Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

बसपमधील निष्ठावंतांची समांतर समन्वय समिती
औरंगाबाद, २३ जून/प्रतिनिधी

 

बहुजन समाज पक्षामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांची ‘राजकीय कत्तल’ होत असल्याचा आरोप पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार बैठकीत केला. आमची त्यागाची चळवळ आहे. आम्हाला पक्षातून बाहेर काढणारेच मुळी आता या पक्षात आले आहेत. शत्रूची दलाली करणाऱ्यांना आम्हाला पक्षातून बाहेर काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पक्षासोबत इमानेइतबारे वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या १०० कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस मुकुंद सोनवणे, माजी कोषाध्यक्ष पंडित बोर्डे व माधव बोर्डे यांनी ही घोषणा केली. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी खासदार वीरसिंग, आमदार के. के. सच्चान, प्रदेशाध्यक्ष विलास गरूड आणि उपाध्यक्ष सुरेश साखरे यांनी आर्थिक स्वार्थासाठी पक्षाच्या ‘केडर बेस’ कार्यकर्त्यांची राजकीय कत्तल चालविली आहे. दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी करून स्वपक्षाच्या उमेदवाराला पराभूत करणे, उमेदवारी देण्यासाठी पैसे घेणे त्यासाठी निष्ठावानांना डावलणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. पक्ष म्हणजे त्यांचे दुकान बनले आहे. निष्ठावान कार्यर्त्यांच्या भावना पक्षाध्यक्ष मायावती यांच्यापर्यंत कधीच पोहचू दिल्या गेल्या नाहीत, असा आरोपही या वेळी करण्यात आला.
या चौकडीने खुलेआम पक्ष विक्रीला काढल्याचे दिसत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला होता. त्याची प्रचिती गेल्या पंधरवाडय़ात येथे झालेल्या बैठकीत आली. मराठवाडय़ाच्या आठही जिल्ह्य़ांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांसह चौघांना बेदम मारहाण केली होती. हे पदाधिकारी सभागृहातून अक्षरश: पळून गेले होते. रस्त्यावर पाठलाग करून त्यांना पकडून मारहाण करण्यात आली. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. लोकसभेच्या वेळी पैसे घेऊन उमेदवाऱ्या वाटल्या आणि आता पदेही तसेच पैसे घेऊन वाटण्यात येत आहेत, असा पदाधिकाऱ्यांचा आरोप होता. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे मारहाण झाल्यामुळे पक्षात खळबळ उडाली होती. याची माहिती पक्षाध्यक्षा मायावती यांच्यापर्यंत पोहोचती करण्यात आली होती. त्यानंतरही पुढे काही झाले नाही. त्यातच याच पदाधिकाऱ्यांनी जुन्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
‘बहेनजी यांच्या आदेशामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे आम्हाला सांगण्यात येत आहे. तेव्हा बहेन मायावती यांचा आदेश कोठे आहे?’, असा सवाल श्री. सोनवणे यांनी केला. मायावती यांच्या नावावर येथील वरिष्ठ पदाधिकारी मनमानी करत आहेत. त्यामुळे ही समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.
पक्षाचे राज्यातील ८० टक्के पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा दावा श्री. बोर्डे यांनी केला. या वेळी पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस प्राचार्य चुन्नीलाल जाधव, माजी राज्य सचिव मौलाना फेरोज अली उपस्थित होते.