच्याला वश करण्याकरिता आमिषाचा वापर होणे आदी क्लृप्त्या विद्यापीठस्तरावरही अंमलात येत असल्याची चर्चा विद्यापीठाच्या वर्तुळात सुरु आहे. कुलगुरु निवड प्रक्रियेच्या उद्या, बुधवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील बहुचर्चित ‘सर्च’ कमिटीवर निवड व्हावयाच्या ‘लक्ष्यवेधी’ सदस्याकडे आपसूकच सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. परिणामी, त्यांच्या जागी नवीन कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरु झाली असून त्याचाच एक किंबहुना कळीचा भाग म्हणून उद्या, बुधवार दिनांक २४ जून रोजी कुलगुरु निवडीसाठी गठित होणाऱ्या सर्च समितीवरील तीन सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्णत्वास जात आहे. यापूर्वी अशास्वरुपाच्या समितीमध्ये विद्यापीठस्तरीय दोन व राज्यपालांकरवी एक असे एकूण तीन सदस्य नियुक्त केले जायचे. पण यंदापासून यात बदल करण्यात आला असून त्यानुसार विद्यापीठ तसेच राज्यपाल व शासनाचा प्रत्येकी एक अशा एकूण तीन सदस्यांची निवड सर्च समितीवर केली जाणार आहे. या अगोदर विद्यापीठस्तरावरून कोणत्या दोन सदस्यांची नावे जायची याची वाच्यताही होत नसे. नेमकी ती यंदा प्रचंड मोठय़ा प्रमाणावर होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्च समितीच्या सदस्य निवडीच्या प्रक्रियेत विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे १८ तर विद्वत् सभेचे २६ असे एकंदरीत ४४ सदस्य सहभाग घेणार आहेत. वरकरणी अत्यंत छोटय़ा स्वरुपाची ही निवडणूक प्रक्रिया दिसत असली तरी तिचा आशय प्रचंड मोठा आहे. कारण हीच सर्च समिती पुढील काळात कुलगुरु निवडीच्या प्रक्रि येत मुद्याची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे येत्या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये तीन पैकी दोन सदस्यांनी आपली पाठराखण करावी या हेतूनेच सर्च समितीवरील सदस्य मर्जीतील असावेत या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून कुलगुरुपदाच्या शर्यतीत असलेल्या विद्यापीठातीलच काही मुखंडांनी मोर्चेबांधणी केल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे उद्या सर्च समितीवर निवडल्या जाणाऱ्या तीन लक्षवेधी सदस्यांकडे सर्वाच्याच नजरा लागल्या आहेत.